esakal | अग्रलेख : थॅंक्‍स टू द बॉल!
sakal

बोलून बातमी शोधा

diego-maradona

आपला भारत हा काही फुटबॉलवेड्यांचा देश नव्हे. गोवा, पश्‍चिम बंगाल आणि केरळ, अशी मोजकी राज्ये सोडली; तर या खेळाचे फारसे कौतुक कुठे नसते. आपण क्रिकेटवाले! पण, तरीही ऐंशी-नव्वदीच्या दशकात युवावस्थेत असलेल्या किंवा वयाच्या त्या टप्प्यात येऊ घातलेल्यांच्या घरात, त्या काळी एका जगदविख्यात फुटबॉलपटूचे पोस्टर हमखास असे. किमान वहीच्या वेष्टनावर तरी ही छबी नक्कीच दिसे. गोरागोमटा, ठेंगणाठुसका, कुरळ्या केसांचा, तोंडभरून हसणारा, निरागस चेहऱ्याचा ‘द गोल्डन बॉय’ दिएगो अर्मांदो मॅरादोना!

अग्रलेख : थॅंक्‍स टू द बॉल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आपला भारत हा काही फुटबॉलवेड्यांचा देश नव्हे. गोवा, पश्‍चिम बंगाल आणि केरळ, अशी मोजकी राज्ये सोडली; तर या खेळाचे फारसे कौतुक कुठे नसते. आपण क्रिकेटवाले! पण, तरीही ऐंशी-नव्वदीच्या दशकात युवावस्थेत असलेल्या किंवा वयाच्या त्या टप्प्यात येऊ घातलेल्यांच्या घरात, त्या काळी एका जगदविख्यात फुटबॉलपटूचे पोस्टर हमखास असे. किमान वहीच्या वेष्टनावर तरी ही छबी नक्कीच दिसे. गोरागोमटा, ठेंगणाठुसका, कुरळ्या केसांचा, तोंडभरून हसणारा, निरागस चेहऱ्याचा ‘द गोल्डन बॉय’ दिएगो अर्मांदो मॅरादोना! अर्जेंटिनासारख्या दक्षिण अमेरिकी देशाला फुटबॉलच्या विश्वात महाशक्ती म्हणून लौकिक मिळवून देणारा एक महासितारा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निळ्या उभ्या पट्ट्यांचा राष्ट्रीय सदरा घालून तो मैदानात उतरला, की तिथल्या अटलांटिक महासागरात नित्यनेमे निर्माण होणारी सारी वादळे जणू एकसमयावच्छेदेकरून मॅरादोनाच्या पायात येऊन विसावायची. त्याच्या पायात साकळलेला तो वादळवात मग मैदानामध्ये जगभरातल्या फुटबॉलवेड्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडायचा. देशोदेशी टीव्हीच्या पडद्याला नाक लावून बसलेल्या मंडळींची टाळकी भिरमिटून जायची. आरोळ्या-कल्लोळाने दाहीदिशा दुमदुमून जायच्या. मॅरादोना हे त्या उन्मादाचेच दुसरे नाव होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयाच्या साठीला आलेल्या दिएगो मॅरादोनाने बुधवारी रात्री पृथ्वीतलावरील मर्त्य मानवांना अलविदा म्हटले. गेली काही वर्षे तो आजारीच होता. कोकेनचे अतिरेकी व्यसन, मद्याची आदत आणि अन्य अशिष्ट गोष्टींचा त्याच्या गोटीदार शरीरावर नाही म्हटले तरी दुष्परिणाम झालाच होता. वारंवार होत राहिलेल्या शस्त्रक्रियांनी जर्जर झालेला देह अखेर त्याने त्यागला. म्हटले तर त्याचे जाणे अकाली होते, म्हटले तर त्यानेच अतिरेकी वागणुकीने ओढवून घेतलेले ते निमंत्रण होते. मॅरादोनाच्या निधनाची बातमी ऐकून ब्राझीलचे फुटबॉल दैवत आणि एकेकाळचे दिग्गज फुटबॉलपटू पेले किंचित अबोल झाले.

‘त्याच्याबरोबर लौकरच ‘वर’ फुटबॉल खेळता येईल अशी आशा आहे...’ अशी हृदयाला घरे पाडणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्जेंटिनाचे अध्यक्ष आल्बेर्तो फर्नांदेझ यांनी ‘धन्यवाद दिएगो... तुझ्या एकंदरच अस्तित्वाबद्दल आभार. तूच आम्हाला सर्वोच्च स्थानी आणलेस, तू सर्वश्रेष्ठ आहेस,’ असा सद्गदित संदेश जारी केला. मॅरादोना ज्या ‘बोका ज्युनिअर्स’ या क्‍लबतर्फे खेळायचा, तिथे तर त्याच्या चाहत्यांनी रातोरात मंच उभारून मॅरादोनाला अखेरची वंदना देण्याचा आतषबाजीसहित कार्यक्रम सुरू केला. देशोदेशीच्या राष्ट्राध्यक्षांनी हळहळ व्यक्त केली. हा सारा वैश्विक शोक एका फुटबॉलपटूसाठी चालला आहे, ही बाब बरेच काही सांगून जाणारी.

तरी बरे की, गेली वीसेक वर्षे मॅरादोना फुटबॉलच्या मैदानावर दिसलाच नव्हता. कसा दिसणार? १९९८ मध्येच त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले होते. त्याचा बहारीचा काळ होता, तो ऐंशी-नव्वदीच्या दशकांचाच. या काळात त्याने फुटबॉलच्या इतिहासाचे पुनर्लेखन केले असेच म्हणावे लागेल. जागतिक फुटबॉलच्या क्षितिजावर दिएगो मॅरादोना नावाचा सितारा तेजाने तळपू लागला. बघता बघता त्याने सूर्यमंडळ ग्रासले. दोन्ही बुटांमध्ये चेंडू खेळवत तो प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टकडे दौडू लागला, की सारे विश्व श्वास रोखून बसे.

समोर काहीतरी नेत्रदीपक आणि ऐतिहासिक घडते आहे, याची लख्ख जाणीव व्हायची आणि गगनभेदी कल्लोळाच्या पार्श्वभूमीवर मॅरादोनाच्या अकल्पित लाथेनिशी चेंडू गोलजाळ्यात थडकलेला असे. मॅरादोनाचे मैदानावरले कसब असे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. प्रतिस्पर्धी संघातले खेळाडूही त्याचेच चाहते असत आणि ऐन प्रसंगी आपल्या दैवताच्या करिष्म्यात ते दिपून जात. दिएगोने अर्जेंटिनातर्फे एकूण ९१ लढतीत ३४ गोल झळकावले. १९८२ पासून १९९४ पर्यंत चारवेळा अर्जेंटिनाला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अव्वळ संघांमध्ये ठेवण्याची किमया त्याने केली. त्यातला सर्वाधिक गाजलेला विश्वकरंडक अर्थातच १९८६चा. त्या वर्षी मेक्‍सिकोसिटी इथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाची गाठ इंग्लंडशी पडली होती. चारच वर्षे आधी फॉकलंड बेटांच्या मुखत्यारीवरून इंग्लंड आणि अर्जेंटिनात तीनेक महिन्यांचे युद्ध पेटले होते. त्यामुळे या लढतीला राष्ट्रीय अस्मितेची धारही चढली होती. त्या लढतीत एका दैवी क्षणी मॅरादोनाने अचानक मस्तक आणि किंचितशा हाताच्या स्पर्शाने चक्क गोल नोंदविला. आश्‍चर्य म्हणजे पंचांनीही तो ग्राह्य धरला.

‘त्या गोलमध्ये थोडं दिएगोचं डोकं होतं आणि थोडा देवाचा हात होता’ असे नंतर मॅरादोना म्हणाला. ‘हॅंड ऑफ गॉड’ या संबोधनाने हा गोल इतिहासात अमर झाला. या मखलाशीपूर्ण गोलनंतर काही मिनिटांतच मॅरादोनाने एकट्याने ६० मीटरची दौड मारत, चेंडू पायात खेळवत अद्‌भुत मैदानी गोल केला. ‘शतकातला सर्वश्रेष्ठ गोल’ असे त्याचे नंतर वर्णन करण्यात आले.

मॅरादोनाच्या पराक्रमामुळे त्या लढतीत इंग्लंडचे आव्हान संपलेच; पण पुढे अर्जेंटिनाने विश्वकरंडकावरही आपले नाव कोरले. चाहत्यांनी बहाल केलेले देवत्व मॅरादोनाला निवृत्तीपश्‍चातही पेलता आले नाही, हे मात्र खरेच. हजारो चुका, गफलती करत तो आपल्याच झळाळीदार कारकिर्दींचा अवशेष म्हणून जगत राहिला. ‘आपल्या स्मृतिस्थळावर ‘थँक्‍स टू द बॉल’ एवढेच कोरून ठेवा,’ अशी शेवटची इच्छा त्याने व्यक्त केली होती. त्याचे चाहते मात्र आज ‘थँक्‍स दिएगो’ एवढेच कृतज्ञतेने म्हणत असतील.

Edited By - Prashant Patil

loading image