अग्रलेख: सत्ताकारणाचा जलिकट्टू !

अग्रलेख: सत्ताकारणाचा जलिकट्टू !

कार्यकर्त्यांचे जाळे वाढवून, विचारसरणीचा प्रसार करून वेगवेगळ्या राज्यांत पक्षाचा प्रभाव वाढविणे हा जसा पक्षविस्ताराचा एक दूरचा पण ‘राजमार्ग’ असतो, तसाच दुसराही एक भाग असतो. तो म्हणजे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी फोडून आपल्या तंबूत ओढणे, मित्रपक्षांना आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्यांच्याशी सोयीनुसार तडजोडी करणे. आपल्या व्यवस्थेत काही प्रमाणात असे होणार, हे समजून घेतले तरी सध्या हा दुसरा प्रकार राजकारण्यांच्या जास्तच आवडीचा झाला दिसतो. देशव्यापी अस्तित्व निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून भाजपने या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे वळविण्याचा भाजपने सपाटाच लावला आहे. तर तमीळनाडूतही अण्णा द्रमुक पक्षाबरोबर युतीचा प्रयत्न सुरू आहे, तसेच यशस्वी चंचुप्रवेशासाठी त्या राज्यात एक ‘चेहरा’ भाजपला हवा आहे, असे दिसते.

तमिळ सुपरस्टार रजनीकांतने गेली काही वर्षे राजकीय रंगमचावर अवतीर्ण होण्यासंबंधात वेगवेगळ्या घोषणा करत होता. मात्र, अलीकडे आपले ते मनसुबे आपण ‘ईश्वरी संकेता’मुळे बासनात बांधून ठेवत आहोत, असे जाहीर केल्यामुळे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या द्रविडी राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसू लागले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या निकटवर्ती व्ही. शशिकला यांची चार वर्षांच्या तुरुंगवासातून मुक्तता झाल्यामुळे भाजपच्या आशा-आकांक्षांना पुनश्च अंकूर फुटले आहेत. खरे तर रजनीकांतने तमिळ राजकीय रंगमंचावरून ‘एन्ट्री’आधीच ‘एक्झिट’ घेतली, तेव्हाच अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ‘आपण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला सत्तेचा चतकोरच काय नितकोर वाटाही देणार नाही’, अशी जाज्ज्वल्य घोषणा केली होती. द्रमुक हा पक्ष काँग्रेसप्रणीत ‘युपीए’त सहभागी असल्यामुळे भाजप, तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी अर्थातच अण्णाद्रमुकबरोबर जयललिता यांच्या निधनापासूनच संधान बांधून होता. मात्र, पलानीस्वामी यांची ही स्पष्ट भूमिका आणि रजनीकांतची माघार, यामुळे मावळलेला आशेचा किरण शशिकला यांच्या आगमनामुळे पुन्हा प्रज्वलित झाल्याची भावना भाजप नेत्यांच्या मनात जागृत झाल्याचे दिसते. त्यामुळेच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येत्या विधानसभा निवडणुका आपण अण्णाद्रमुकसोबतच लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शशिकला यांची तुरुंगवासातील सुटकेचा मुहूर्त साधून त्याचे भाचे दिनकरण यांनी काढलेल्या ‘अम्मा मुक्कल मुनेत्र’ या पक्षाच्या मुखपत्रातून अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. ‘अण्णाद्रमुक आता शशिकला यांच्या नेतृत्वाखाली नव्याने भरारी घेऊ शकतो!’ असा सूर या मुखपत्राने लावला असून त्याचवेळी अण्णाद्रमुक पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाची संभावना ’गद्दार’ अशी केली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अशाच या हालचाली असून, त्याचा अर्थ शशिकला आता अण्णाद्रमुक ताब्यात घेण्यास सज्ज झाल्या आहेत, असाच लावला जातो. पलानीस्वामी यांनी भाजपला झटकून टाकल्यानंतरच्या या घडामोडी भाजपसाठी आशादायी असल्याचे मानले जाते. रजनीकांतला हाताशी धरून भाजप जे काही करू पाहत होते, तेच आता शशिकला यांना उघड वा छुपा पाठिंबा देऊन करणार, हे उघड आहे. त्याचवेळी गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने देशभरात राबवलेल्या राजनीतीनुसार अण्णाद्रमुक पक्षात होता होईल, तेवढी फूट पाडण्याच्या कारवायाही भाजपने सुरू केल्या आहेत. त्याची साक्ष गेल्याच आठवड्यात अण्णाद्रमुकचे एक नेते व्ही. व्ही. सेंटिलनाथन यांच्या भाजप प्रवेशामुळे मिळाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘सरळ मार्गाने भाजपला सहकार्य करणार नसाल तर आम्ही तुमचे घरच फोडू’, असाच हा खेळ आहे. जयललिला यांच्या डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या निधनानंतर पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी शशिकला यांची नियुक्ती झाली असली, तरी नंतरच्या काही महिन्यांतच त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आता अण्णाद्रमुकची सर्व सूत्रे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या हातात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दिनकरन यांनी कितीही खटपटी-लटपटी केल्या तरी अण्णाद्रमुक पुन्हा शशिकला यांना जवळ करेल काय, हा प्रश्नच आहे. शशिकला यांच्यासाठी अण्णाद्रमुकने आपले दरवाजे उघडलेच, तर त्यांच्या हाती पक्षाची संपूर्ण सूत्रे देण्याशिवायपर्याय उरणार नाही. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर २०१९मध्ये  लोकसभा निवडणुकीत मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे द्रमुकच्या स्टॅलिन यांनी आगामी निवडणुकीत अण्णा द्रमुकपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या परिस्थितीत आणखी एक तामिळ ‘सुपरस्टार’ कमल हसनही बस्तान बसवू पाहत आहे. त्याच्या मदतीला ‘आम आदमी पक्षा’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल धावून गेले असून कमल हसनच्या ‘मक्कल निधी मायम’ पक्षाशी त्यांनी समझोता केला आहे. आपले तमिळ प्रेम दाखवण्यासाठी दिल्लीत तमिळ अकादमी सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तामिळनाडूत खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टूची आठवण व्हावी, असा हा सत्तेचा खेळ आहे. तामिळनाडूतील खेळात हुकमी एक्का हा शशिकलाच आहे, असे अनेकांना आणि विशेषत: भाजपला वाटत आहे. सध्या त्या तुरुंगवासातून इस्पितळे आणि आता क्वारंटाईन अशा प्रवासात आहेत! थेट मैदानात उतरल्यावर त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, यावर द्राविडी राजकारणाची दिशा ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com