अग्रलेख : ‘फेसबुक’ला चटका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

व्हॉट्‌सॲपच्या नव्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’विरोधात उठलेले रान फेसबुकला अपमाहिती आणि धादांत असत्याचा चटका देऊन गेले. या चटक्‍यातून फेसबुकने शिकलेला धडा पुढच्या धोरणाचा भाग राहतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्‌सॲपने वापरकर्त्यांसाठी लागू केलेली नवी ‘प्रायव्हसी पॉलिसी’ १५ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. जगभरात व्हॉट्‌सॲपच्या नव्या धोरणाने माजवलेल्या गोंधळामुळे आणि वापरकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे दिसते. केवळ वैयक्तिक वापरकर्तेच नव्हे; तर कार्पोरेट कंपन्यांनीही संवादासाठी पर्यायांचा शोध सुरू केला. व्हॉट्‌सॲपने त्यांच्या वेबसाइटवर खुलासे करूनही या ‘ॲप’भोवती निर्माण झालेले गडद धुके कमी झाले नाही; परिणामी कंपनीने ‘प्रायव्हसी पॉलिसी’ स्थगित केली. डिजिटल जग हवे तसे आणि रोज नव्याने घडवू पाहणाऱ्या मार्क झुकेरबर्ग यांच्या ‘फेसबुक’ला मिळालेला हा धडा आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही सेवेतील माहितीच्या देवाणघेवाणीबद्दल वापरकर्त्याला इत्थंभूत माहिती देणे म्हणजे ‘प्रायव्हसी पॉलिसी’. कंपनी वापरकर्त्याकडून कोणती माहिती घेते आणि तिचा पुढे कसा वापर होतो, असा आणखी सोपा अर्थ. गेल्या चार दशकांत तंत्रज्ञानावर आधारित सेवा विलक्षण झपाट्याने वाढल्या. माणसाने प्रत्यक्ष येऊन सेवा पुरविण्याऐवजी तंत्रज्ञानाने ती जागा घेतली. डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास झाला, तशी सेवांमधील मानवी संवादाची जागा डिजिटल संवादाने घेतली. संवादातून माहितीची देवाणघेवाण होते आणि माहितीतून उत्पादनांचा, सेवांचा दर्जा विकसित होत राहतो. सेवांचे डिजिटल स्वरूप आणि त्या पुरवण्यासाठी माहितीचे चलन हा बदल जगाने किंचित खळखळ करत स्वीकारला. ही खळखळ केली ती प्रामुख्याने युरोपने. मात्र अन्य भागांत; विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये निमूटपणाने बदल स्वीकारला गेला. त्यामुळे, ‘प्रायव्हसी पॉलिसी’ स्वीकारणे हा फक्त एका क्‍लिकपुरता विषय राहिला. मग गेल्या दहा दिवसात ‘प्रायव्हसी पॉलिसी’त अशी काय उलथापालथ घडली, की व्हॉट्‌सॲपलाही माघार घ्यावी लागली? वास्तविक व्हॉट्‌सॲपचे संबंधित धोरण म्हणजे प्रचंड उलथापालथ नव्हती. फेसबुक कंपनीने अब्जावधी डॉलर मोजून व्हॉट्‌सॲप २०१४ ला विकत घेतल्यापासून ‘प्रायव्हसी पॉलिसी’ फेसबुकला सोयीचीच बनवली आहे. ती आपण २०१६मध्येच स्वीकारली आहे. त्या धोरणानुसार व्हॉट्‌सॲपचे वापरकर्ते मेसेज आणि कॉलवगळता अन्य माहिती फेसबुकला देतच आहेत. त्यात नवे काही नव्हते. झुकेरबर्ग आणि फेसबुक उच्चरवात वारंवार एकच गोष्ट गेली पाच वर्षे सांगत आहेत आणि ती म्हणजे, व्हॉट्‌सॲपवर आम्ही जाहिराती दाखवणार नाही. याचा अर्थ व्हॉट्‌सॲपच्या महसुली उत्पन्नात आणि कंपनीच्या थेट नफ्यात सहभाग असणार नाही. त्याचवेळी, ‘व्हॉट्‌सॲप बिझनेस अकाउंट’ नावाची व्यवस्थाही अंमलात आणत आहेत आणि या व्यवस्थेचे किमान पावणेदोन कोटी ग्राहक आहेत. खासगी कंपन्यांना, छोट्या-मोठ्या उद्योगांना त्यांच्या सेवा-उत्पादनांच्या प्रचार-प्रसारासाठी व्हॉट्‌सॲपने बिझनेस अकाउंट नावाची व्यवस्था देऊन किमान दोन वर्षे होऊन गेली आहेत. नवी ‘प्रायव्हसी पॉलिसी’ या बिझनेस अकाउंट वापरकर्त्यांच्या अधिक सोयीची आणि त्यांना वापरकर्त्यांच्या अधिक जवळ आणणारी आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲप या तिन्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर संयुक्तपणे करून बिझनेस अकाउंट वापरकर्त्यांना माहितीची, सेवा पुरवण्याची आणि बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याची अधिक सोयीस्कर व्यवस्था नव्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’त आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्य वापरकर्त्यांची हवी ती माहिती घेण्याचा आणि त्यानुसार जाहिराती दाखविण्याचा फेसबुकचा मूळ उद्योग आहे. या पार्श्वभूमीवर अचानक जगभरात अविश्वास निर्माण होण्यात फेसबुकची घटत चाललेली विश्वासार्हता हे प्रमुख कारण समोर येते. अमेरिकेतील २०१६च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून ते अधूनमधून कोट्यवधी वापरकर्त्यांच्या ‘चोरीला जाणाऱ्या’ माहितीपर्यंत अनेक प्रकारांनी फेसबुकबद्दल अविश्वास निर्माण होत चालला आहे. दोन अब्जांहून अधिक लोकांच्या रोजच्या जगण्यातील महत्त्वाच्या माहितीवर एका खासगी कंपनीची मक्तेदारी आहे. त्यावरही जगभरात प्रश्न उपस्थित होत आहेत. हे प्रश्न आधी तज्ज्ञांच्या विशिष्ट वर्तुळांपुरते मर्यादित होते; ते आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरही पोहोचले आहेत. जे तंत्रज्ञान विकसित करण्यावर फेसबुकसारख्या तंत्रज्ञानातील बलिष्ठ कंपन्या अब्जावधी डॉलर खर्च करतात, तेच तंत्रज्ञान त्यांच्याच अंगावरही धावून येत आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲपवरून रोजच्या रोज निर्माण होणारी अक्षरशः लाखो गीगाबाईट्‌स माहिती कोणतीही खातरजमा न करता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरवली जाते. आजपर्यंत माहितीच्या या वहनाला ‘प्लॅटफॉर्म’ म्हणून फेसबुक हात झटकून टाकत आहे. कोणतीही खातरजमा न केलेली माहिती कुठल्या स्तरावर अपमाहितीत आणि धादांत असत्यात रुपांतरीत होते याच्याशी ‘प्लॅटफॉर्म’ म्हणून आमचा काही संबंध नसल्याचे फेसबुकचे धोरण राहिले आहे. अपमाहिती आणि धादांत असत्याने वास्तविक जगाची अपरिमित हानी होत असतानाही खिसा गरम राहात असल्याने फेसबुकचे काही नुकसान होत नाही. मात्र, व्हॉट्‌सॲपच्या नव्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’विरोधात उठलेले रान फेसबुकला अपमाहिती आणि धादांत असत्याचा चटका देऊन गेले. या चटक्‍यातून फेसबुकने शिकलेला धडा पुढच्या धोरणाचा भाग राहतो का, हे पाहणे वापरकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about WhatsApp new privacy policy facebook