
राज्यसभा निवडणुकीत गेल्याच आठवड्यात झालेली कथित दगाबाजी आणि चुकलेली अंकगणिते यांचा बदला घेण्याची संधी महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’च्या सरकारपुढे.
राज्यसभा निवडणुकीत गेल्याच आठवड्यात झालेली कथित दगाबाजी आणि चुकलेली अंकगणिते यांचा बदला घेण्याची संधी महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’च्या सरकारपुढे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयतीच चालून आली आहे! अर्थात, राज्यसभा निवडणुकीत चुकलेली गणिते खरे तर मतदान ‘खुले’ असतानाही या आघाडी सरकारला भोवली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत तर मतदान गुप्त असताना या गणितांसाठी ताळा जमवणे, हे मोठेच आव्हान या आघाडीपुढे पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उभे केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्नशील असल्याचे भाजप गोटांतून दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घ्यायला हवा होता, अशी चर्चा आघाडीत सुरू झाली आहे.
पण प्रत्यक्षात भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येत असताना, त्यांनी पाचवा उमेदवार आधीच रिंगणात उतरवून, निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, हे इरादे आधीच जाहीर करून टाकले होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे आव्हान शिवसेनेने एक जादा उमेदवार उभा करून स्वीकारले होते. या वेळी दोन उमेदवार निवडून आणण्याइतके बळ नसतानाही, काँग्रेसने किमान कागदावर तरी ते आव्हान स्वीकारल्याचे दिसते. मात्र, राज्यसभेच्या पसंतिदर्शक मतांच्या गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या फडणवीसांचे ‘लक्ष्य’ महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांपैकी नेमका कोण असेल, हा उत्सुकतेचा भाग आहे. याचे कारण त्यावरच या निवडणुकीचा निकाल बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे.
रिंगणातील उमेदवारांच्या यादीवर एक नजर टाकता, प्रथमदर्शनी फडणवीस यांचे लक्ष्य एकनाथ खडसे असतील, असा निष्कर्ष निघतो. मात्र, फडणवीस यांना शिवसेनेला आणखी एक धक्का द्यायचा असेल, तर ते ‘लक्ष्य’ ही निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी साधनसामग्री अगदीच तुटपुंजी असलेले नंदूरबारचे आदिवासी उमेदवार अमश्या पाडवी हेही असू शकतात! -किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का देण्यासाठी ते ‘लक्ष्य’ भाई जगतापही असू शकते. आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांमधील ‘नाराजवंत’ आमदार हे त्यासाठी भाजपला शिबंदी पुरवण्यास उत्सुक असणार, हे तर राज्यसभेच्या निकालांतूनच स्पष्ट झाले आहे. अर्थात, मतदान गुप्त असले, तरीही कोणी कोणास मतदान केले हे तपासण्याचे अनेक मार्ग असू शकतात! त्यामुळे या निवडणुकीत आघाडीतील कोणी आमदार स्वपक्षाविरोधात मतदान करतील काय, हा प्रश्न महत्त्वाचा.
राज्यसभा निवडणुकीसाठी आमदारांची जमवाजमव सुरू असतानाच, विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि चारही पक्षांची उमेदवारांची निवड ही चर्चेला उद्युक्त करणारी ठरली. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून संघटनेची बांधणी आणि मुख्य म्हणजे लिखापढीचे काम यात प्रवीण असणारे विद्यमान उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी निवडणूक लढवण्यास दिलेला नकार आणि भाजपने पंकजा मुंडे यांना नाकारलेली उमेदवारी, हे त्या चर्चेचील दोन प्रमुख मुद्दे. अर्थात, देसाई पुढच्याच महिन्यात सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करणार असल्याने वयोमानपरत्वे त्यांची ही निवृत्ती आहे, असे म्हणता येते. मात्र, त्यामुळे उद्योग खाते आता कोणाकडे सोपवायचे असाही प्रश्न शिवसेनेपुढे उभा आहे. भाजपच्या यादीवर फडणवीस यांची संपूर्ण छाप आहे, हे श्रीकांत भारतीय यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे दिसून आले आहे. त्यामुळे मग पंकजा यांचे तिकिट कापले गेल्याने भाजप वा फडणवीस यांना मुंडे घराण्याच्या राजकीय प्रभावाला शह द्यायचा आहे काय, असाही प्रश्न उभा राहिला आहे.
शिवाय, या यादीत फडणवीस यांचे भालदार-चोपदार प्रवीण दरेकर तसेच प्रसाद लाड यांचीही नावे आहेत. त्यामुळेच आता राज्यातील भाजपवर फडणवीस यांचे पूर्ण वर्चस्व असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ‘राष्ट्रवादी’च्या यादीत नाथाभाऊंना मिळालेले स्थानही चर्चेत होते. केवळ फडणवीस यांचे कट्टर शत्रू या ‘क्वालिफिकेशन’मुळे ही उमेदवारी त्यांच्या पदरात पडली आहे; तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला वरळी मतदारसंघ बहाल करणारे सचिन आहेर यांना उमेदवारी देताना, आता ते तरी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पातील अडथळे दूर करतील, अशीच शिवसेनेची अटकळ असणार. या यादीतील खऱ्या अर्थाने अनपेक्षित उमेदवार म्हणजे भाजपच्या उमा खापरे आणि शिवसेनेचे अमश्या पाडवी. अर्थात, पाडवींना उमेदवारी देताना आपण सर्वसामान्य शिवसैनिकाची कदर करतो, असाच ‘मेसेज’ धाडण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असणार. तर पंकजांचे नाव यादीत न ठेवतानाच एक महिला कार्यकर्त्या म्हणूनच खापरे यांचा विचार केला गेला असावा.
राज्यसभेपाठोपाठ ही विधान परिषदेची निवडणूकही बिनविरोध न होऊ शकल्यामुळे आता येत्या सोमवारच्या मतदानापर्यंत आपापले आमदार सांभाळणे, एवढे एकच काम आता सर्व पक्षांच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे पुनश्च एकवार दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांची बिले वाढत जातील आणि रोजच्या रोज वेगवान तसेच चित्तचक्षूचमत्कारी घटनाही घडत राहतील. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हाती मात्र हा ‘अर्थपूर्ण’ खेळ पाहण्यापलीकडे काहीच उरलेले नसणे, ही खेदाची बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.