esakal | अग्रलेख : आतले आणि बाहेरचे!
sakal

बोलून बातमी शोधा

sushant-singh-rajput

सुशांतसिंहने आत्मघाताचे पाऊल का उचलले? त्याच्या आत्मघाताला कुणी व्यक्ती जबाबदार आहे की चित्रसृष्टीतला वर्गविग्रह आणि वर्चस्ववाद? हा आत्मघात होता की सरळसरळ हत्या? या साऱ्यांची उत्तरे यथावकाश मिळतीलही.

अग्रलेख : आतले आणि बाहेरचे!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आकाशीचा पूर्णाकृती चांदवा मनोहर दिसतो. परंतु, त्याची उजळ बाजू तेवढी आपल्या पृथ्वीतलावरील मर्त्य मानवांना दिसत असते. त्याच्या काळ्या, अंधाऱ्या बाजूचे काय? अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटून गेला आहे. या महिनाभराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीच्या मनभावन चंद्राची दुसरी बाजू आता उजेडात येऊ लागली आहे. लखलखत्या चंदेरी दुनियेची ही कृष्णछाया मात्र फारशी मनोरम आणि सुसह्य नाही. सुशांतसिंहने आत्मघाताचे पाऊल का उचलले? त्याच्या आत्मघाताला कुणी व्यक्ती जबाबदार आहे की चित्रसृष्टीतला वर्गविग्रह आणि वर्चस्ववाद? हा आत्मघात होता की सरळसरळ हत्या? या साऱ्यांची उत्तरे यथावकाश मिळतीलही. गुन्हा झालाच असेल तर गुन्हेगाराला शिक्षादेखील होईल. परंतु, तूर्त तरी या आत्महत्येच्या प्रकरणाला आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेकीचे जे स्वरूप प्राप्त झाले आहे, ते क्‍लेशकारक आहे. या निमित्ताने पेटलेल्या रणकंदनात जुने हिशेब चुकते करण्याची ऊर्मी दिसते, तसेच वितंडवादाच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याची राजकीय चलाखीही दिसून येते.

चंदेरी दुनिया खरोखर मायावी अशीच. इथे काय नाही? राग, लोभ, द्वेष, संघर्ष, जुलूम, छळ, कपट, स्पर्धा, पैशाची भूक, सत्ता, अमर्याद लालसा, अप्पलपोटेपणा, संशय, गटबाजी, अशा शेक्‍सीपीअरच्या गडदरंगी शोकांतिकेत आढळावेत असे सारे बटबटीत रंग इथे सहजी सापडतात. पडद्यावरच्या सप्तरंगांच्या मागे हे असले काहीबाही खेळ चाललेले असतात. गुणवत्ता, प्रतिभा, दर्जा, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती असले मोठमोठाले शब्द वापरून एरवी जनसामान्यांचे डोळे आणि कान दिपवणारी ही सेलेब्रिटी मंडळी प्रत्यक्षात कुठले खेळ खेळत असतात, हे या निमित्ताने चव्हाट्यावर आले, हे बरेच झाले. या दुनियेत आढळत नाही तो एकमेव रंग परस्परसन्मानाचा किंवा आदरभावनेचा. इथे तोंडदेखली दाद विरेविरेतोवर जीवघेणी ईर्ष्या आपले रंग दाखवू लागते. म्हणूनच गावगप्पा, गॉसिप आदी सवंग गोष्टींच्या मलिद्यावरही हे रंगीबेरंगी विश्व व्यवस्थित पोसले जाते. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हे सारे ऐरणीवर आले, हे एकाअर्थी बरेच झाले. बॉलिवूडच्या अंतरंगाचे खरे रूप जनसामान्यांना बघायला मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

सुशांतसिंह हा कोणीही गॉडफादर नसलेला, आधार किंवा चित्रपटीय पार्श्वभूमी नसलेला यशस्वी गुणी कलावंत होता. पण आगापीछा नसल्याने तो बाहेरचा असल्याचा शिक्काही त्याच्यावर होताच. पिढ्यानपिढ्या चित्रसृष्टीत ठाण मांडून बसलेली खानदाने आणि बॉक्‍स ऑफिस मेहेरबान झाल्याने गडगंज झालेल्या काही मोजक्‍या चित्रकंपन्यांचा बॉलिवूडमध्ये कायम दबदबा आहे, हे काही आता गुपित नाही. किंबहुना, ही या चंदेरी विश्वाची परंपराच आहे. ही प्रस्थापित मंडळी आतली मानली जातात. या आतल्यांना बाहेरच्यांनी आपल्या तालावर नाचावे, असे वाटते आणि तसे घडले नाही तर बाहेरचा बाहेरच फेकला जातो, असे एक सर्वमान्य गृहितक आहे. या आतल्यांच्या दादागिरीला बाहेरच्यांना तोंड द्यावेच लागते. नपेक्षा अपयश ठरलेले! सुशांतसिंहचा बळी अशाच साठमारीत गेला, अशा स्वरूपाचे शेरेबाजीवजा आरोप काही फिल्मी मंडळींनीच केले. त्यात कंगना राणावतसारखी तारका आहे, आणि ए. आर. रेहमानसारखा विश्वविख्यात संगीतदिग्दर्शकदेखील आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुशांतसिंहसारख्या उगवत्या सिताऱ्याचा बळी बॉलिवूडमधील प्रस्थापितांनी पद्धतशीरपणे घेतला, असे कंगनासारख्या आणखी काही अभिनेत्यांचेही म्हणणे आहे. यांतील बव्हंशी सितारे हे पहिल्या फळीतील नाहीत. त्यामुळे त्यांच्या शेरेबाजीला आपली व्यवस्था कितपत किंमत देईल, ही शंकाच आहे. परंतु, ए. आर. रेहमानसारखा प्रतिभावान संगीतकार बॉलिवूडमधील कंपूशाहीचा जाहीर उल्लेख करतो, तेव्हा त्याची दखल घेणे भाग पडते. या कंपूशाहीमुळेच हिंदीतील अनेक चांगले चित्रपट आपल्याला मिळू शकले नाहीत, अशी खंत रेहमान यांनी व्यक्त केली. यात काही प्रमाणात तथ्य आहे, हे मान्य केले, तरी काही प्रश्न उरतातच. गुणवत्तेला पर्याय असू शकत नाही, हे घासून घासून गुळगुळीत झालेले वाक्‍य हीच मंडळी फिल्मी मुलाखतींमधून फेकत असतात, हे डोळ्यांआड कसे करावे? प्रत्येक कलाकार आपल्याला पोषक अशी इकोसिस्टिम शोधत असतो. रेहमान यांना दक्षिणेतील चित्रसृष्टीने आतले मानले, तेथे आम्हाला कंपूशाही करून कामे मिळू देत नाहीत, असा आरोप कुण्या प्रथितयश पंजाबी अथवा बंगाली संगीतकाराने करावा का? प्रत्येक प्राणीमात्रास आपला अधिवास प्यारा असतो आणि तो टिकवण्यासाठी त्याची धडपड असते. चित्रसृष्टीला वेगळे नियम असण्याचे कारण नाही. चित्रपटसृष्टी हा इतर अनेक उद्योग क्षेत्रांसारखाच उद्योग आहे. फरक एवढाच की या उद्योगाला गुरुत्वाकर्षणाचे एक असे केंद्र नाही. विविध भोवऱ्यांचा हा एक़ समूह म्हणता येईल. त्यात एकमेकांशी घर्षण ठरलेलेच. अभिनय ही या उद्योगाची एक मुद्रा तेवढी आहे. बाकी चयापचयाची क्रिया अभिनिवेश आणि निवेश (गुंतवणूक) या दोन घटकांवर चालत असते. या तिन्ही घटकांमधले असंतुलन तेवढे सुशांतसिंहच्या दुर्दैवी अंतामुळे सामोरे आले. बाकी आतले आणि बाहेरचे हा झगडा चिरंतन आहे. त्याला अंत नाही.

loading image