esakal | अग्रलेख : बोलाचा भात बोलाचेच रस्सम्!
sakal

बोलून बातमी शोधा

Anna-Dramuk-Party

द्रमुक आणि अण्णा द्रमुकने विविध वस्तू मोफत देण्यापासून गृहिणींना वेतन सुरू करण्यापर्यंत भरमसाट आश्वासने मतदारांना दिली आहेत. हे नेमके कसे करणार, या प्रश्नाला भिडण्याची या पक्षांची तयारी नाही.

अग्रलेख : बोलाचा भात बोलाचेच रस्सम्!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशातील पाच राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असली, तरी प्रसारमाध्यमांमधील चित्र हे केवळ पश्चिम बंगाल आणि त्यातही नंदीग्राम या एकाच मतदारसंघात निवडणूक असल्याचेच आहे! त्यास अर्थातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने लावलेली प्रचंड ताकद हेच कारण आहे. मात्र, त्याचवेळी दक्षिणेत आपले पाय रोवण्यासाठी तमिळनाडूत, अण्णाद्रमुक पक्षाशी समझोता करून भाजप उभा आहे. परंतु तमिळनाडूच्या लढतीकडे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे फारसे लक्ष गेलेले नाही. आज कर्नाटक वगळता दक्षिणेतील एकही राज्य भाजपच्या हातात नाही आणि त्यामुळेच भाजप तडजोड करून तमिळनाडूतील लढतीत सामील झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘अम्मा’ जयललिता यांचे निधन आणि ‘चिनम्मा’ शशिकला यांनी घेतलेला तथाकथित राजकीय संन्यास यांच्या कात्रीत सापडलेला अण्णाद्रमुक विरुद्ध करुणानिधी यांच्या निधनामुळे पोरका झालेला द्रमुक यांच्यातच तमिळनाडूत खरी लढत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी राज्याच्या विकासाचे आणि प्रादेशिक अस्मितेचाही सारे प्रश्न बाजूस सारून मतदारांवर खैरातीचा मार्ग स्वीकारला आहे! ही आश्वासने तोंडात बोटे घालायला लावणारीच आहेत आणि यापैकी कोणत्याही पक्षाचे सरकार तेथे आले, तरी या आश्वासनांची पूर्ती करावयाचे ठरवलेच, तर राज्याची सारी तिजोरी ही अपुरी पडणार, हे आता मतदारांना दिसू लागले आहे. शासनसंस्थेची नेमकी भूमिका आणि कार्य नेमके काय असते, याचाच प्रश्न निर्माण व्हावा, असे हे राजकीय पक्षांचे वर्तन आहे. जणु काही सरकारने काम करायचे आहे, ते संपत्तीच्या वितरणाचे. मात्र ही संपत्ती निर्माण कशी होणार, या प्रश्नाशी भिडण्याची त्यांची तयारी नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात, अशा प्रकारे मतदारांवर खैरात करण्याचा प्रघात या द्राविडी पक्षांसाठी नवा नाही आणि एक पक्ष एक रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन देताच, दुसरा मोफत तांदूळ देऊ करत असे! एकाने घरोघरी टीव्ही वाटण्याचे आश्वासन देताच दुसरा लोकांच्या हाती लॅपटॉप देऊ करत असे. मात्र, यंदाच्या या अकटोविकट संघर्षामुळे यंदा मिक्सर-ग्रांईंडर्सपासून सेलफोनपर्यंत ही आश्वासनांची मजल जाऊन ठेपली असली तरी त्यातील कळीचे आश्वासन हे वेगळेच आहे. यंदा द्रमुक तसेच अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांनी ‘गृहिणीं’ना थेट पगार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे! अण्णाद्रमुकने २०१६ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक जिंकून सलग दुसऱ्यांदा राज्य राखण्याचा विक्रम तीन दशकांनंतर केला. त्यामुळे आता यंदा ही सत्ता त्यांच्याकडून खेचून घेण्यासाठी द्रमुक वारेमाप आश्वासने देऊ पाहत आहे.

लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारच्या म्हणजेच जनतेच्या पैशांच्या जोरावर मतदारांना एका अर्थाने ‘लाच’ देण्याचाच हा प्रकार असून, खरे तर निवडणूक आयोगाने त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मात्र, आयोग करत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा उठवायला हे दोन्ही पक्ष तयार असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुकने तर मतदारांना फुकट घरे, वॉशिंग मशिन्स, केबल टीव्ही सेवा याबरोबरच ‘गृहिणीं’ना दरमहा १५०० रुपये वेतन सुरू करण्याची दवंडी पिटली आहे. तर द्रमुकच्या जाहीरनाम्यात औद्योगिक नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षणाबरोबरच सरकारी सेवेतील महिलांना एक वर्षाची पगारी प्रसूती रजा देऊ केली आहे. हे सारे कमी म्हणूनच की काय, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ या प्रवेश परीक्षेवरही द्रमुक बंदी घालणार आहे!

हे सारे हास्यापद पातळीवर जाऊन पोचले असतानाच भाजपला अडचणीत आणणारी एक घोषणा अण्णाद्रमुकनेच केली आहे आणि ती म्हणजे सुधारित नागरिकत्व कायदा ते केंद्र सरकारला मागे घ्यायला लावणार आहेत! भाजपने या निवडणुकीत आसाम तसेच प. बंगालमध्ये हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलेला असतानाच, आता हाच कायदा तामिळनाडूत भाजपच्या प्रचारातील मुख्य अडसर ठरतो काय, ते बघावे लागेल. तर द्रमुकचा या कायद्यास प्रथमपासूनच विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मतदार नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, याबाबत तामिळनाडूत यंदा कधी नव्हे इतकी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत आणखी दोन पात्रे आहेत आणि आज तरी ते स्वतंत्रपणेच रिंगणात आहेत. ‘चिन्नम्मा’ शशिकला यांनी भले संन्यासाची घोषणा केली असली, तरी त्यांचे भाचे टी. दिनकरन हे मैदानात आहेतच. त्यांच्या पोस्टरवरही जयललिता आणि शशिकला यांचे फोटो आहेत. त्यामुळे त्यांचे रिंगणात असणे, हे अण्णाद्रमुकला फटका देऊन जाणारे ठरू शकते.

तर दुसरा घटक आहे तो ‘टॉलीवुड’चा प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांचा. त्यांनी त्रिशंकू विधानसभेचे भाकित वर्तवले असून, तसे झाल्यास ते आपले वजन अण्णाद्रमुकच्या पारड्यात टाकणार आहेत. खरे तर तामिळनाडूत भाजप असो की काँग्रेस,यांना कायम तेथील दोन प्रमुख पक्षांमागे फरफटत जावे लागते. यंदाही खरी लढत द्रमुक तसेच अण्णाद्रमुक यांच्यातच असली तरी त्यास अनेक पदर प्राप्त झाले आहेत. तामिळी जनतेला बक्षिसांची सवयही याच दोन्ही पक्षांनी लावली असली, तरी यंदा मात्र या दोहोंनीही जनतेला ‘फुकटचंबू बाबूराव’च बनवायचे ठरवलेले दिसते.

Edited By - Prashant Patil

loading image