esakal | अग्रलेख : "योगीं'ची मुक्‍ताफळे 
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : "योगीं'ची मुक्‍ताफळे 

आपल्या राज्यातील कामगारांना बोलावताना,उत्तर प्रदेश सरकारची परवानगी तर घ्यावी लागेलच;शिवाय त्यांच्या सामाजिक,आर्थिक,तसेच कायदेशीर बाबींची हमी घ्यावी लागेल,असे जाज्ज्वल्य उद्‌गार त्यांनी काढले आहेत.

अग्रलेख : "योगीं'ची मुक्‍ताफळे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आपल्या नावामागे "योगी' असे बिरूद मिरवणारे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना खरे तर वास्तवाचेच नव्हे, तर भूत आणि भविष्याचेही ज्ञान योग सामर्थ्यामुळे प्राप्त असेल, असेच कोणालाही वाटेल. पण त्या विश्वासाला त्यांनीच तडा दिला आहे. त्यांना भूत, भविष्य तर सोडाच, पण वर्तमानाचेही आकलन धड झालेले नाही, हेच त्यांनी पत्रकारांपुढे रविवारी उधळलेल्या मुक्‍ताफळांमुळे स्पष्ट झाले आहे. देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या स्थलांतरित मजुरांमध्ये अर्थातच "योगीं'च्या उत्तर प्रदेशातील कष्टकऱ्यांची संख्या अन्य कोणत्याही राज्यांतील कामगारांपेक्षा अधिक आहे. त्याच्या कारणमीमांसेत जाण्याची ही वेळ नाही. मात्र, दोन वेळच्या रोजीरोटीसाठी स्थलांतर करणे नशिबी आलेल्या या मजुरांना अन्य राज्ये सापत्नभावाने वागवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "योगीं'च्या या मुक्‍ताफळांचा रोख प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दिशेने असल्याचे उघड आहे आणि त्याला देशातील या सर्वांत प्रगत राज्यात या कष्टकऱ्यांना गेली काही दशके सातत्याने मिळत गेलेल्या रोजगाराच्या संधीच कारणीभूत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून, हे कष्टकरी मजूर मोठ्या आनंदाने आपले गाव, आपले कुटुंब आणि आपला जमीन-जुमला सोडून केवळ मुंबई व महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठीच तेथे गेले, अशा भ्रमात "योगी' वावरत आहेत. त्यामुळेच यापुढे आपल्या राज्यातील कामगारांना बोलावताना, उत्तर प्रदेश सरकारची परवानगी तर घ्यावी लागेलच; शिवाय त्यांच्या सामाजिक, आर्थिक, तसेच कायदेशीर बाबींची हमी घ्यावी लागेल, असे जाज्ज्वल्य उद्‌गार त्यांनी काढले आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी-धंदा वा व्यवसाय यासाठी जाणाऱ्यांना काही "परमिट' सक्‍तीचे करावे काय, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. याचा स्पष्ट अर्थ देशाची घटना आणि अन्य कायदेकानू यांना न जुमानता हे तथाकथित "योगी' उत्तर प्रदेश हा स्वतंत्र देश असल्याचे मानू लागले आहेत, यापेक्षा वेगळा होत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"योगीं'च्या या बेताल सुटलेल्या वारूला लगाम घालण्याचे पहिले काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. "महाराष्ट्रात यापुढे कोण्या उत्तर प्रदेशातील नागरिकाला नोकरीसाठी यायचे असेल, तर त्याला प्रथम आमची (म्हणजेच "मनसे'ची), महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल', अशा तिखट शब्दांत राज यांनी "योगीं'ना उत्तर दिले आहे. राज यांची स्थलांतरित मजुरांविषयीची भूमिका सर्वश्रुत आहे आणि परवानगी देणारे ते कोण, असा प्रश्‍न आहेच, तरीही "योगी' यांना वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी होतीच. "योगी' असोत की राज; त्यांच्या या सवाल-जवाबामुळे एक घटनात्मक मुद्दा अजेंड्यावर आला आहे. "योगी' यांची ही भूमिका ही आपल्या देशाच्या घटनेतील संघराज्याच्या संररचनेवर आघात करणारी आहे. याच तरतुदीचा आधार घेत जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 कायमचे बासनात बांधून टाकणारे भाजपश्रेष्ठी आता या मुक्‍ताफळांबद्दल "योगी' यांचे कान उपटणार की नाही, हा प्रश्‍न आहे. परराज्यांतून दमून-भागून, उपाशीपोटी आपल्या घराच्या ओढीपोटी आलेल्या या मजुरांना राज्याच्या सीमेवरच थांबवून ठेवणाऱ्या "योगीं'ना अचानक हा प्रेमाचा उमाळा कसा काय आला? तर त्याचे उत्तरही स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील हजारो रोजगार याच कष्टकऱ्यांवर अवलंबून आहेत आणि आता ही दोन महिन्यांची ठाणबंदी शिथिल होत, उद्योग-व्यवसायांची चक्र हलू लागतील, तेव्हा याच कामगारांची गरज महाराष्ट्र व मुख्यत्वे मुंबईला भासणार आहे. त्यामुळे मुंबईला आणि महाराष्ट्राला अडचणीत आणण्याच्या एकमेव उद्देशाने या "योगीं'नी हे पिल्लू सोडून दिले असणार. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आपल्या खंडप्राय देशात विकासाचा, तसेच औद्योगिकरणाचा समतोल राखण्यात सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना गेल्या सात दशकांत अपयश आले आहे. त्यामुळे "बिमारू' राज्यांतील कामगारांना मुंबई, तसेच महाराष्ट्राकडे धाव घेणे भाग पडले आहे, याकडे हे "योगी' केवळ क्षुद्र राजकारणापोटी दुर्लक्ष करत आहेत. खरे तर हा प्रश्‍न हा कोणत्याही संबंधित दोन राज्यांनी कायमच परस्परसामंजस्याने सोडवायला हवा आणि सध्याच्या संकटाच्या काळात तर त्याची विशेष गरज आहे. मात्र, हाती लागेल त्या विषयाचे वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याचे राजकीय भांडवल करावयाचे, यात सध्या भाजपचे देशभरातील नेते रस घेत असल्याचे दिसत आहे. बातम्यांमध्ये, त्यामुळे असेच "कोरोना'बाह्य विषय येत राहिले की त्यामुळे "कोरोना'ला आळा घालण्यात केंद्राला आलेल्या अपयशावर पडदा पडून जाईल, असाही हेतू त्यामागे असू शकतो. मात्र, "योगीं'ची ही मुक्‍ताफळे ही त्यापलीकडची आहेत. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीच त्यांना चाप लावायला हवा. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image