esakal | अग्रलेख : लाल मातीतले वादळ
sakal

बोलून बातमी शोधा

Hindkesari Shripati Khanchanale

कुस्ती ही विद्या आहे, कला आणि कौशल्यही आहे. त्यापलिकडे मातीतल्या मल्लांसाठी श्रद्धाही आहे. खंचनाळे अशा कुस्तीशी श्रद्धेने जोडलेल्या परंपरेतील मल्ल. काळाच्या ओघात मॅटचे प्रस्थ वाढले. 

अग्रलेख : लाल मातीतले वादळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बुरुजबंद कोल्हापुरी पैलवानांच्या मालिकेतील आणखी एक दुवा हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने निखळला. खंचनाळे पहिले हिंदकेसरी. खंचनाळेंची कुस्ती म्हणजे लय, ताल, तोल यांचा नजराणा. चित्त्याची चपळाई, हत्तीच्या ताकदीचे अनोखे मिश्रण. कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्याशी झुंज घेणारा हा पहाडासारखा मल्ल आणि आखाड्यातून प्रतिस्पर्धी म्हणून बाहेर पडल्यानंतर मल्लांच्या पिढ्या घडवणारा वस्ताद अलिकडे वार्धक्‍य आणि आजारांशी झुंजत होता. कोविड १९च्या प्रकोपाने बंद झालेल्या तालमी कोल्हापुरात सुरू करायची तयारी होत असताना श्रीपती खंचनाळे यांच्यासारखा कुस्तीतला अध्याय संपावा, हा दुर्दैवी योगायोग. लाल मातीशी सर्वार्थाने जोडलेल्या एका आयुष्याला खंचनाळे याच्या निधनाने पूर्णविराम मिळाला.        

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी, सात चांदीच्या गदा, तीन सुवर्णपदके, एकलव्य, द्रोणाचार्य पुरस्कार ते वस्ताद म्हणून घडवलेले पाच महाराष्ट्रकेसरी, एक हिंदकेसरी ही कोणत्याही पैलवानासाठी अभिमानाने मिरवावी अशी कामगिरी खंचनाळेंनी केली. कुस्ती ही विद्या आहे, कला आणि कौशल्यही आहे. त्यापलिकडे मातीतल्या मल्लांसाठी श्रद्धाही आहे. खंचनाळे अशा कुस्तीशी श्रद्धेने जोडलेल्या परंपरेतील मल्ल. काळाच्या ओघात मॅटचे प्रस्थ वाढले. कुस्ती तांत्रिक झाली. गुणांवर निकाल व्हायला लागले. बेमुदत निकाली कुस्तीत आरोळ्या, चित्कारांनी भरलेल्या आणि खम आणि शड्डू ठोकत एकमेकांवर चाल करून जात डोंगरासारखे मल्ल लढणाऱ्या मैदानाचा थरार ज्यांनी अनुभवला त्यांच्यासाठी खंचनाळे आणि त्याच्या परंपरेतील कुस्ती म्हणजे आनंदठेवाच होता. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी या कुस्तीला जाणीवपूर्वक राजाश्रय दिला. रांगड्या मराठी मातीने त्याला दाद दिली; त्यातूनच ‘एक से एक’ मल्लांची फौज कुस्तीपंढरी कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात उभी राहिली. खंचनाळे या सुवर्णकाळाचे साक्षीदार होते. त्या काळात उत्तरेतील म्हणजे पंजाब लाहोरपासूनच्या पैलवानांची कुस्तीत मक्तेदारी होती. याच मल्लांशी झंजवून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर भागातून तशाच दमदार पैलवानांची फौज राजर्षींच्या प्रोत्साहनातून उभी राहिली. खंचनाळे वस्ताद या परंपरेतील खणखणीत नाणे होते. त्यांच्या यशाचा परमोच्च बिंदू म्हणजे पहिल्या हिंदकसेरी किताबाचा सन्मान. खंचनाळे यांच्या त्या यशाने मराठी मल्लांचा दबदबा सिद्ध झाला. ती परंपरा पुढे बराच काळ चालत राहिली. हिंदकेसरी, रुस्तुम-ए-हिंद, महान भारतकेसरी असे अनेक किताब मराठी मल्लांनी ताकद आणि कौशल्याच्या बळावर पटकावले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खंचनाळे यांची कर्मभूमी कोल्हापूर; पण ते मूळचे कर्नाटकातील एकसंब्याचे. सधन शेतकरी कुटुंबातील. त्यांनी अल्पावधीत कुस्तीशौकिनांचे आणि वस्तादांचे लक्ष वेधून घतले. हसनबापू तांबोळी, विष्णुपंत नागराळे, मल्लाप्पा ताडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. कुस्ती हा ताकदीचा, संयमाची परीक्षा पाहणारा खेळ, तसाच कौशल्याचा आणि डोक्‍याने लढायचाही खेळ. यातले डावपेच खंचनाळे यांनी लवकर आत्मसात केले आणि त्यांचे आखाड्यातला उभरता मल्ल म्हणून नाव होऊ लागले. घुटना, एकलंगी, लपेट, एकेरी पट या डावांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी पहिली मोठी कुस्ती मारली, त्याला ६५ वर्षे झाली. मिरजेच्या मैदानात पंजाबच्या ग्यानसिंगला, पाठोपाठ लखनापूरला कर्तारला चीतपट मारून खंचनाळेंनी चुणूक  दाखवली. १९५९ला पहिली ‘महाराष्ट्रकेसरी’ स्पर्धा झाली, तेव्हा खंचनाळे यांना जोड मिळत नव्हती. निकाली कुस्ती करायचीच म्हणून समोर आलेल्या मल्लाला चितपट करून ते ‘महाराष्ट्रकेसरी’ झाले. खंचनाळे नावाचे वादळ देशातील आखाड्यात घोंघावायला लागले. पहिल्या ‘हिंदकेसरी स्पर्धे’तील यशाने खंचनाळे कुस्तीतले हिरोच बनले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘रुस्तम-ए-पंजाब’ बंतासिंगला एकेरी पटावर आस्मान दाखविले. हा अभिमानाचा क्षण खंचनाळे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आला. खंचनाळे अत्यंत चपळ मल्ल होते. प्रतिस्पर्ध्याला समजायच्या आत अनेकदा त्यांनी मैदान मारलेले असायचे. तासन्‌तास चौदंडीत आजमावत रेंगाळत राहणारे पैलवान ते नव्हते. विजेची चपळाई, कमालीची आक्रमकता आणि ताकदीने भारी पैलवनांना चकवणारी डावपेचाची समज यामुळे सुखदेव, इसाराम, बचनसिंग, टायगर, बंतासिंग, चाँद पंजाबी यांसारख्या पैलवानांना त्यांनी काही सेकंदांत वा मिनिटांत अस्मान दाखविले. प्रचंड गाजलेली सादिक पंजाबीसोबतची लढत मात्र तीन तासांनंतर बरोबरीत सोडवली गेली. लाल मातीच्या आखाड्यातील हा सिंह मॅटवर मात्र तसे खणखणीत यश मिळवू शकला नाही. हे नवे तंत्र त्या काळात भारतीय मल्लांना आत्मसात करता येत नव्हते. खंचनाळे यांनी दिल्लीत आठ वर्षे माती आणि मॅट दोन्हींत सराव केला; मात्र ते रमले मातीतच. देशभरातील मैदाने खंचनाळे मारत होते. पहाडी शरीराच्या चटपटीत कुस्त्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या खंचनाळे यांचे आकर्षण पाकिस्तानतही होते. ते विनापासपोर्ट पाकमध्ये गेले. पाकबरोबरच आखाती देशांत, तसेच जर्मनी, फ्रान्समध्येही आखाडा गाजवला. निवृत्तीनंतर नव्या पैलवानांना घडवत राहिले. अशा मल्लाच्या पिढ्यांचे ते वस्ताद बनले. राजाश्रय आणि पाठोपाठ लोकाश्रयावर पोसलेल्या कुस्ती परंपरेचे खंचनाळे पाईक होते. अलीकडच्या काळात मराठी मल्लांच्या मक्तेदारीचे दिवस सरले आहेत. ऑलिंपिक पदक सोडा, ‘हिंदकेसरी’साठीही वाट पाहणे आले आहे. अशा काळात खंचनाळेंची परंपरा स्मरणरंजनापलिकडे जाऊन नव्याने मजबूत करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.

loading image