
भारतीय क्रिकेट संघाचा हा दुसऱ्या डावातील धावफलक इतका लाजिरवाणा आहे, की त्यामुळे १९७४ मध्ये भारतीय फलंदाजांनी इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात आणलेला ‘समर ऑफ ४२’ बरा वाटावा!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात परवाचा दिवस उजाडला तो एक दु:स्वप्न सोबत घेऊनच! ऑस्ट्रेलियातील ॲडलेडच्या त्या प्रसिद्ध मैदानावर भारतीय फलंदाजांना शनी वक्री आला होता, की त्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या बॅटीशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चेंडूने छत्तीसच्या आकड्यासारखे वैर धरले होते, याची चर्चा आता प्रदीर्घ काळ होत राहील. मात्र, गुलाबी चेंडूच्या सोबतीने खेळली जाणारी पहिली दिवस-रात्र कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या ईर्षेने भारत आपला दुसरा डाव सुरू करणार, असे वातावरण असताना आणि नाणावलेले फलंदाज मैदानात उतरलेले असूनही प्रत्यक्षात अवघ्या तासा-दीड तासातच आणि ३६ धावांतच संघाचा खुर्दा उडाला. ऑस्ट्रेलियातील बोचरे वारे आणि काकडणाऱ्या थंडीत भारताची फलंदाजीही पार गारठून गेलेली दिसली. या दुःस्वप्नाच्या सावटातून लवकरात लवकर आपला संघ बाहेर कसा येईल, यासाठी आता काही तातडीची पावले उचलावी लागणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा हा दुसऱ्या डावातील धावफलक इतका लाजिरवाणा आहे, की त्यामुळे १९७४ मध्ये भारतीय फलंदाजांनी इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात आणलेला ‘समर ऑफ ४२’ बरा वाटावा! त्या संघात तर सुनील गावसकर यांच्यासारखा डॉन ब्रॅडमनचा कसोटी शतकांचा विक्रम सर्वप्रथम मोडणारा शैलीदार फलंदाज होता. तरीही ही पडझड झाली होती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
खरे तर १९ डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा दिवस! अवघ्या चार वर्षांपूर्वी १९ डिसेंबर याच दिवशी इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्याच संघाने सात बाद ७५९ अशी अभिमानास्पद धावसंख्या फलकावर झळकवत ती कसोटी जिंकली होती. मात्र, नंतरच्या चारच वर्षांत हा अनवस्था प्रसंग बघणे क्रिकेटवर भरभरून प्रेम करणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांच्या नशिबी आले आहे. इंग्लंडमध्ये ४२ ही नीचांकी धावसंख्या नोंदवल्यानंतर काही वर्षांनी गावसकर यांचे ‘सनी डेज’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. ‘त्या दिवशी भारतीय फलंदाजीला काही झाले नव्हते; पण ख्रिस ओल्ड आणि मॅथ्यू अर्नाल्ड यांनी पाच अप्रतिम चेंडू टाकले आणि भारतीय फलंदाजीचा कणाच मोडला,’ असे त्यांनी म्हटले आहे. आजही या दारुण शोकांतिकेनंतर गावसकर यांनी ‘या पडझडीबद्दल भारतीय फलंदाजांना दोष देता कामा नये,’ असे त्याच पठडीतील उद्गार काढून भारतीय फलंदाजांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटकवण्याच्या नादात आपली विकेट गमावणाऱ्या विराटने व्यक्त केलेल्या ‘राईचा पर्वत करू नका!’ या प्रतिक्रियेमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे आणि संघनिवडीपासून ते थेट फलंदाजांच्या शैलीपर्यंत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जबाबदारीने खेळ करीत मैदानावर जम बसविण्याचा प्रयत्न एकाही फलंदाजाने का करू नये, हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्याच मनात आला असेल. भारताचा हा संघ ऑस्ट्रेलियात पोचला, तोच मुळात रणरणत्या उन्हात दमछाक होईपावेतो ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील खेळानंतर. त्यातच सुरुवातीला ५० आणि २० षटकांचे सामने या संघाला खेळावे लागले. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या मैदानावर नांगर टाकून उभे राहण्याच्या ‘मूड’मध्ये जाण्यास या फलंदाजांना काही दिवसांचाही अवधी मिळाला नाही. त्यातच ‘आयपीएल’ आपले यष्टिरक्षण तसेच फलंदाजी यामुळे गाजवणारा के. एल. राहुल यास संघाबाहेर ठेवण्याची ‘दक्षता’ घेण्यात आली होती! चार वर्षांपूर्वी भारताने ७५९ अशी विक्रमी धावसंख्या नोंदवली, तेव्हा याच राहुलने दणदणीत १९९ धावांची खेळी केली होती. शिवाय, रोहित शर्मासारखा दमदार फलंदाज आणि रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू याच ‘आयपीएल’च्या प्रेमात जायबंदी झाले होते. या पार्श्वभूमीवर अनेकांचे आशास्थान पृथ्वी शॉ हेच होते. ‘पृथ्वीमध्ये सचिनचा एक अंश आहे, तर एक अंश वीरेंद्र सेहवागचा! आणि तो चालायला लागतो, तेव्हा तर क्षणभर ब्रायन लाराचाच भास होतो!’ अशी स्तुतिसुमने त्याच्यावर भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी उधळली होती. याच शॉने या कसोटीत दोन डावांत मिळून सहा चेंडूंत चार धावा काढल्या! अर्थात, पहिल्या डावातील विराट तसेच अजिंक्य रहाणे वगळता बाकी कोणासही फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे आता या संघाची संपूर्ण पुनर्रचना आणि तीही विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतत असताना करण्याचे कठीण काम संयोजकांना करावे लागेल. या पार्श्वभूमीवर अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय कसोटी फलंदाजीचा कणा असलेल्या राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात धाडण्याची पुढे आलेली सूचना तातडीने अमलात आणावी, अशीच आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा संपताच आपला इंग्लंडशी मुकाबला होणार आहे. त्यापाठोपाठ वीस षटकांचा ‘वर्ल्ड कप’ही होणार आहे. ‘क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत सामन्याच्या निकालाबाबत काहीच सांगता येत नाही,’ या विजय मर्चंट यांच्या प्रख्यात उद्गारांचा पुनरुच्चार सचिन तेंडुलकरने या पडझडीनंतर केला. पण, प्रश्न भारतीय क्रिकेट संयोजक हा शेवटचा चेंडू पडेपर्यंत थांबणार का, हा आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा