esakal | अग्रलेख : संकरित युद्धाचे बियाणे! 
sakal

बोलून बातमी शोधा

india_china

हायब्रिड युद्धातील बराचसा भाग हा रणांगणाच्या पल्याडच लढला जात असल्याने त्याला रोखण्यासाठी कुठलीही जागतिक संघटना वा न्यायालय वा लवाद कामी येत नाही.

अग्रलेख : संकरित युद्धाचे बियाणे! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतातील किमान दहाएक हजार अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींवर "डिजिटल' पाळत ठेवून चीनने भविष्यातील हायब्रिड म्हणजेच संकरित युद्धाची जय्यत तयारी सुरू केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा माहितीच्या महाजालातील संचार, त्यांच्या आवडीनिवडींपासून ते व्यवहारापर्यंत सर्व माहितीचे प्रचंड मोठे संकलन करून त्याचा पुढेमागे अस्त्र म्हणून उपयोग करण्याचा हा खटाटोप खर्चिक आणि विश्वव्यापी असा आहे, यात शंका नाही. परंतु, ज्या काळात आपण लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या खरेद्यांच्या करारमदारांमध्ये मग्न होतो, त्याच काळात आपल्या विस्तारवादी शेजाऱ्याने पुढील सर्वंकष युद्धाची सामग्री जमवायला सुरुवात केली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. चीनची विस्तारवादी पावले ही जगभराचीच डोकेदुखी झाली आहे आणि भारतासारखा देश तर थेट शेजारी असल्याने या विस्तारगंडाचा पहिला अडसर ठरतो. परिणामी, भारत आणि चीन यांच्यातील लडाखच्या भूमीतील रण आजही धुमसते आहे. सरहद्दीवर उभयपक्षी सैन्यदले आणून उभी करण्याचा पारंपरिक युद्धातला पवित्रा या घटकेला किरकोळ ठरावा, अशा सर्वंकष युद्धाचे ढग दोन्ही देशांच्या दरम्यान जमू लागले आहेत, ही जाणीव निश्वितच काळजी वाढवणारी. हायब्रिड युद्धासाठी चीनने सुरू केलेल्या तयारीची वृत्ते आल्याने उभय देशांमधला हा संघर्ष किती विकोपाला जातो आहे, हेच दिसून येते. तथापि, हे हायब्रिड किंवा संकरित युद्ध म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुठलेही तंत्र जसजसे विकसित होत जाते, तसतशा त्याच्या आवृत्त्या बदलत जातात. ज्याला सर्वसाधारणत: "जनरेशन' असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, मोबाइल तंत्रज्ञान. टू जी, थ्रीजी, फोरजी, या संज्ञा आपल्याला परिचित आहेतच. तशाच प्रकारे, युद्धतंत्राच्या विकासाचेही टप्पे मानले जातात. सैन्यदलाच्या जोरावर एकमेकांना रणांगणावर भिडणे, हा एक सरळसोट पारंपरिक युद्धाचा प्रकार झाला. छद्मयुद्ध किंवा गनिमी कावा हा संघर्षाचा दुसरा मार्ग. तिसऱ्या प्रकारच्या युद्धात तंत्रज्ञानाच्या साह्याने वेग, अनपेक्षित हल्ले आणि छुप्या पद्धतीने पिछाडीवर मर्मग्राही आघात करण्याचा डाव साधला जातो. चौथ्या टप्प्यात युद्ध हे रणांगणापेक्षा देशात, समाजात, विचारकलहाद्वारे लढले जाते. तेथेही तंत्रज्ञानाचा अवलंब असतोच. सध्या "जी डब्ल्यू' म्हणजेच "फिफ्थ जनरेशन वॉरफेअर'चा काळ चालू आहे. या युद्धात रणांगणावरील संघर्ष असतोच, पण त्याच्या जोडीला संकल्पना आणि संस्कृतींचा झगडादेखील छेडला जातो. सोयीस्कर माहितीचा मारा करून दृष्टिकोनातील बदल साध्य केले जातात, सोयीस्कर नीतीमत्तांचीही मांडणी केली जाते. राजकीय युद्ध हे यातील महत्त्वाचे हत्यार बनते. सत्ताधीश किंवा सत्ताकांक्षी व्यक्ती हाताशी धरून त्यांच्या योगे देशात यादवी घडवून आणण्याची कारस्थानेही तडीला नेण्याचे प्रयत्न केले जातात. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल, अशी उग्र आंदोलने, संप, दंगली, दुर्घटना ठरवून घडवल्या जातात. त्यासाठी प्रसंगी दहशतवादी संघटना किंवा गुन्हेगारी टोळ्यांचीही मदत "विकत' घेतली जाते. याचबरोबर अर्थव्यवस्था खिळखिळी करणारे "हल्ले' वारंवार केले जातात. सायबरयुद्धाची खडाजंगी चालू असतेच. एकंदरित विज्ञान-तंत्रज्ञान पणाला लावून शत्रूची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा हा बहुआयामी डाव असतो. हायब्रिड युद्धाची जागतिक पातळीवर सर्वप्रथम चर्चा झाली, ती रशियाने युक्रेनसंबंधी जी काही पावले उचलली, त्यावेळी. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेनमध्ये रशियाने बहुआयामी युद्ध छेडले होते. सुमारे तेरा वर्षांपूर्वी इराणच्या पाठबळाच्या जोरावर "हिजबुल्ला' या दहशतवादी संघटनेने इस्राईलविरूद्ध छेडलेले युद्धदेखील हायब्रिडच म्हणावे लागेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पारंपरिक युद्ध प्रचंड मनुष्यबळ लागणारे, खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. शिवाय त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप होण्याची शक्‍यता दाट असते. हायब्रिड युद्धातील बराचसा भाग हा रणांगणाच्या पल्याडच लढला जात असल्याने त्याला रोखण्यासाठी कुठलीही जागतिक संघटना वा न्यायालय वा लवाद कामी येत नाही. म्हटले तर युद्ध, अन्यथा काहीच नाही, असा हा सावल्यांचा खेळ आहे. परंतु, पारंपरिक युद्धापेक्षाही तो अधिक परिणामकारक आणि विध्वंसक आहे, यात शंका नाही. पारंपरिक युद्धात मालमत्तेची आणि जीविताची हानी उभयपक्षी बदनामीकारक असते. हायब्रिड युद्धतंत्रात मात्र शत्रू अथवा स्पर्धक राष्ट्राला अंतर्गतत: खिळखिळे आणि अपंग करण्याचा हेतू साधला जातो. अर्थात हे सारे घडवून आणण्यासाठी विचक्षक बुद्धी आणि तंत्रज्ञानावरील हुकूमतीची आवश्‍यकता असतेच. गुप्त माहितीचे साठे चोरणारे उपग्रह, हॅकर्सची फौज, अद्ययावत संगणकीय सामग्री आणि नवनवीन सॉफ्टवेअर यांचा साठा बाळगणे ओघाने आलेच. या असल्या युद्धासाठी मूळ सामग्री लागते ती माहितीची. चीनने हीच माहिती गोळा करण्यात गेले दशकभर घालवले आहे. चीनच्या या हायब्रिड उद्योगाच्या बातम्या देशभर खळबळ माजवत असतानाच दुसरीकडे "ग्लोबल टाइम्स' या चिनी सरकारी मुखपत्राने मात्र "चीन भारताला शत्रूराष्ट्र मानत नाही' अशी मखलाशी केली आहे. हायब्रिड युद्धाचे हे रुजवातीचे पहिले बियाणे मानायला हवे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image