esakal | अग्रलेख :  कायदा आणि कुव्यवस्था !
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख :  कायदा आणि कुव्यवस्था !

गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने निवडणूक प्रचाराला कोणता रंग दिला आहे, तेच दिल्लीतील ताज्या घटनांमुळे अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारांतून देशाच्या बहुभाषिक, बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक संकल्पनेला धक्‍का बसतो आहे.

अग्रलेख :  कायदा आणि कुव्यवस्था !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अवघा देश महात्मा गांधींना पुण्यतिथीच्या दिवशी अभिवादन करत असताना, राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका माथेफिरूने गोळीबार केल्याची घटना धक्कादायक आहे. हातातील पिस्तूल नाचवत सतरा वर्षांचा गोपाल नावाचा तरुण तेथे आला, तेव्हा केंद्रातील मोदी सरकार आणि विशेषत: गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारित असलेले दिल्ली पोलिस हा सारा प्रकार मूकपणे पाहत होते. महात्म्याच्या हत्येनंतर सत्तर वर्षांनी देशातील वातावरण किती प्रदूषित झाले आहे, त्याचीच साक्ष या घटनेमुळे मिळाली आहे. अर्थात, या तरुणाला बेछूट गोळीबार करण्याचे धारिष्ट्य सहजासहजी प्राप्त झालेले नाही. गेल्या महिनाभरापासून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायदा, तसेच ‘एनआरसी’ या केंद्र सरकारच्या निर्णयांविरुद्ध आंदोलन सुरू आहे आणि या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप प्रचारात जातीने उतरले नसले तरी, गृहमंत्री अमित शहा दिवसाकाठी चार-सहा सभा घेऊन वातावरण तापवत आहेत आणि केवळ तेच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण प्रचाराचा भर हा हे आंदोलन ‘राष्ट्रविरोधी’ आहे, यावर आहे. त्यामुळे दिल्लीतील जीवघेण्या थंडीतही राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या आगीत तेल ओतण्याचे काम अर्थखात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी चार दिवसांपूर्वी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराचा या पार्श्‍वभूमीवर विचार व्हायला हवा. भाजपच्या एका जाहीर सभेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को...’ असे अर्धे वाक्‍य उच्चारले आणि जमलेल्या समर्थकांनी त्याचे उत्तर ‘गोली मारो ....’ असे अर्वाच्य पद्धतीने दिले. ठाकूर यांनी ‘गोली मारो....’ हा आपल्या वाक्‍याचा उत्तरार्ध एकदा, दोनदा नव्हे, तर तीन-चार वेळा लोकांकडून वदवून घेतला आणि तेव्हा ते हात उंचावून टाळ्या पिटताना दिसत होते. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास चार दिवस उरलेले असताना, ठाकूर यांनी खरेतर अर्थ खात्याचे राज्यमंत्री या नात्याने त्यात लक्ष घालायला हवे होते. त्याऐवजी ते दिल्लीत चिथावणीखोर भाषणे करीत होते. आता ठाकूर यांच्या सभेतील या घटनेमुळे या ‘गोपाल’ला ‘प्रेरणा’ मिळाली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला असून, गोळीबाराच्या चौकशीच्या मागणीत हा मुद्दा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. अर्थात, भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने होता होईल तेवढे ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नांत आहे. ‘राष्ट्रवादा’च्या मुद्‌द्‌यावरून हे ध्रुवीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेतेच नव्हे, तर दस्तुरखुद्द अमित शहाही आपल्या भाषणांतून करत आहेत. अनुराग ठाकूर यांचेच अनुकरण भाजपचे अनेक नेते करताना दिसत आहेत. साहिबसिंग वर्मा हे जनसंघाच्या काळातील जुने नेते आणि त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपदही भूषविले आहे. त्यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांनी प्रचारसभेत बोलताना ‘दिल्लीतील आंदोलक तुमच्या- आमच्या घरांत घुसून, आपल्या आया-बहिणींवर बलात्कार करतील!’ असे उद्‌गार काढले. त्याशिवाय, उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेते, तसेच मंत्री अशाच प्रकारची चिथावणीखोर वक्‍तव्ये करत आहेत. त्यामुळेच काही तथाकथित ‘देशभक्‍तां’ची माथी फिरली, तर दिल्लीत निवडणुकीच्या तोंडावर अनवस्था प्रसंग गुदरू शकतो. मात्र, यापेक्षाही गंभीर बाब ही भाजपचे प्रवक्‍ते ज्या पद्धतीने ठाकूर यांच्या वक्‍तव्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करत आहेत, ही आहे. ‘गोली मारो...’ हे उद्‌गार ठाकूर यांचे नाहीत, हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. मात्र, श्रोत्यांनी ‘गोली मारो...’ असे उत्तर देताच खरे तर केंद्रातील एक जबाबदार मंत्री या नात्याने ठाकूर यांनी त्यांना रोखायला हवे होते.  

गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने निवडणूक प्रचाराला कोणता रंग दिला आहे, तेच दिल्लीतील आताच्या प्रचाराच्या स्वरूपामुळे अधोरेखित झाले आहे. हा प्रचार विखारी तर आहेच आणि मुख्य म्हणजे देशात आधीच पडलेली दुराव्याची दरी अधिक रुंदावणारा आहे. त्यामुळे देशाच्या बहुभाषिक, बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक संकल्पनेला धक्‍का  बसतो आहे. अर्थात, एकीकडे देशहिताचे नारे द्यायचे आणि त्याचवेळी समाजात फूट पाडण्याचा ‘खेळ’ लावायचा, अशा धोरणामुळे हे प्रकार वाढत चालले आहेत. हे सगळे देशाला कोठे घेऊन जाणार आहे? याचा गांभीर्याने विचार करून चिथावणीखोर वक्‍तव्ये करणाऱ्या नेत्यांना मोदी यांनीच वेळीच आवर घालायला हवा.

loading image