esakal | अग्रलेख : भांडणे मिटवा, माणसे जगवा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

अग्रलेख : भांडणे मिटवा, माणसे जगवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोना महासाथीचे संकट गडद होत असताना गरज आहे ती याचा एकत्रितपणे मुकाबला करण्याची. परंतु अद्यापही श्रेय-अपश्रेयाची लढाई सुरूच आहे. ती थांबवून माणसे जगविण्याच्या कार्यावरच आता सर्वांनी लक्ष केंद्रित करायला हवे.

कोरोना विषाणूने चढवलेल्या या दुसऱ्या हल्ल्याची तीव्रता इतकी भयावह आहे, की महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीतही आठ दिवसांची कडक ठाणबंदी करणे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाग पडले आहे. खरे तर अवघ्या पंधराच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत ‘लॉकडाउन’ची गरज नाही, असे ठामपणाने सांगितले होते. मात्र, त्यानंतर हा विषाणू इतक्या जोमाने फैलावला की आता दिल्लीत मुंबईच्या तिप्पट म्हणजे जवळपास २५ हजार रुग्ण दरदिवशी सापडू लागले आहेत. गुजरातमधील चित्रही असेच भयावह आहे आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तर अंत्यसंस्कारासाठी लोकांना ‘टोकन’ देण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. या सगळ्यातून एक बाब स्पष्ट होत आहे, की ऑक्टोबरमध्ये बाधितांचे प्रमाण कमी झाल्यानंतर जो काही काळ आपल्या यंत्रणांना, राज्यकर्त्यांना मिळाला होता, त्याचा उपयोग करून घेऊन लस, औषधे आणि ऑक्सिजन यांसारख्या गोष्टींच्या व्यवस्थित पुरवठ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, पण ते झालेले दिसत नाही. अलीकडच्या काळात श्रेयासाठी रस्सीखेच आणि अपश्रेय प्रतिस्पर्ध्यांवर टाकणे, हा खेळ मात्र रंगलेला दिसला. खरे म्हणजे या खेळासाठी या सर्व राजकारण्यांना इतर अनेक विषय मिळतील. कोरोना साथीचा संसर्ग आणि त्याचा मुकाबला हा विषय त्यासाठी कशाला वापरता? आता सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे ते माणसांचे जीव वाचवण्याला.

रेमडेसिव्हिर औषध आपण रुग्णांना पुरवले तरच त्यांचे प्राण वाचतील आणि तेच औषध बिगर-भाजप सरकारांकडून आले तर ते जातील, असा राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा भ्रम झालेला दिसतो! बहुधा त्यामुळेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री-अपरात्री मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि याच इंजेक्शनचा साठा केल्याचा आरोप असलेल्या ‘ब्रुक फार्मास्युटिकल कंपनी’च्या संचालकांवर केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर फडणवीसांचे विधान परिषदेतील सहकारी प्रवीण दरेकर यांनी हा साठा भाजपने मागवला होता आणि आपला पक्ष ती औषधे महाराष्ट्र सरकारला भेट देणार होता, असे अजब तर्कट लढवले. भाजपचे नेते महाराष्ट्रात या साठेबाजीचा आरोप असलेल्या कंपनीच्या संचालकांना वाचवण्यासाठी जिवाचे रान करत असतानाच, तिकडे भाजपचेच सरकार असलेल्या गुजरातेत वलसाड येथे याच कंपनीवर साठेबाजीच्याच आरोपानंतर कारवाई करण्यात आली आहे. हा सगळाच प्रकार निंदनीय आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना काही विरोधकांबरोबरच राज्यातील सत्ताधाऱ्यांपैकी काही जणही पातळी सोडत होते. हे टाळायला हवे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवरही हे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, एक ‘पंचसूत्री’ अमलात आणण्याचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने देशातील दहा सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांची यादीही जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असले, तरी त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड आहे. केंद्र सरकारने लसीच्या मागणीसंबंधात अक्षम्य दिरंगाई केली आणि त्यामुळेच ‘सिरम’सारख्या कंपनीने बाहेरील देशांच्या मागण्या नोंदवून घेतल्या, हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी आता केंद्राने किमान पुढच्या सहा महिन्यांचा विचार करून लस उत्पादकांकडे मागणी नोंदवावी; तसेच राज्यांना लसीचा पुरवठा कसा करणार, याबाबतचे सूत्र पारदर्शीपणे जाहीर करावे, अशी विनंती केली आहे. या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. लसपुरवठा असो वा अक्सिजनचा पुरवठा, यासंबंधातील सर्व निर्णय केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवले आहेत.

आतापावेतो लसीकरण असो की रेमडेसिव्हिर वा ऑक्सिजन टंचाई असो, यात नियोजनाचा अभाव जसा दिसतो, तसेच निर्णयप्रक्रियेच्या अतिरिक्त केंद्रीकरणाचाही हा परिणाम आहे. लशींच्या वाटपातही ‘आमची राज्ये आणि तुमची राज्ये’ असा भेदभाव केला गेल्याचेही चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे लस कोणाला द्यायची, ते ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्य सरकारांना बहाल करावा, अशीही या ‘पंचसूत्री’तील एक सूचना आहे. भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात खूप कमी प्रमाणात लसीकरण झाल्याकडेही डॉ. सिंग यांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. तेव्हा आता ‘सब का साथ, सब का विकास’ ही आपली घोषणा केवळ निवडणूकबाजीपुरतीच होती, ही टीका खोटी असल्याचे दाखवून देण्यासाठी मोदी वा अमित शहा यांनी या पत्राचा गांभीर्याने विचार करायला हवा. अर्थात, या पूर्णपणे गढुळलेल्या वातावरणातही काही सुखद बातम्या आहेतच. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही निर्णय घेतल्यामुळे आता विविध राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ बोईसर तसेच कळंबोली येथून प्रयाण करत आहे. त्याशिवाय, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहाने तयारी दर्शवली आहे. इतर उद्योगांनीही अशाचप्रकारे पुढे यायला हवे. या सर्व प्रयत्नांना साथ द्यायची आहे, ती आपण सगळ्यांनी. मास्क घालणे ही अत्यावश्यक बाब आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. सगळ्यांनीच विवेकबुद्धीचा वापर करून संयम पाळण्याचे ठरवले, तरच या विषाणूने समोर उभ्या केलेल्या संकटाचा मुकाबला करता येईल.