esakal | अग्रलेख : ढिलाईची किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : ढिलाईची किंमत

महाराष्ट्रभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाउनचे संकट पुन्हा येऊ शकते, अशी भीती आहे. तथापि, अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावध होऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना पाळल्या जातील हे पाहायला हवे.

अग्रलेख : ढिलाईची किंमत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाउनचे संकट पुन्हा येऊ शकते, अशी भीती आहे. तथापि, अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावध होऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना पाळल्या जातील हे पाहायला हवे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेचे सूतोवाच करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरकारनेही केवळ ठाणबंदीसारख्या सरधोपट आणि सर्वच दृष्टीने घातकी उपायांचा विचार न करता कोरोनाविरुद्धचा लढा अधिक कल्पक रीतीने, प्रभावीरीत्या लढण्याची गरज आहे. कोरोनाने भारतात आणि महाराष्ट्रात पाय ठेवले त्याला वर्ष होत आले तरी तो काढता पाय घेईना अशी स्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळेच ‘सावध ऐका पुढल्या हाका, मागचा धडा नाही का पुरा’, असे विचारण्याची वेळ आली आहे. कोरोनाने सगळ्यांनाच घरकैद केले. लॉकडाउनने जग थांबले. उद्योगाची आणि अर्थकारणाची चाके ठप्प झाली. ज्यांच्या सग्यासोयऱ्यांनी कोरोनामुळे अखेरचा श्‍वास घेतला त्यांच्या डोळ्यातील पाणी आटलेले नाही. ज्यांचे रोजगार गेले, अन्नान्नदशा झाली त्यांचे संसार उघड्यावर आले. कर्जाचे डोंगर उपसता उपसता उसासा घ्यायलाही उसंत मिळेना, अशी स्थिती झाली. एवढे सगळे अनर्थ कोरोनाने घडवूनही धडा घेतलेला नाही, अशी स्थिती सध्या महाराष्ट्रासह देशात दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारीच मंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंतच्या प्रशासकीय बैठकीत जनतेला,‘लॉकडाउन पाहिजे की, थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचंय’, अशा रोकडा सवाल उपस्थित केला व परिस्थितीचे भान आणून दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठाणबंदीमुळे अनेकांच्या जीवनाची घडी पुरती विस्कटली आहे. अनेक देशोधडीला लागले, तर कंबरडे मोडलेले उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यस्था अजून पुरते सावरलेले नाहीत. त्यामुळेच ठाणबंदी हे प्रकरण कोणालाच परवडणारे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांत तीन आकड्यात रुग्ण आढऴत आहेत. जिथे शुन्यापर्यंत केसेस घटल्या, तिथे पुन्हा वेगाने वाढत आहेत. पूर्व विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाण्यात कोरोनामुळे जमावबंदी लावण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. आता ग्रामीण भागात यात्रा, जत्रांचा हंगाम तोंडावर आहे. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर सुमारे अडीच लाख लोकांनी औरंगाबादला हजेरी लावली. 
सार्वजनिक ठिकाणांसह मंगल कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सरकारी कार्यालये व खासगी आस्थापनांत तसेच लोकल, बस प्रवासात सॅनिटायझर, मास्क वापरा, थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी हे सगळे मापदंड पाळा, हे सांगूनही त्याची सर्रास पायमल्ली होत आहे. रस्ते आणि भिंती पिचकाऱ्यांनी रंगताहेत. विद्रुपीकरणासह कोरोनाला आमंत्रण देणाऱ्यांना दंडही केला जात नाही. बाजारपेठा, मॉल, मंगल कार्यालये, सार्वजनिक वाहनांतून प्रतिबंधात्मक मापदंडांची पायमल्ली केल्यामुळे ही ठिकाणे कोरोनाचे सुपरस्प्रेडर होताहेत. दुसरीकडे घटलेल्या चाचण्या, ताप, सर्दी, पडशासारख्या आजाराकडे हंगामी आजार समजून खासगी डॉक्‍टरांकडच्या उपचारांमुळे रोगाच्या प्रसाराची नीटशी कल्पना येत नाही. कोरोना प्रतिबंधक लस आली असली तरी ज्यांना ती अग्रक्रमाने द्यायची, तेच तिच्याकडे पाठ फिरवत आहेत. तिच्याबाबतचे गैरसमज दूर करणे, शंकांचे निरसन करून, लोकांना ती घेण्यास प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. लसीकरणाचा पुढचा रखडलेला टप्पा शक्‍य तितक्‍या लवकर सुरू करण्याकडेही सरकारने लक्ष द्यावे. लस घेतली म्हणजे कोरोनापासून वाचलो, आपल्याला वज्रकवच मिळाले, ही भावनाही बळावताना दिसते. त्यामुळे बेफिकिरी वाढू शकते, त्याबाबतही प्रबोधन गरजेचे आहे. 

‘बिनधास्तपणा, बेफिकिरीने कोरोना वाढतो आहे. दुसरी लाट आली तर रुग्णसंख्या, मृत्यूदर वाढेल, मुळातच आरोग्य यंत्रणा तणावाखाली आहे,’ अशा शब्दांत सावध करण्याचा प्रयत्न ‘आयसीएमआर’चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर केलेला आहे. थंडीची लाट, मराठवाडा, विदर्भात घटलेले तापमान आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांची झालेल्या पायमल्लीने कोरोनाचा प्रसार वाढतोय, असे निरीक्षण राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नोंदवले आहे. थोडक्‍यात, सरकारचे कोरोनाशी सामना करण्याकरता दायित्व वाढले आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी सुरू केलेली केंद्रे अधिकाधिक सक्षम, सुसज्ज करणे आवश्‍यक आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर आणि अन्य कर्मचारीसंख्या पुरेशी असेल हे पाहिले पाहिजे. ऑक्‍सिजन, रुग्णवाहिकांची कमतरता दूर करायला हवी. औषधांचा पुरेसा साठा आणि त्यांचा काळाबाजार रोखणे याला अग्रक्रम दिला पाहिजे. 

लॉकडाउनकाळातील स्थितीतून निदर्शनाला आलेल्या कमतरता आणि त्रुटी दूर करणे, अनुभवातून शहाणे होत प्रशासकीय कामकाजातील कमतरता दूर करणे गरजेचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिले पाहिजे. याच काळात परीक्षांचा हंगाम येतोय. त्यांची वेळापत्रके जाहीर होत आहेत. सगळे निर्धोकपणे पार पाडायचे असेल, तर लॉकडाउन कोणालाच परवडणारा नाही. त्याचे भान ठेवून कोरोनाशी दोन हात करण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे पाळणे महत्वाचे आहे.

लॉकडाउनने सगळ्यांची होरपळ झाली आहे. उद्योग, व्यवसायाची चाके थांबली की, येणारी दैन्यावस्था, ससेहोलपट न परवडणारी आहे. घरादारापासून राज्य, देशापर्यंत सगळ्यांचे अर्थकारण हे खुळखुळणाऱ्या पैश्‍यावरच असते. औषधालादेखील पैसे नसतील तर कुटुंबासह कच्चीबच्ची उघड्यावर येतात, याचा धडा आधीच मिळालेला आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणात आणि सर्वदूर सावधगिरी बाळगली पाहिजे.

Edited By - Prashant Patil

loading image