esakal | अग्रलेख  :  सोनियांचाच दिन!
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख  :  सोनियांचाच दिन!

लोकसभा निवडणुकीत लागोपाठ झालेल्या दुसऱ्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हाही ‘गांधी... गांधी...’ असाच गजर पक्षात तळाच्या पातळीपासून थेट हायकमांडपर्यंत झाला.

अग्रलेख  :  सोनियांचाच दिन!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे खरेच! मात्र, काँग्रेसला तो अनुभव अवघ्या वर्षभरात आला आहे. लोकसभा निवडणुकीत लागोपाठ झालेल्या दुसऱ्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हाही ‘गांधी... गांधी...’ असाच गजर पक्षात तळाच्या पातळीपासून थेट हायकमांडपर्यंत झाला. अखेर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्षपदाची धुरा चिरंजीवांच्या खांद्यावर देणाऱ्या सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष म्हणून वर्षभरानंतर सूत्रे स्वीकारावी लागली होती. त्यानंतर वर्षभरात काँग्रेस नेतृत्वाला म्हणजे सोनिया-राहुल-प्रियांका या गांधी कुटुंबियांना लक्ष्य करून जुन्या-जाणत्या तसेच काही उगवत्या-उभरत्या अशा २३ जणांनी पक्षाच्या कारभाराबाबत काही सवाल उपस्थित करताच, पुनश्‍च एकवार ‘गांधीनामाचा गजर’ कार्यकारिणीच्या बैठकीत होणे, यात नवल नव्हते. मात्र, पक्षाला पूर्णवेळ आणि जनतेशी थेट संपर्क असलेला अध्यक्ष हवा, नेतृत्व हे सामूदायिक हवे आणि कारभार पारदर्शी हवा, या गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक आदी नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना सामोरे जाण्याचे धाडस गांधी कुटुंबीय दाखवू शकले नाहीत. १३५ वर्षांच्या पक्षात दरबारी राजकारण आणि ‘जी हुजूर!’ रिवाज रूजल्याचेच द्योतक आहे. त्यामुळेच तूर्तास सोनिया गांधी याच ‘हंगामी’ अध्यक्ष राहणार, हेच पाच-साडेपाच तासांच्या ‘व्हर्च्युअल’ बैठकीचे फलित आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक मात्र खरे, की १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस कार्यकारिणीतच सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्याचा उल्लेख केल्यानंतर २१ वर्षांनी सोनिया गांधी यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. त्यावेळी पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला प्रश्‍न विचारण्याचे धाडस होत नव्हते. आता पक्षात तसे होऊ लागले आहे, हा मोठा बदल आहे. पण त्याविषयी स्वागतशील दृष्टिकोन अद्यापही निर्माण झालेला नाही. काँग्रेस किती आणि कशी दुबळी होत गेली आहे, ते यावरून स्पष्ट  होते. बैठकीची सुरुवात सोनिया गांधी यांनी स्वत:ची राजीनाम्याची ‘ऑफर’ देऊन केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी या पत्रातील धगधगत्या वास्तवाला सामोरे जाण्याऐवजी, सोनिया गांधी आजारी असताना असे पत्र लिहिलेच कसे जाऊ शकते, या भावनिक मुद्याकडे चर्चेचा रोख वळवला. त्यानंतर कार्यकारिणीतील सर्व जण त्यांचीच री ओढू लागले. आश्‍चर्याची बाब म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या वास्तवाचे भान असलेल्या नेत्यानेही सोनियांनाच अध्यक्षपद न सोडण्याची गळ घातली. खरे तर सध्या काँग्रेसपुढे नेतृत्वाचे संकट जसे आहे, त्याचबरोबर विचारधारेचा सवालही उभा आहे आणि संघटना तर पुरती ढेपाळली आहे. या परिस्थितीत खरे तर या नेत्यांनी उभ्या केलेल्या सवालांना निर्भीडपणे सामोरे जात पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करण्याची संधी या निमित्ताने कार्यकारिणीला मिळाली होती. २०१४ मधील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी नियुक्‍त केलेल्या ए. के. ॲण्टनी समितीचा अहवाल अध्यक्षांनी म्हणजेच सोनिया गांधी यांनी गुलदस्त्यातच ठेवला. त्यानंतर पक्षापुढील आव्हानांची चर्चा करण्यासाठी नेमलेल्या वीरप्पा मोईली यांच्याही अहवालाची तीच गत झाली. त्यामुळे या जर्जर झालेल्या आणि समाजाशी एकेकाळी असलेली नाळ तुटलेल्या या पक्षाला नवी दिशा आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याशी झुंज देण्यास आवश्‍यक ती उमेद तसेच ऊर्जा कोण देणार, यावर चर्चा करायलाही या पक्षाचे मुखंड तयार नाहीत, हेच स्पष्ट झाले. याचे मूळ संघटना बांधणीपेक्षा,पक्षाला नवा विचार देण्यापेक्षा केवळ या घराण्याची ‘हाजी हाजी’ करूनच जमतील तेवढी सत्तापदे हासील करण्याच्या प्रवृत्तीत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वातंत्र्यानंतर नेहरू-गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचे प्रयत्न अपवादाने का होईना, हे घडलेच होते. पंडित जवाहरलाल नेहरू लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असताना, काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्यावर नेहरूंनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्‍त केला होता. त्यानंतर टंडन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले. इंदिरा गांधी यांच्याशी आणीबाणीपूर्व काळात असलेले आपले मतभेद चंद्रशेखर, मोहन धारिया यांनी कधीच लपवून ठेवले नव्हते आणि राजीव गांधी यांच्यावर तर त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी ‘बोफोर्स’ प्रकरणावरून मळभ उभे केले होते. त्याचीच परिणती अखेर राजीव गांधी सत्तेवरून पायउतार होण्यात झाली होती. सोनिया गांधी यांना थेट नव्हे पण त्यांच्या कारभाराचा मुद्दा पुढे करून अप्रत्यक्षरीत्या का होईना, आव्हान देण्याचा झालेला पक्षहिताच्या दृष्टीने रास्त असलेला प्रयत्न फसल्याचे आज दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसमधील खदखद संपुष्टात आली आणि आता हे सगळे नेते ‘एकदिलाने गाती नवी गाणी...’ अशा पद्धतीने झडझडून कामास लागतील, असा बिलकूलच नाही. काँग्रेसच्या कारभारास आव्हान देणाऱ्या या नेत्यांनीही काही आक्रमक पवित्रा घेतला नाही; कारण पवार यांच्याप्रमाणे बाहेर पडून नवे काही उभारण्याची ताकद यापैकी कोणातच नाही. त्यामुळे त्यांनाही अखेर कार्यकारिणीच्या या निर्णयानंतर पुनश्‍च एकवार गांधी घराण्याची तळी उचलण्यापलीकडे दुसरा पर्याय उरला नाही. काँग्रेसची खरी शोकांतिका हीच आहे आणि गांधी घराण्यालाही पक्षहितापेक्षा त्यातच आनंद आहे, हाच या बैठकीचा मथितार्थ आहे.

loading image
go to top