अग्रलेख  :  मैत्रीचे ‘भाव’बंध

अग्रलेख  :  मैत्रीचे ‘भाव’बंध

कोणत्याही दोन देशांतील संबंधांविषयी राष्ट्रप्रमुखांचा संवाद व्यवहार हा बऱ्याचदा औपचारिकता आणि शिष्टसंमत शब्दयोजना यांसारख्या बंधनांनी जखडलेला असतो. शक्‍यतो चेहऱ्यावरची घडी विस्कटू न देता आपापल्या देशांच्या भूमिका मांडल्या जातात आणि मग या राजनैतिक चर्चेचे महत्त्व तज्ज्ञमंडळी उलगडून दाखवतात. या सगळ्यांत सर्वसामान्य माणसांचा संबंध क्वचितच येतो; परंतु ‘नमस्ते ट्रम्प’च्या निमित्ताने अहमदाबादमध्ये जो ‘ग्रॅंड इव्हेंट’ पार पाडण्यात आला, त्यात भारत-अमेरिका यांच्यातील घट्ट होत असलेल्या मैत्रीचे दर्शन उपस्थित असलेल्या लाखभर जनसमुदायासमोर घडविण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागतामुळे आलेले भारावलेपण बोलून दाखविताना हातचे काही राखून ठेवले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बोली नि देहबोलीही त्याच भारावलेपणाचा प्रत्यय देत होती. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांत काहीतरी अपूर्व घडत आहे, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला. त्या दाव्यातील सत्यता तपासून पाहायला हवी आणि नजीकच्या भविष्यकाळात त्याचे स्वरूप स्पष्ट होईलही; परंतु ट्रम्प यांच्या या दौऱ्याने साधला तो याविषयीच्या अनुकूल वातावरणनिर्मितीचा भाग. 

नवी दिल्लीतील अधिकृत चर्चेनंतर जे संयुक्त निवेदन दोन्ही नेत्यांनी केले, त्यातही कोणती मूलभूत महत्त्वाची घोषणा नसली तरी व्यापारासंबंधी सर्वसमावेशक करार करण्यास पूरक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. विविध वस्तूंवरील आयातशुल्कांबाबत दोन्ही देशांदरम्यानचे मतभेद तीव्र आहेत. अन्य देशांच्या बाजारपेठा अमेरिकेला खुल्या व्हाव्यात, असाच ट्रम्प यांचा अजेंडा असल्याने आणि त्याबाबतीत ते अगदी उघडउघड सौदेबाजीच्या भूमिकेत असल्याने दुग्धोत्पादने, मांस आदींवरील व्यापारशुल्काच्या मुद्द्यावर मतभेदांची कोंडी कशी फुटणार, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे व्यापार करार होण्याची शक्‍यता नव्हतीच. भारताने आयातशुल्क कमी करावे, अशी अपेक्षा सातत्याने ट्रम्प व्यक्त करीत आहेत. भारताबरोबरची व्यापारतूट संपुष्टात यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. 

मात्र व्यूहात्मक भागीदारीच्या दृष्टीने दोन्ही देश जवळ येत आहेत आणि ही बाब या दौऱ्याने अधोरेखित झाली. पाकिस्तानच्या भूमीवरून चालणाऱ्या इस्लामी दहशतवादाला वेसण घालण्यासाठी त्या देशाच्या सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. हा संदेश पुरेसा स्पष्ट होता आणि भारताला याविषयी वाटणाऱ्या चिंतेला ट्रम्प यांनी प्रतिसाद दिला. ‘अमेरिकी महासत्ता’ आणि ‘विकसनशील भारत’ यांच्यातील एकेकाळचे वर्चस्वाधारित एकारलेपण कमी झाले आहे. बदलत्या जागतिक संदर्भांमध्ये भारत आणि अमेरिका या दोघांनाही एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. दक्षिण चीन समुद्र असो वा भारत-प्रशांत महासागर क्षेत्र असो; तेथील चिनी विस्तारवादाला शह देणे ही अमेरिकेची गरज आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतरच्या परिस्थितीतही सत्तासंतुलनासाठी भारतासारख्या देशाची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे महासत्तेला वाटते. दुसरीकडे भारतालाही शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान यासाठी अमेरिकेची मदत लागणार आहे. म्हणजेच गरज ही उभयपक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपली स्वायत्त ओळख टिकवूनच भारताने ही मैत्री वाढवायला हवी. वेगवेगळ्या प्रश्‍नांवर अमेरिकेकडून येणाऱ्या दबावापुढे मान न तुकवता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य या सूत्राला भारताने चिकटून राहिले पाहिजे. अमेरिकाही स्वहिताचाच कार्यक्रम राबवीत आहे आणि त्या बाबतीत कोणताही आडपडदा ठेवताना दिसत नाही. एकीकडे इराणकडून तेल घेण्यास प्रतिबंध करणाऱ्या अमेरिकेने भारताला तेल विकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले आहे. समुद्रात पाणबुड्यांचा माग काढू शकणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या खरेदीस मंगळवारी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत भारताची मान्यता अमेरिकेने मिळविली. तीन अब्ज डॉलरचा हा व्यवहार असेल. संरक्षणसामग्री आणि ऊर्जा क्षेत्रातील परस्परसहकार्यावर यावेळी भर देण्यात आला. एकूणच आर्थिक हित साधण्याला आपण कमालीचे महत्त्व देतो, हे ट्रम्प यांनी दाखवून दिले. दोन दिवसांच्या दौऱ्यात जे पूरक वातावरण निर्माण झाले आहे, त्याला जरासाही छेद जाऊ नये, याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आणि त्यांच्या नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेतही त्याचा प्रत्यय आला. ‘मोदी यांच्याशी धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रश्‍नावर चर्चा झाली आणि हे स्वातंत्र्य अबाधित राहावे, हीच मोदी यांची भूमिका आहे’, हा ट्रम्प यांनी दिलेला निर्वाळा हे त्याचेच उदाहरण. या दौऱ्याचे भविष्यात निश्‍चित सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्‍वासही ट्रम्प आणि मोदी या दोघांनीही व्यक्त केला. मात्र पुढच्या काळात प्रत्यक्षात व्यापार करार कशा स्वरुपात साकारतो, यावरच सारे काही अवलंबून असेल. मैत्रीचा वैयक्तिक आणि भावनिक लंबक उंचावला असला, तरी व्यवहाराच्या कसोटीवर ती स्थिती किती टिकते, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com