esakal | अग्रलेख :  भाजपचे भारूड 
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख :  भाजपचे भारूड 

"कोरोना'मुळेच तोडात बोटे घालण्यास बंदी असली,तरी तो नियम मोडून महाराष्ट्राच्या 12-13कोटी जनतेची बोटे केव्हा तोंडात गेली,ते त्यांचे त्यांनाही कळाले नाही!

अग्रलेख :  भाजपचे भारूड 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातून मन विषण्ण करून सोडणाऱ्या बातम्या सतत येत असताना, किमान महाराष्ट्रातील जनतेचे घटकाभर का होईना, मन रमविण्याचे काम चंद्रकांतदादा पाटील आणि एकनाथभाऊ खडसे यांनी केले आहे! मात्र, त्यामुळे "चाल, चरित्र और चिंतन !' असा डिंडीम गेली चार दशके वाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पितळ मात्र उघडे पडले आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे कमालीचे अस्वस्थ झालेले नाथाभाऊ आणि त्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी थेट भगवानगडावर घेतलेल्या मेळाव्यामुळे प्रदेश भाजपमधील खदखद बाहेर आलीच होती. आता विधान परिषदेची उमेदवारीही पदरात न पडल्यामुळे नाथाभाऊंनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांना जबाब देण्यासाठी चंद्रकांतदादा रिंगणात उतरले आहेत. या दोहोतील "कलगीतुरा' हा अर्थातच "कोरोना'मुळे जारी झालेल्या शारीरिक दूरस्थतेचे सारे संकेत पाळून, टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून पार पडला! "हा नियम नसता तर आपण थेट जळगावात गेलो असतो आणि नाथाभाऊंनी आपल्याला दोन थोबाडीत दिल्या असत्या, तरी त्यांचा आनंदाने स्वीकार केला असता', असेही सांगून चंद्रकांतदादा मोकळे झाले. हा सारा खेळ पाहून मग "कोरोना'मुळेच तोडात बोटे घालण्यास बंदी असली, तरी तो नियम मोडून महाराष्ट्राच्या 12-13 कोटी जनतेची बोटे केव्हा तोंडात गेली, ते त्यांचे त्यांनाही कळाले नाही! 

.ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकमात्र बरे झाले! नेहरू-गांधी या दोन कुटुंबांच्या घराणेशाहीला प्राणपणाने विरोध करणाऱ्या भाजपमध्येच ती कशी राजरोसपणे सुरू आहे, त्याचे तपशीलवार दाखले या सुंदोपसुंदीमुळे मिळाले. नाथाभाऊंना सात वेळा आमदारकी आणि दोन वेळा मंत्रिपद मिळाले. त्याशिवाय, त्यांच्या कन्येस जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद, आधी जाहीर झालेला उमेदवार मागे घेऊन त्यांच्या सुनेला खासदारकी आणि पत्नीला "महानंद'चे अध्यक्षपद अशी सत्तापदे कशी बहाल करण्यात आली, त्याचा पाढा चंद्रकांतदादांनी यानिमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला ऐकवला! त्यानंतर नाथाभाऊ गप्प बसणे शक्‍यच नव्हते. त्यांनीही मग रावसाहेब दानवे हे खासदार आणि त्यांचा मुलगा आमदार, तर राधाकृष्ण विखे हे आमदार आणि त्यांचा मुलगा खासदार आणि दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांचे पिताश्री आमदार होतेच; शिवाय त्यांच्या काकू शोभाताईही मंत्री होत्या, याची आठवण दादांना करून दिली. त्यामुळे आता निदान पुढचे काही महिने तरी भाजप नेत्यांना नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या घराणेशाहीबद्दल बोलण्यास जागा उरलेली नाही! प्रमोद महाजन यांची कन्या खासदार आणि गोपीनाथ मुंडे यांची एक कन्या खासदार आणि दुसरी मंत्री, हे घराणेशाहीचे वारस नाथाभाऊंना आठवले नसणार, असे शक्‍यच नाही. मात्र, विधानसभेतील पराभवापासून पंकजा मुंडे याही आपल्याप्रमाणेच "नाराजमान्य नाराजश्रीं'च्या या गोटात सामील असल्यामुळे, नाथाभाऊंनी ते उल्लेख जाणीवपूर्वक केले नसावेत! विधानसभा निवडणुकीत देवेन्द्रभाऊ आणि चंद्रकांतदादा यांनी नाथाभाऊ, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आदी नेत्यांना घरी बसवल्यामुळे आता महाराष्ट्रात तरी फडणवीस यांचा शब्द दिल्लीतील भाजप श्रेष्ठी अखेरचा मानत आहेत, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. शिवाय, चंद्रकांतदादांनीही नाथाभाऊंना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याचा अनाहूत सल्ला दिला आहे. हा सल्ला म्हणजेच नाथाभाऊंना भाजपने दिलेला स्पष्ट इशारा आहे. आता यापुढे किमान नाथाभाऊंना तरी भाजपमध्ये कोणतेच सत्तापद मिळणार नाही, याचेच संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत. 

मात्र, चंद्रकांतदादांनीच गेल्या मार्चमध्ये नाथाभाऊंच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी केली होती. त्यांनीच हा गौप्यस्फोट केला. नाथाभाऊंनी मार्गदर्शक मंडळात जावे, असे आता ठरले असेल, तर मग अवघ्या दीड महिन्यापूर्वी त्यांना उमेदवारी देण्याचा विचार तरी कसा झाला? की, दिल्लीकर श्रेष्ठी नाथाभाऊ व पंकजा यांना उमेदवारी देणार नाहीत, याची खात्री असल्याने त्यांची नावे मुंबईहून पाठवण्यात आली होती? की, आता सारवासारव म्हणून दादा तसे सांगत आहेत? असे अनेक प्रश्‍न आहेत आणि त्यांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत, याची खात्री असल्यामुळेच दादा ठामपणे तसे सांगत आहेत? त्यानंतरचे एक उपनाट्य म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी नाथाभाऊंना कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी दिलेले आवतण! कॉंग्रेसला तरी ही असली जुनाट खोडे पदरात घेऊन काय साधावयाचे आहे? शिवाय, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याच्या आरोपातून अद्याप नाथाभाऊंची सुटका झालेली नाही, याचे विस्मरण थोरातांना झाले आहे काय? बाकी नाथाभाऊ पुढे काय करणार, यात राज्यातील जनतेला कवडीचाही रस असण्याची शक्‍यता नाही. ते पक्षाला देत असलेले इशारे हा आता नित्याचाच विषय झाल्याने त्यातील धार केव्हाच बोथट झाली आहे, हे नाथाभाऊ लक्षात घेणार काय? की पक्षांतर्गत जुगलबंदीचे प्रयोग असेच चालू ठेवणार?