esakal | अग्रलेख : कर्णधारपदाचे ओझे!
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

अग्रलेख : कर्णधारपदाचे ओझे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूल्यमापनाच्या तराजूत ग्लॅमर कामाला येत नाही, तिथे आकडेवारीचे वजनच ठेवावे लागते. कर्णधारपदाचा काटेरी मुकुट दूर सारत पुढे सरसावणाऱ्या विराट कोहलीची ‘बंधमुक्त’ बॅट आता तेजाने तळपावी, अशी अपेक्षा आहे.

डझनावारी स्वादिष्ट व्यंजनांनी भरलेले ताट समोर आले तरी पट्टीचा खवय्या सगळ्याच पदार्थांना न्याय देऊ शकत नाही. वेळवखत आणि चव पाहूनच जिलेबी किंवा श्रीखंडावर लक्ष केंद्रित करावे लागते! अर्थात, साधारणतः जेवण अर्धेमुर्धे झाल्यानंतरच असला साक्षात्कार होतो, हा भाग वेगळा. कर्णधार विराट कोहलीचे तसेच काहीसे झाले असावे. ताटातल्या सगळ्याच पदार्थांना उदरात जागा देता देता आपण ‘डाएट’वर होतो, हेच पठ्ठ्या विसरला होता. गेली दहा-पंधरा वर्षे विराटची बॅट तेजस्वीपणाने तळपते आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याचा दबदबा राहिला आहे.

कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटचा तो जणू अनभिषिक्त सम्राट मानला जातो. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर ‘आपण आता काय पहायचे?’ असे लाखो चाहत्यांना वाटले होते. विराटने बॅट दाखवत ‘मी आहे’ असा दिलासा त्यांना दिला होता. त्यासाठी त्याने स्वत:च्या तडाखेबंद, आक्रमक खेळाला शिस्त लावली. खाण्यापिण्यावर बंधने लादून घेतली, तो पूर्णत: शाकाहारी होऊन गेला. नियमित व्यायामाची जोड देत शारीरिक तंदुरुस्ती अत्युच्च पातळीवर ठेवली. एवढे केल्यानंतर मैदानात बॅटदेखील मनःपूत गाजवली. त्यादृष्टीने पाहू गेल्यास विराट कोहलीसारखा तंत्रमंत्रशुद्ध, शतप्रतिशत व्यावसायिक क्रिकेटपटू संपूर्ण भारतात अभावानेच आढळावा. टी-ट्वेंटी क्रिकेटमधले भारतीय संघाचे कर्णधारपद विश्वकरंडकानंतर सोडण्याचा निर्णय त्याने गुरुवारी जाहीर केला, तोदेखील व्यावसायिक आणि योग्यच म्हटला पाहिजे.

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराटची कामगिरी तुलनेने समाधानकारक आहे. गेल्या पाच टी-ट्वेंटी मालिका त्याने भारताला जिंकून दिल्या आहेत. परंतु कर्णधार म्हणून त्याला अद्याप आयसीसी करंडक किंवा कुठलीही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. तरीही संयुक्त अमिरातीत होणार असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर या प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराटने जाहीर केला आणि सामान्य क्रिकेटप्रेमी बुचकळ्यात पडला. कारण विराट म्हणजे कर्णधार असे समीकरण आता क्रिकेटप्रेमींच्या मनात कोरलेले आहे. पण असा निर्णय कधीही एका रात्रीत घेतला गेलेला नसतो, हे लक्षात घ्यायला हवे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहली लवकरच टी-ट्वेन्टीचे कर्णधार सोडणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दोन दिवसांनी ते वृत्त तर तंतोतंत खरे ठरले. बीसीसीसीआयने आता टीम इंडियाच्या नेतृत्वाच्या संदर्भात विराट कोहलीच्या पलीकडे विचार करायला सुरुवात केली आहे एवढे मात्र यातून स्पष्ट झाले. प्रचंड ऊर्जास्रोत असलेला विराट भारताला सर्वाधिक सामने जिंकून देणारा, प्रत्येक खेळाडूत आत्मविश्वास ठासून भरणारा आणि कधीही हार न मानण्याची जिगर जागवणारा कर्णधार आहे यात शंकाच नाही. त्याची दखल संपूर्ण क्रिकेटविश्व घेतेय. त्याचे मैदानावरचे अस्तित्व पैसा आणि प्रसिद्धीचा धबधबा निर्माण करत असते. पण मूल्यमापनाच्या तराजूत ग्लॅमर कामाला येत नाही, तिथे आकडेवारीचे वजनच ठेवावे लागते. टी-ट्वेन्टीबाबत बोलायचे तर विराटची विजयाची सरासरी क्रिकेटविश्वात आजही दुसऱ्या क्रमांकाची आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ गेल्या पाच मालिकांमध्ये अपराजित राहिली असली तरी, विश्वकरंडक जिंकण्याच्या परीक्षेत गडी नापासच ठरला! मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गणवेशाच्या टी शर्टवर हृदयाच्या ठिकाणी विश्वकरंडकाच्या दिग्विजयाचे सितारे डकवले जातात. कपिलदेवच्या ऐतिहासिक विजयाचा एक आणि महेंद्रसिंग धोनीचे दोन विश्वविजय असे एकूण तीन ‘स्टार’ भारतीयांच्या छातीवर अभिमानाने मिरवत आहेत.विराट अजून एकही लखलखता तारा मिळवू शकलेला नाही. पन्नासहून अधिक सामने झाले तरी त्याला शतक करता आलेले नाही. शेवटी अशी आकडेवारी प्रत्येक खेळाडूची कुंडली मांडत असते आणि शतकांची किंवा अर्धशतकांची कामगिरीच कुंडली बळकट बनवत असते. भविष्याची चाहूल लागलेला विराट ‘व्हाइट बॉल क्रिकेट’चे नेतृत्व सोडून केवळ कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करेल, अशीही मध्यंतरी चर्चा होती; पण त्याने खुबीने सुवर्णमध्य साधला आहे. श्रीलंकेतील मालिकेसाठी पाठवण्यात आलेल्या संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे देणे किंवा आता टी-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनी याची मार्गदर्शकपदी झालेली नियुक्ती हे बदलदेखील कोणत्यातरी हेतूनेच झालेले आहेत.

विराटच्या नेतृत्वबदलाच्या बातम्यांसोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही पदमुक्त होणार अशी खबर होती. हे सर्व बिंदू जोडले की खरे चित्र तयार होते. विराटने केलेला नेतृत्त्वत्याग हा अचानक नाही, ते एक योजनाबद्ध पाऊल आहे, हे स्पष्ट होते. एरवी विराटला चॅलेंज दिले, की अतिशय त्वेषाने लढणे हा त्याचा स्वभावगुण प्रकटतो. अशा वेळी त्याच्या बॅटमध्ये बाहुबलीची ताकद संचारते. आता त्याने स्वतःला आव्हान दिले आहे. अर्थात, अमिरातीत होत असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेत भारत जिंकला तर ती निश्चितच विराटझेप असेल, तसे घडले नाही तरी झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहणार! कर्णधारपदाचा काटेरी मुकुट दूर सारत पुढे सरसावणाऱ्या विराट कोहलीची बंधमुक्त बॅट, आता तेजाने तळपेल, एवढीच अपेक्षा. सामानाचे ओझे कमी असले, की प्रवासाची खुमारी वाढते म्हणतात. विराट कोहलीने नेमके तेच ओझे उतरवून ठेवले आहे.

loading image
go to top