अग्रलेख :  धुमसता बंगाल

अग्रलेख :  धुमसता बंगाल

कला, साहित्य, संगीत अशा बहुविध क्षेत्रांत बंगाल हा देशातील आघाडीचा प्रांत होता. तेथील भद्रलोकात वैचारिक जडणघडणही त्याचबरोबरीने सुरू होती, ही कहाणी गेल्या काही वर्षांत सुरू असलेला राजकीय हिंसाचार बघता आजच्या पिढीला दंतकथाच वाटू शकेल. अर्थात, राजकीय हाणामाऱ्या या तुरळक प्रमाणात का होईना बंगाली जनतेला नव्या नाहीत. अवघ्या दहा वर्षांपूर्वीच्या हाणामाऱ्या तेथील डाव्या विचारांचे ‘कॉम्रेड’ आणि काँग्रेसजन यांच्यात होत. आता त्या दोन्ही पार्ट्या बंगाली रंगमंचाच्या विंगेत गेल्या असून, आताची रणधुमाळी ही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या ‘केडर’मध्ये आहे. मात्र, गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या मोटारींच्या ताफ्यावर जी काही तुफानी दगडफेक झाली, ती बघता चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या वातावरणात होतील, याचीच चुणूक बघावयाला मिळाली. या दगडफेकीत विजयवर्गीय, भाजपचे प. बंगाल अध्यक्ष दिलीप घोष तसेच भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले. किमान दोन-अडीच डझन मोटारींच्या काचांचा चुराडा झाला. त्यामुळे ‘इव्हीएम’ लढाईने आता राजकीय रंगमंचावरून थेट ‘पथनाट्या’चाच मार्ग स्वीकारल्याचे दिसते. राजकीय हिंसाचारावरून ममता बॅनर्जी या डाव्याना बोल लावत असत. पण त्यांचा पक्षही काही अहिंसेचा पुजारी वगैरे नसून तोही हाणामाऱ्या आणि तोडफोडीत पुढे आहे, हे यापूर्वीही दिसून आले आहे. राज्यात त्यांचीच सत्ता आहे आणि गुरुवारी झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी तो पक्ष झटकून टाकू शकत नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प. बंगाल जिंकण्यासाठी असेल-नसेल तेवढी ताकद पणाला लावणाऱ्या भाजपचे सारेच दिग्गज मैदानात उतरले आहेत. रस्त्यावरील हाणामारी आरोप-प्रत्यारोपांच्या मार्गाने पुढे जात आहे. त्यात राज्यपाल जगदीप धनकर हेही हिरिरीने सामील झाल्याचे त्यांच्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले. प. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराची तसेच ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेची केंद्राने दखल घेणेही तितकेच आवश्‍यक होते आणि राज्यपालांकडून त्याबाबतचा अहवाल हा केंद्रीय गृह खात्याने मागवलाही आहे. तसेच मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना केंद्राने चर्चेसाठी येत्या सोमवारी पाचारणही केले आहे. त्यानंतर राज्यपालांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गर्भित इशारे देण्याची गरज होती काय, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. ममतादीदींच्या गेल्या दहा वर्षांच्या राजकीय गुंडगिरीला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप भाजप सातत्याने करत आहे. मात्र, नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची संभावना ‘भाजप की नौटंकी’ अशा शब्दांत करताना ममतादीदींनी ‘चढ्ढा, नड्डा, फड्डा, बध्धा‘ असे ‘बाहेरचे’ लोक बंगालमध्ये रोज येत आहेत, अशी पुस्तीही जोडली आणि वातावरण तापले. मुख्यमंत्र्यांना देश एक आहे, अशी आठवण करून देतानाच ‘विस्तवाशी खेळू नका!’ असा इशारा थेट राज्यपालांनी जाहीरपणे दिला. मात्र, त्याचवेळी ‘एक का बदला हम चार से लेंगे!’ असे शोलेटाइप डॉयलॉग मारणारे भाजपचे दिलीप घोष यांच्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. एक मात्र खरे, की आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात बंगालची कायदा-सुव्यवस्था वाहून जाता कामा नये. खरे तर काही महिन्यांपासून ममतादीदींनी ‘जीएसटी’चा परतावा, कोरोना काळात केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत बिगर-भाजप राज्यांबाबतचा भेदभाव, सुधारित नागरिकत्व कायदा आणि नवे कृषिविषयक कायदे यावरून भाजपविरोधात तुफान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर बंगालमधील हिंसाचार तसेच तृणमूल कार्यकर्त्यांची ही गुंडगिरी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळेच हा राज्य सरकारप्रणित हिंसाचार असल्याची टीका भाजप नेते जोमाने करत आहेत. मात्र, निवडणुका जसजशा जवळ येतील, तसा हिंसाचार वाढणार नाही, हे बघण्याची जबाबदारी ममतादीदींबरोबरच केंद्राचीही आहे. तथापि, केंद्रातील भाजप सरकार त्यासंदर्भात कितपत निष्पक्ष भूमिका घेईल, याबाबत केवळ ‘तृणमूल’च नव्हे तर अन्य पक्षांच्याही मनातली शंका मोदी सरकारचा गेल्या पाच-सात वर्षांतील कारभार पाहता रास्तच म्हणावी लागेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 डाव्यांची थोडीथोडकी नव्हे तर १९७७ पासून २०११पर्यंत म्हणजे सलग ३४ वर्षे सत्ता राहिलेल्या या राज्यावर आपण कबजा करू शकतो, असा विश्वास भाजपमध्ये निर्माण झाला तो २०१९मधील लोकसभा निवडणुकीतल्या मोठ्या यशानंतर. त्यापूर्वी २०१६मधील विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा आणि १०टक्के मते घेणाऱ्या भाजपने पुढच्या तीन वर्षांत लोकसभेच्या निवडणुकीत ४२ पैकी १८ जागा जिंकताना घसघशीत ४० टक्के मतेही मिळवली. तेव्हा ‘तृणमूल’ला २२, तर काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या. डाव्यांना तर भोपळाही फोडता आला नव्हता. सर्वपक्षीय वाचाळवीरांनी आपल्या जीभांना लगाम घालून लोकांची माथी आणखी भडकणार नाहीत, याची काळजी घ्यायला लागेल. अन्यथा, एकेकाळच्या या विचारी आणि कलासंपन्न राज्याची खालावलेली प्रतिमा अधिकच काळवंडून जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com