अग्रलेख : परतीचे फटके

return-rain
return-rain
Updated on

नवरात्र तोंडावर आले, तरी परतीचा पाऊस आपली पाठ सोडायला तयार नाही. शिवाय, जाता जाता हा पाऊस आपल्याला जोरदार फटके देऊन जात आहे. हे फटके जसे आपण निसर्गावर गेल्या काही दशकांत केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे बदललेल्या ऋतुचक्राचे आहेत, त्याचबरोबर ते आपल्या नगररचनेतील नियोजनशून्यताही ठळकपणे अधोरेखित करत आहेत. परतीच्या या पावसाचे हे तडाखे प्रामुख्याने विंध्याखालच्या दक्षिण भारताला बसले असले, तरीही तेलंगण आणि विशेषत: दोन दशकांपूर्वी ‘सायबराबाद’ म्हणून गाजवण्यात आलेल्या हैदराबादची यामुळे अपरिमित हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे हिमायतसागर या हैदराबादचे भूषण असलेल्या रमणीय जलाशयाचे १७ पैकी १३ दरवाजे उघडणे भाग पडले आणि मुसा नदी दुथडी भरून वाहू लागली. रस्त्यांच्या नद्या झाल्या आणि किमान २० हजारांहून अधिक घरांत पाणी घुसले. या पावसाने आतापावेतो तेलंगणात किमान ३२ बळी घेतले असून, त्यातील १८ दुर्दैवी जीव हे एकट्या हैदराबादमधील आहेत. महाराष्ट्राच्या काही भागातही हाहाकार उडाला. पुण्यासारख्या शहरातही रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि सखल भाग पाण्याखाली गेला. या तडाख्यात सोलापूर व अन्य ठिकाणी प्राणहानी झाली आहे, तर मध्य व दक्षिण महाराष्ट्र, तसेच कोकण परिसरात धुवाधार पावसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याबरोबरच मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान केले. द्राक्ष, डाळिंब, ऊस, तसेच कांदा या पिकांबरोबरच भातशेती व सोयाबीन यांचे जबर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हालअपेष्टांना पारावार उरलेला नाही. ‘कोरोना’च्या सावटातून राज्य जरासे सावरत असतानाच, परतीच्या पावसाचा हा तडाखा बसला आहे. 

खरे तर कोकणाला या ‘कोरोना’काळातच ‘निसर्ग’ वादळाला सामोरे जावे लागले होते.  सरकारने या आपत्तीतून सावरण्यासाठी कोकणवासीयांना मदतीचा हात देऊ केला खरा; पण त्यातून शासकीय दिरंगाई, तसेच बेजबाबदार आणि बेफिकीर मनोवृत्तीचेच दर्शन घडले. ‘निसर्ग’ वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेही अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, यास काय म्हणावे? एकीकडे ग्रामीण भागात ही दुरवस्था झाली असताना, राज्यातील प्रमुख  शहरांचे नियोजन कसे फसले आहे, तेही या परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे. रस्तोरस्ती पाण्याचे लोंढे वाहणे, हे आता मुंबईकरांप्रमाणेच पुणेकरांनाही नवीन राहिलेले नाही. गेल्या वर्षीच पुण्यात जोराचा पाऊस होताच रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आणि थेट गृहनिर्माण वसाहतींमध्ये पाणी शिरले, त्यामुळे प्राणहानीही झाली आणि असंख्य मोटारी वाहून गेल्या. त्यानंतर बुधवारीही तेच झाले. पुण्यात गटारे आणि नाले बुजवून तेथे अनधिकृत बांधकामे उभी करण्याच्या प्रकारांबरोबरच थेट मुळा-मुठेच्या पात्रातही बेसुमार बांधकामे झाली आहेत. राजकीय आशीर्वाद, तसेच प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, त्याला चाप काही लावला जात नाही आणि त्यामुळे मुंबईपाठोपाठ राज्यातील या आणखी एका महानगरातील नियोजनाची लक्‍तरेच बाहेर आली. यंदाचा हा परतीच्या पावसाचा तडाखा इतका मोठा आहे की त्यामुळे केवळ महानगरेच नव्हे, तर राज्यातील लहानसहान शहरांमध्येही पावसाचे रस्त्यांवरून वाहणारे पाणी काही तास कायम राहिले. याचा अर्थ आपण या गावांच्या विकासात पाण्याचा निचरा, ही बाब लक्षातच घ्यायला तयार नाही, याशिवाय दुसरा असू शकत नाही. अर्थात, या पावसाचा जोर यावेळी अधिकच होता आणि माण ही दुष्काळी भागातील नदीही दुथडी भरून वाहू लागली, एवढी एकच बाब त्याची साक्ष आहे. खरा प्रश्‍न आपण या साऱ्याचा कधी तरी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही, हा आहे. ‘कोरोना’पाठोपाठ सरकारपुढे उभे राहिलेले हे मोठे आव्हान आहे. गेल्या काही दशकात निसर्गनिर्मित वादळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हे का होऊ लागले आहे, त्याबाबत पर्यावरणतज्ज्ञांनी अनेकदा दिलेल्या इशाऱ्यांवर विकासाच्या गोंडस आवरणाखाली पडदा टाकण्याचे काम जगभरातील सर्वपक्षीय सरकारे कायम करत आली आहेत. पण आपण वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, अशा आपत्तींना आपल्याला वारंवार तोंड द्यावे लागणार, ही बाब या परतीच्या पावसाने पुन्हा एकवार स्पष्ट केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा या परतीच्या पावसाचा संदेश आहे. आता नुकसानभरपाई, मदत वगैरे उपचार पार पाडले जातीलच. खरा प्रश्‍न आपण या साऱ्यांपासून काही धडा घेऊन, नियोजनात काही परिवर्तन घडवून आणणार की नाही, हा आहे. पण ऐकतो कोण?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com