
बलबीर यांनी तीन ऑलिंपिक सुवर्णपदके भारताला जिंकून दिली. ही कामगिरी विरळाच असते. सांघिक भावनेने खेळ केला तर काय होऊ शकते, हे त्यांनी अनुभवले होते. वैयक्तिक कौशल्याचे त्यांना फारसे कौतुक नव्हते.
भारतीय हॉकीचे सुवर्णयुग सुरू करणारे ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार होते, तर बलबीरसिंग पितामह होते. बलबीर यांच्या निधनानंतर देशातील तमाम क्रीडारसिक तर हळहळलेच; पण अगदी पाकिस्तानच्या हॉकी क्षेत्रातूनही दु:ख व्यक्त झाले. कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे मनही जिंकणारे असे हे बलबीरसिंग होते. त्यामुळेच त्यांची क्रीडा कारकीर्द पुढच्या पिढीसाठीही प्रेरणादायक आहे. हॉकीच्या मैदानावर ते जसे तडफेने लढत होते, तेवढ्याच तडफेने ते गेले काही दिवस मृत्यूशी झुंजत होते. अखेर हा लढा संपला आणि भारतीय हॉकीचे पितृछत्र काळाच्या पडद्याआड गेले. बलबीर यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महत्त्वाच्या यशात मोलाची कामगिरी बजावली. ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करणे हा केवळ खेळातील कौशल्यापुरता नव्हे, तर देशाच्या आत्मसन्मानाचा विषय बनलेला असताना बलबीर यांनी तमाम भारतीयांना सुवर्णपदकाचा आनंद मिळवून दिला. मैदानात आणि मैदानाबाहेर त्यांची प्रतिमा पितृवत होती. अनेकांवर त्यांनी वडिलांप्रमाणे माया केली. आपल्या कामगिरीचे चीज झाले नाही, अशा प्रकारची कुरकुर त्यांनी कधीही व्यक्त केली नाही, वा खंतही व्यक्त केली नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बलबीरसिंग यांनी फाळणीच्या झळा अनुभवल्या होत्या. ज्यांच्याबरोबर शिकलो, ज्यांच्याबरोबर खेळलो, ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांचा दुरावा अनुभवावा लागला आणि त्यांच्याविरुद्ध खेळावे लागले, अशी त्यांची भावना होती. बलबीरसिंग यांचा भारतीय हॉकी संघातील प्रवेशही नाट्यमय होता. खरे तर त्यांची लंडन ऑलिंपिकसाठी सुरुवातीस निवडलेल्या संघात निवड झाली नव्हती. पंजाबने त्यावेळी पहिल्यांदा जिंकलेल्या राष्ट्रीय विजेतेपदात त्यांचा मोलाचा वाटा होता, तरीही त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले होते. हे ऑलिंपिक होते 1948 मध्ये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच. स्पर्धेतील पहिल्या लढतीसाठी बलबीरना वगळण्यात आले. अर्जेंटिनाविरुद्ध निवड करताच त्यांनी सहा गोल करीत भारताला 9-1 असा विजय मिळवून दिला. पदार्पणाच्या ऑलिंपिक लढतीत सहा गोल करण्याचा त्यांचा विक्रम अजून कायम आहे. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. अंतर्गत वादाचा हा परिणाम होता. भारतास विजयासाठी संघर्ष करावा लागत होता. हे पाहून व्यथित झालेल्या भारतीयांनी लंडनमधील भारताचे राजदूत व्ही. के. कृष्ण मेनन यांना साकडे घातले. त्यामुळे टाईप केलेल्या कागदावर ऐनवेळी बलबीर यांचे नाव घाईघाईने पेन्सिलीने लिहिले गेले. बलबीर यांनी दोन गोल करीत भारताला ब्रिटनविरुद्ध विजयी करून ही निवड सार्थ केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बलबीर यांच्या शब्दात सांगायचे तर भारताने आपल्या "मास्टर्सं"ना त्यांच्या देशात हरवले होते. ब्रिटनविरुद्धच्या या विजयाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलेल्या "साहेबां'च्या देशांपेक्षा आपण सरस ठरतो, असा आत्मविश्वास आला. त्या दिवशी उंचावलेला तिरंगा, वाजवण्यात आलेले राष्ट्रगीत हे आपण कधीच विसरलो नाही असे, बलबीर सांगत. ऑलिंपिक सुवर्णपदकांचा विषय निघाल्यावर बलबीर ती अभिमानाने दाखवत आणि ती हातात घेण्याची विनंती करीत आणि म्हणत "हे यश माझे नाही, तर देशाचे आहे.'
बलबीर यांनी तीन ऑलिंपिक सुवर्णपदके भारताला जिंकून दिली. ही कामगिरी विरळाच असते. सांघिक भावनेने खेळ केला तर काय होऊ शकते, हे त्यांनी अनुभवले होते. वैयक्तिक कौशल्याचे त्यांना फारसे कौतुक नव्हते. संघनिवडीत भाषावाद, प्रांतवाद, जात, धर्म येऊ नये हा त्यांचा कटाक्ष होता. संघात सर्व जाती- धर्म, भाषा व प्रांतांतील खेळाडू असतात, त्यामुळे या सगळ्यांना सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यात ते यशस्वी होत. खेळातील कौशल्याइतकेच हे कौशल्यही फार महत्त्वाचे असते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव. दुर्दैवाने त्यांनी मिळवलेली विविध 36 पदके क्रीडा प्राधिकरणाने चक्क हरवली. मेलबर्न ऑलिंपिकचा ऐतिहासिक ब्लेझर, त्यांचा ऐतिहासिक ठेवा असलेली शंभर छायाचित्रेही गहाळ केली गेली. ही आपल्याकडच्या नोकरशाहीची खेळाविषयीची आस्था! तरीही ते या बाबतीत कधीही रागावून बोलले नाहीत. भारतीय हॉकी आणि बलबीरसिंग यांचे नातेच वेगळे आहे. इतिहासाची पाने चाळली तर 1967 च्या माद्रीद स्पर्धेत एका सामन्यात भारताकडून एकाचवेळी चार बलबीरसिंग खेळल्याचा उल्लेख आढळतो; पण सलग तीन ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलेले हे बलबीरसिंग केवळ अद्वितीय. त्यांची कारकीर्द दीर्घकाळ क्रीडारसिकांच्या स्मरणात राहील.