esakal | अग्रलेख : आधाराच्या शोधात कॉंग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-gandhi

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्ष अनेक बाबतीत चाचपडताना दिसतो आहे. असे का होते, याचा विचार व्हायला हवा.

अग्रलेख : आधाराच्या शोधात कॉंग्रेस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्ष अनेक बाबतीत चाचपडताना दिसतो आहे. असे का होते, याचा विचार व्हायला हवा.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये जे काही घडू पाहत आहे, ते बघितले की आपली घसरलेली पत परत मिळवण्यासाठी काँग्रेस देशवासीयांना स्वत:ची नव्याने ओळख करून देऊ पाहत आहे, की अंतर्गत मतभेदांपोटी आलेल्या वैफल्याचे दर्शन घडवत आहे, ते कळावयास मार्ग नाही. राजकीय आव्हानाला भिडण्यासाठी आत्मविश्वासाने पक्ष वाटचाल करीत आहे, असे चित्र निर्माण होण्यापेक्षा तो पक्ष चाचपडतो आहे, असेच जाणवते. पश्चिम बंगालमध्ये ‘आयएसएफ’ या एका कट्टरतावादी मुस्लिम संघटनाबरोबर स्थानिक नेत्यांनी केलेल्या आघाडीस, काँग्रेसमधल्याच ‘नाराजवंतां’च्या गटाचे एक प्रमुख नेते आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळे प. बंगाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्या ‘तू तू मै मै’चा आखाडा रंगला आहे. त्याचवेळी डावे पक्ष, आयएसएफ आणि काँग्रेस यांच्या आघाडीची एक सभा झाली असली, तरी या आघाडीतील जागावाटपाचा तिढा पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे तीन आठवडे उरले असतानाही अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे.

गुजरातेतून आलेल्या बातम्या या काँग्रेस नेते तसेच कार्यकर्ते यांचे मनोबल अधिकच खच्ची करणाऱ्या आहेत. गुजरातेतील प्रमुख महानगरांमधील महापालिकांबरोबरच आता जिल्हा पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या वाट्याला दारूण पराभव आला आहे. आसामात नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने तेथेही ध्रुवीकरणाचा भारतीय जनता पक्षाला हवाहवासा वाटणारा मार्ग अधिकच मोकळा करून दिला आहे. हे सारे पक्षातील वैचारिक गोंधळ अधोरेखित करणारे तर आहेच; त्याचबरोबर पक्षातील खंबीर नेतृत्वाचा अभावही ठळकपणे सामोरे आणत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘आणीबाणी लादणे ही आमची मोठीच चूक होती,’ असा जाहीर कबुलीजवाब देऊन पक्ष आता आपली नवी ओळख करून देऊ पाहत असल्याचे सूचित केले आहे. अर्थात प्रत्यक्ष मतदानास महिना-दीड महिना उरलेला असताना ही नवी ओळख जनतेच्या कितपत पचनी पडेल, हा प्रश्च आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या साऱ्या गोंधळाची सुरुवात, गांधी कुटुंबियांच्या पक्षावरील वर्चस्वाच्या विरोधात गेल्या ऑगस्टमध्ये आवाज उठवणाऱ्या ‘जी-२३’ या गटातील एक नेते गुलाम नबी आझाद यांच्या जम्मूतील सत्काराच्या वेळी झालेल्या भाषणांतील विसंवादी सुराने झाली आणि आता बंगालमधील आघाडीस त्याच गटातील आनंद शर्मा यांनी घेतलेल्या आक्षेपाने त्यात भर पडली. त्यामुळे संतप्त झालेल्या अधिररंजन चौधरी यांनी शर्मा तसेच पक्षाचे राज्यसभेतील माजी नेते गुलाम नबी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, ते भाजपला खूश करण्यासाठी असले आक्षेप घेत असल्याचा आरोप केला. त्यास पार्श्वभूमी आहे ती गुलाम नबी यांच्या राज्यसभेतील निवृत्ती सोहळ्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची. त्यावेळी मोदी यांनी डोळ्यात अश्रू आणून, गुलाम नबी यांची काँग्रेस करत असलेल्या अवहेलनेबद्दल खंत व्यक्त केली होती. ती अर्थातच या पाच राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर केलेली खेळी होती, हेच आता या काँग्रेसअंतर्गत आरोप-प्रत्यारोपांमुळे दिसून येऊ लागले आहे. एकीकडे दिशाहीन आणि अंतर्गत मतभेदांमुळे पोखरलेली काँग्रेस आणि त्याविरोधात सूत्रबद्ध पद्धतीने राजकीय आखणी करून मैदानात उतरलेला भाजप यांच्या या लढाईचा निकाल काय असेल, ते तर देशातील आम आदमीही सांगू शकेल. 

 एक मात्र खरे की बंगाल काँग्रेसच्या नेत्यांवर आता आपणच ओढवून घेतलेल्या या ‘आयएसएफ’बरोबरच्या आघाडीचे समर्थन करणे भाग पडत आहे. हे सारे चित्र बंगालमध्ये निव्वळ ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपच्या पथ्यावरच पडणारे आहे. पण त्याचे  भान काँग्रेस नेत्यांना उरलेले नाही, असेच या पक्षांतर्गत सुंदोपसुंदीमुळे म्हणावे लागते. मात्र, त्यामुळेच या गांधी घराण्याच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहणाऱ्या नेत्यांनी बंगालमधील या प्रतिगामी मुस्लिम गटाबरोबर केलेल्या आघाडीस जाणीवपूर्वक आक्षेप घेत पक्षाची एके काळची ‘सेक्युलर’ प्रतिमा उजळ करण्याचे प्रयत्न तर सुरू केले नाहीत ना, असाही मुद्दा पुढे येऊ शकते. राहूल गांधीही आणीबाणी ही आमची चूकच होती, असे सांगत नेमके तेच करू पाहत आहेत. हा वैचारिक गोंधळ आणि दिशाहीन राजकारण तसेच गुजरातेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारूण पराभव, यामुळे राजकीय बाजारपेठेतील काँग्रेसची पत दिवसेंदिवस अधिकाधिक घसरत चालली आहे. त्यामुळे बंगाल असो की तामिळनाडू येथील जागावाटपातही काँग्रेसची किंमत कमी कमी होत चालली आहे.

तामिळनाडूत काँग्रेसने मागणी केलेल्या जागा देण्यात द्रमूक आडकाठी आणत असताना, बंगालमध्येही डावे पक्ष तेच डावपेच आखत आहेत. देशभरातील काँग्रेसच्या प्रतिमेला यामुळे आणखीनच तडे जात असताना, गेल्या ऑगस्टमध्ये नाईलाजाने हंगामी अध्यक्षपदाची कारकिर्द पुढे सुरू ठेवावी लागलेल्या सोनिया गांधी यांचे मौन हेही आश्चर्यकारक आहे. किमान या निवडणुकांच्या तोंडावर तरी त्या या ‘जी-२३’ गटाशी संवाद साधतील आणि साऱ्यांना एकत्रपणे प्रचारात उतरवतील, ही आशाही फोल ठरत आहे. त्यामुळेच सध्या तरी कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाचा आधार आणि जनाधार या दोन्हींच्या शोधात असल्याचे दिसते.

Edited By - Prashant Patil

loading image