electric car
electric car

अग्रलेख : वाहनक्रांतीच्या  उंबरठ्यावर

चालकविरहित स्वयंचलित मोटारींचे आगमन ही एका नव्या वाहनपर्वाची नांदी म्हणता येईल. या पर्वाचे स्वागत करताना आनुषंगिक सज्जताही महत्त्वाची ठरणार आहे. सरकार, विविध यंत्रणा, कंपन्या आणि ग्राहक यांनी याची दखल घेतली पाहिजे. 

वैज्ञानिक प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोठी स्वप्ने पाहिली गेली आणि तंत्रज्ञानाच्या विकासातून माणसाच्या प्रगतीचे एकेक पाऊल पुढे गेले. वाहतुकीच्या प्रांतात सुरू होत असलेले चालकविरहीत स्वयंचलित गाड्यांचे पर्व म्हणजे याच वाटचालीतील एक मैलाचा दगड. इलॉन मस्क यांची महत्त्वाकांक्षी ‘टेस्ला’ ही चालकविरहित स्वयंचलित कार भारतभूमीवर येत असून, त्यामुळे या पर्वाची नांदी आपल्याकडेही होत आहे. बंगळुरात इलॉन मस्क यांच्या कंपनीने ‘टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लि’ स्थापन केली असून ७४ हजार डॉलरमध्ये (५९लाख २०हजार रुपयांत) ही गाडी भारतीयांना उपलब्ध होईल. दक्षिण आफ्रिकेतील खाणमालकाच्या मुलाने जगावेगळी स्वप्ने पाहात आपले करियर सुरू केले. मंगळावर स्वारी, खासगी अंतराळ यान आणि अंतराळ पर्यटन, विजेच्या बॅटरीवरील चालकविरहीत, दूरस्थ नियंत्रित वाहनाची निर्मिती अशी यशाची एकेक शिखरे ते काबीज करीत गेले. त्यांचे नाव एलॉन मस्क. 

विजेवरील वाहने बनवण्यात फोर्ड, जनरल मोटर्स, ह्युंदाई, मर्सिडीज बेंझ अशाही कंपन्या प्रयत्नशील आहेत. गेली अनेक वर्षे आपण महिंद्राची रेवा पाहतोच आहोत. जीवाश्‍म इंधनातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विजेवरील वाहने वरदान ठरतील. त्यात ‘टेस्ला’चे वेगळेपण आजतरी अधोरेखित होते. या गाडीतील बहुतांश बाबी स्वयंचलित आहेत. गाडीचा वेग, तिच्यातील यंत्रणा, तिचे रस्त्यावरून जाणे, तिचे टायर, त्यांची स्थिती, अंतर्गत नियंत्रण प्रणाली आणि त्याचे दूरस्थ केले जाणारे नियंत्रण, बॅटरीचे चार्जिंग सगळेच कल्पनातीत असे आहे. यामागील कल्पकता, आधुनिक डिजिटल प्रणाली, काळाबरोबर जाण्यासाठीची सज्जता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा सगळ्यांचा मिलाफ आणि त्यातून वापरकर्त्याला मिळणारा आराम अचंबित करणारे आहे. तथापि, त्याचबरोबर आगामी काळाचा वेध घेत पर्यावरणपूरकतेकडे वाटचालीचे ते आश्‍वासक पाऊलदेखील आहे. जागतिक तापमानवाढीचे संकट आणि त्याचे दुष्परिणाम भेडसावत असताना कार्बन उत्सर्जन कमी करणे नितांत गरजेचे आहे. त्यादृष्टीने ही क्रांती उपकारक ठरेल. अलीकडे मर्सिडीज, रोल्स रॉइस, बीएमडब्ल्यू, फोक्‍सवॅगन, ऑडी यांनीही आपल्या गाड्यांत स्वयंचलित बाबी आणलेल्या असल्या तरी टेस्लाशी तुलना करता त्या मागे आहेत. एलॉन मस्कने २००६मध्ये टेस्लाच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले. पहिल्यांदा २००८मध्ये रोडस्टर बाजारात आणली, पण व्यवसायवृद्धीऐवजी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जावे लागले. ती मार्केटहिट ठरलीच नाही. दरम्यान, बेंझनेही टेस्लाशी सहकार्य करत गुंतवणूक केली, नंतर मागे घेतलीही. पण आज साडेतीन ट्रिलियन डॉलरवर असलेले टेस्लाचे बाजारमूल्य तिची मोहिनी स्पष्ट करते.  

भारतात या नव्या पर्वाच्या स्वागतासाठीची सज्जता आवश्‍यक आहे. त्याचा पहिला मुख्य घटक म्हणजे इलेक्‍ट्रिक मोटारींच्या व्यापक वापरासाठी पुढच्या काही वर्षाचा एक रोडमॅप आणि धोरण तयार करणे. नवे तंत्रज्ञान वापरात येऊ लागले, की आधीचे कायदेकानू-नियमन, दुरुस्ती-देखभालीच्या व्यवस्था हे सगळेच बदलावे लागते. काळाशी सुसंगत अशी रचना करावी लागते. तसा विचार सरकारला करावा लागेल. विजेवरील वाहने आणि त्यांच्या बॅटरी रिचार्ज करणे आजतरी जिकिरीचे आणि किचकट आहे. भारतात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची जगात चाललेली मॉडेल खपू शकली नाहीत. येथील रस्ते आणि त्यांची स्थिती, वाहतुकीची पद्धती आणि त्यातील अडथळे, हवामान, ग्राहकाची मानसिकता यांचा मेळ बसायला पाहिजे. अर्थात भारतात विजेवरील वाहने वाढावीत, यासाठी सरकारचे प्रोत्साहन आहे, ही चांगली गोष्ट आहे. वाहन खरेदीवर प्राप्तिकरात सवलतीपासून ते चार्जिंग पॉईंट वाढवण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपाजवळ हे पॉईंट निर्माण करणे, हे चांगले प्रयत्न आहेत. परंतु २६०० पॉईंटची गरज असताना प्रत्यक्षात आज पाचशेदेखील पॉईंट आपल्याकडे नाहीत. आपल्या तुलनेत चीन खूप पुढे पोहोचला आहे. त्यातच ही वाहने खूपच किंमती, त्यांच्या महागड्या बॅटरी आणि त्याची दाव्यापेक्षा कमी गुणवत्ता, वाहनाची पुनर्विक्री करताना योग्य दर न मिळणे याही ग्राहकांच्या समस्या आहेत. या स्थितीने देशात विजेवरील वाहनांची बाजारपेठ विस्तारत नाही, हे कटू वास्तव आहे. मात्र, २०२५पर्यंत भारतातील या वाहनांची बाजारपेठ ५०हजार कोटी रुपयांची होईल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेवून सरकार आणि उत्पादक कंपन्या पावले उचलत आहेत, हेही आश्‍वासक मानावे लागेल. बॅटरीवरील वाहनांची आगीबाबत सुरक्षितता हा जगभर कळीचा मुद्दा आहे. टेस्लाही त्याला अपवाद नाही. बीएमडब्ल्यू, फोक्‍सवॅगन यांनी बॅटरीवरील आपली मॉडेल्स याच कारणास्तव मागे घेतली आहेत. अमेरिकेतही या वाहनांना आग लागण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडील वातावरण पाहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. असे असले तरी ‘टेस्ला’चे स्वागत केले पाहिजे. कारण तीन औद्योगिक क्रांत्यांनंतर आपण आता डिजीटल, थ्री डी प्रिंटिंग, ॲटोनोमस ड्रायव्हिंग, जैविक आणि जनुकीय प्रगती यांच्या मिलाफातून वेगळ्या क्रांतीकडे वाटचाल करत आहोत. त्याचवेळी युरोपीय समुहातही टेस्लाला तोंड देण्यासाठी ‘निकोला कॉर्पोरेशन’ सरसावत आहे. आपल्याकडे स्पर्धा करण्यायोग्य सर्व काही असून नसल्यासारखी स्थिती आहे. त्यावर मात करून या स्पर्धेत भारतानेदेखील उतरले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com