esakal | अग्रलेख :  रुपेरी पडद्याआडची लढाई!
sakal

बोलून बातमी शोधा

theater

 गेले ७२ दिवस बंद पडलेल्या या चित्रसृष्टीचे चक्र धक्का मारून वेळीच फिरवले नाही तर हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊ शकतात, याची जाणीव ठेवून सरकार-प्रशासनांनी परवानग्या दिल्या आहेत.

अग्रलेख :  रुपेरी पडद्याआडची लढाई!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सक्तीच्या दीर्घनिद्रेतून हळूहळू जागे होणाऱ्या भुकेल्या वन्यजीवांसारखे सारे जग आता पोटासाठी बाहेर पडू पाहाते आहे. प्रचंड जीवितहानी घडवणारी ही ‘कोविड-१९’ ची महासाथ अजूनही आटोक्‍यात आलेली नसली, तरी भुकेपुढे कोणाचे काय चालते? स्वाभाविकच आजारपण जमेल तसे गुंडाळून जगरहाटी सुरू झाली आहे. प्रचंड पोळून निघालेल्या इटलीनेही बीमारी झटकून पुन्हा जीवनाला भिडायचे ठरवले आहे. जर्मनीतली फुटबॉल मैदाने पुन्हा गजबजू लागली आहेत. अमेरिकेतही जनजीवन धीमेधीमे सुरळीत होते आहे. पॅरिसमधले रंगिली कॉफीपानगृहे पुन्हा गजबजली आहेत. आपल्या भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या दिवशीच उघडिपीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सारांश, जग पुन्हा कामाला लागू पाहाते आहे. अर्थात नाट्यगृहे, सर्कशीचे तंबू, ऑपेरागृहे, चित्रपटगृहे मात्र रिकाम्या खुर्च्या उरात बाळगत उदास आणि भकास अवस्थेत बसलेली आहेत. त्यांना मात्र अजूनही उद्धाराचा मार्ग गवसलेला नाही. आपला भारत देश तर सिनेमावेड्यांचा देश. जगात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा हा देश लॉकडाउनच्या साखळदंडात जखडलेला होता, अजूनही तो पुरता सुटलेला नाही. तरीही काही निर्बंध पाळून चित्रिकरण सुरू करण्याची परवानगी राज्यांनी दिलेली दिसते. महाराष्ट्रातही काहीशी कडक नियमावली जाहीर करू न अटीशर्तींवर चित्रपट आणि मालिकानिर्मात्यांना आपापली कामे सुरू करायला परवानगी दिली आहे. पण अशा अटी पाळून खरोखर सिनेमा-मालिकांचे चित्रीकरण होईल काय? झालेच तर ते कोण बघेल आणि कुठे? असे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरे तूर्त तरी कोणाकडे नाहीत.

चित्रीकरणाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागेल, मास्क लावावा लागेल, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल, चित्रीकरणस्थळी एक डॉक़्टर, नर्स आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवावी लागेल, चित्रीकरणाच्या चमूत ६५ वर्षांवरील व्यक्ती असणार नाही, अशा अनेक अटी सरकारने चित्रनिर्मात्यांवर लादल्या. अभिनेत्याच्या कुटुंबीयांसमवेतच दृश्‍ये चित्रित करता आली, तर सोशल डिस्टन्सिंगची अट कमी होऊ शकते, अशी अजब सूचनाही सरकारने निर्मात्यांना केली आहे! त्याला अर्थात निर्मात्यांचा विरोध आहे, हे ओघाने आलेच. जिथे इस्पितळांमध्येच डॉक्‍टर आणि नर्सेसचा तुटवडा आहे, तिथे चित्रीकरणाला ते कसे येणार? पेशंटलाच रुग्णवाहिका मिळत नाहीत, तर त्या शूटिंगसाठी कशा उपलब्ध होणार? कित्येक नाणावलेले तारेसितारे आणि अनुभवी तंत्रज्ञ साठी ओलांडलेले आहेत, त्यांच्यावाचून चित्रीकरण करायचे ते कसे? अभिनेत्यांचे कुटुंबीय अभिनयाच्या क्षेत्रातले असतील, असे गृहित कसे धरणार? असे अनेक प्रतिसवाल निर्मात्यांच्या संघटनेने केले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्नही दखल घेण्याजोगेच आहेत. ६५ वर्षांवरील व्यक़्तीने चित्रीकरणापासून दूर राहावे, ही अट ग्राह्य धरली, तर साक्षात अमिताभ बच्चनसारखा महानायकही घरी बसेल, हे उघड आहे. अमिताभच नव्हे, तर अनुपम खेरपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत कितीतरी अभिनेते घरात बसून राहतील. चित्रसृष्टी ही गल्ल्यावर चालणारी दुनिया आहे. गल्ला ओढणारे सितारेच नसतील, तर ही दुनिया हवालदिल होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुळात सध्याच्या दिवसांत हे तारामंडळ तरी चित्रीकरणात सहभाग घेण्यास तितके उत्सुक आहे काय, हादेखील एक प्रश्न आहे. पण संकटांचा काळ हा मोठ्या बदलांचाही काळ असतो. त्यामुळे कदाचित नवे तारे उदयाला येतील. ते नव्या समीकरणांशी चटकन जुळवूनही घेतील.हॉलिवूडमध्ये चित्रीकरणासाठी काही स्टुडिओंनी तयारी सुरू केली तेव्हा चार्लीझ थेरॉन, जेनिफर लोपेझ, टॉम हॅंक्‍स अशा सिताऱ्यांनी ‘हे कोरोना प्रकरण मिटेपर्यंत आम्ही कॅमेऱ्यासमोर येणार नाही’, अशी नि:संदिग्ध भूमिका घेतली, त्याचे कारण अजूनही न टळलेला धोका हेच आहे. त्यात वावगे काहीच नाही. परंतु, विविध सरकारांनी चित्रीकरणासाठी परवानगी का दिली? याचे कारणही पाहिले पाहिजे. चंदेरी दुनियेत फक़्त सितारेच राहतात असे नव्हे, तर अक्षरश: हजारो तंत्रज्ञ आणि सहायकांचे हे पोटापाण्याचे साधन आहे. गेले ७२ दिवस बंद पडलेल्या या चित्रसृष्टीचे चक्र धक्का मारून वेळीच फिरवले नाही तर हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊ शकतात, याची जाणीव ठेवून सरकार-प्रशासनांनी परवानग्या दिल्या आहेत. सरकारी अटी या अन्याय्य किंवा जाचक असल्याची टीका अनाठायी ठरते ती त्यामुळेच. कारण या अटींच्या मुळाशी चित्रसृष्टीचीच प्रकृती सांभाळण्याचा दृष्टिकोन आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सरकारी अटींचा योग्य अर्थ लावून सहकार्य केले, तर सुवर्णमध्य नक़्कीच गाठता येऊ शकेल. चित्रसृष्टीचे हित-अहित, गल्ल्याची गणिते, हे मुद्दे घटकाभर बाजूला ठेवले, तरी जनसामान्यांसाठी मनोरंजन हवेच आहे हे कसे नाकारता येईल? चित्रपट आणि मालिकांच्या विश्वाचा आधार घेऊन किती तरी अन्य उद्योग एरवी जगत असतात. शिवाय याच विश्वाच्या जोरावर देशविदेशातली अक्षरश: कोट्यवधी सामान्य घरे आपली सांस्कृतिक भूक भागवत असतात. त्यांच्यासाठी तरी हे चंदेरी दुनियेचे अडकून पडलेले गाडे सुरू व्हायला हवे. ही स्वप्नांची दुनिया आहे. स्वप्ने दाखवणारी, आणि घडवणारीही. नजीकच्या काळात सारी नकारात्मकता झटकून जीवनाचा प्रवाह पूर्ववत करण्यात हीच दुनिया सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येईल.

loading image