अग्रलेख : अभिनय विद्यापीठ

अफाट पसरलेल्या रत्नखचित नभांगणात अगणित तारे लुकलुकत असतात. काही आपल्या तेजाने तळपतात, काही स्नेहहीन ज्योतीप्रमाणे मंदपणे आपले अस्तित्व दाखवत राहतात.
Dilipkumar
DilipkumarSakal

दिलीपकुमार या नावापासून भारतीय चित्रसृष्टीमध्ये अभिनयाचे नवे विद्यापीठ सुरु झाले. चित्रसृष्टीतील हे एक अभिजात घराणेच आहे. ते पुढेही सुरुच राहील.

अफाट पसरलेल्या रत्नखचित नभांगणात अगणित तारे लुकलुकत असतात. काही आपल्या तेजाने तळपतात, काही स्नेहहीन ज्योतीप्रमाणे मंदपणे आपले अस्तित्व दाखवत राहतात. ऋतुचक्राप्रमाणे सारा नक्षत्रलोक आपले स्थान बदलत राहातो. अढळ असतो तो फक्त उत्तरेकडला-ध्रुवाचा तारा! पेशावरच्या किस्सा खानी बझारमधल्या एका सर्वसामान्य फळविक्रेत्याच्या घरी पैदा झालेले मोहम्मद युसुफ खान नावाचे सामान्य चेहरेपट्टीचे पोर पुढे चित्रपटसृष्टीचा ध्रुवतारा बनून राहील, अशी भविष्यवाणी गेल्या शतकाच्या सुरवातीला कोणी वर्तवली असती, तर लोकांनी खचितच विश्वास ठेवला नसता. पण तसे घडले. युसुफ खानाने आपला चेहरा बदलला नाही, नाव मात्र बदलले. दिलीपकुमार या नावापासून भारतीय चित्रसृष्टीमध्ये अभिनयाचे नवे विद्यापीठ सुरु झाले, असे म्हणता येईल.

मिर्झा गालिबच्या आधी ऊर्दू शायरी होतीच; पण मिर्झासाहेबांपासून शायरीच्या चिरागांची नवी माळ लखलखून उठली, तसेच हे! ‘रेख्ते के तुम्हीं नही हो उस्ताद गालिब, कहते हैं अगले जमाने में कोई मीर भी था…’ म्हणजे ‘शायरीच्या मुल्कात गालिब, तू एकटाच उस्ताद नाहीस, मागे कधीतरी ‘मीर’ होऊन गेला होता…असे खुद्द गालिबनेच म्हणून ठेवले आहे. आजकालच्या महासिताऱ्यांना दर पावली ‘आपल्या आधी कुणी दिलीपकुमार होऊन गेले’, याचे स्मरण यापुढे ठेवावे लागेल. दिलीपकुमार यांच्या आधीही चित्रसृष्टीच्या नभांगणात तारेसितारे होते, त्यांच्या पश्चातही मौजूद आहेत. पण दिलीपकुमार हाच एकमेव ध्रुवतारा होता, आहे, आणि यापुढेही राहील. त्यांचे जाणे अटळ होते हे खरेच.

अठ्ठ्याण्णव वर्षांची उमर होती. जिंदगीतले यादगार लम्हेही आठवू नयेत, असा काहीसा दंश स्मृतिभ्रंशाने केला होता. गेल्या काही वर्षात इस्पितळांच्या वाऱ्याही वाढल्या होत्या. तबियत ठीक राहात नव्हती. तरीही त्यांचे ‘असणे’ हाच एक मोठा दिलासा होता. इंटरनेट आणि ओटीटीच्या वेबमालिकांना सरावलेल्या तरुण पिढीला दिलीपकुमार यांच्या असण्याचा आणि नसण्याचा अर्थ नेमका काय, हे कदाचित नाही कळणार. त्यांनी आजवर करुन ठेवलेल्या कलाकारीचे अवशेषच आज आपण सारे तुकड्या तुकडयांनी पाहातो आहोत, एवढे कळले तरी पुष्कळ आहे. दिलीपसाब यांच्या अभिनयाची गहिरी छाप पडल्याची कबुली अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत कित्येक सिताऱ्यांनी दिली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, अभिजाततेचा निर्विवाद निकष ठरलेला दिलीपकुमार यांचा अभिनय रसिकांनाही तितकाच सर्वमान्य झालेला आहे. ज्या काळात बटबटीत आणि तारस्वरातला अभिनय करणे ही तांत्रिक गरज होती, त्या काळातही दिलीपकुमार यांनी मंद्र सुरातली प्रभावी शब्दफेक लोकप्रिय केली. आक्रस्ताळी अभिनयाला तर पूर्ण फाटा दिला. त्या काळात देशामध्ये स्वातंत्र्यलढ्याचे वारे वाहू लागले होते.

चित्रसृष्टीतली आबोहवा बदलत चालली होती. तेव्हा १९४४मध्ये युसुफ खान नावाच्या युवकाने ‘ज्वारभाटा’ नावाच्या बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटाद्वारे पहिले पाऊल टाकले. युसुफ खानपेक्षा साधेसुधे पब्लिकला मानवेल असे ‘दिलीपकुमार’ हे नाव बरे वाटेल, अशी बॉम्बे टॉकिजच्या मालकीणबाई आणि विख्यात अभिनेत्री देविकाराणी यांची कल्पना होती. परंतु, हे नाव पुढे अक्षरश: इतिहास घडवेल, याची कल्पना मात्र त्यांनाच काय, कुणालाच नसणार. पाण्यातल्या प्रतिबिंबासारखा तरल चेहरा, खूप काही सांगून जाणारे डोळे, कपाळावरची ती ठळक होत जाणारी उभी रेघ, आणि उत्कृष्ट ऊर्दू – हिंदुस्थानी शब्दोच्चार यांच्या जोरावर दिलीपकुमारने बघता बघता सारी चित्रसृष्टी काबीज केली.

‘ज्वारभाटा’नंतर आन, अंदाज, मिलन, देवदास, नया दौर, गंगा-जमना, राम और शाम, बैराग…अशा एकाहून एक अप्रतिम चित्रकृतींची मालिकाच सुरु झाली. नावे तरी किती घ्यावीत? ‘देवदास’ ने तर कहर केला. ‘कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है…’ हा मद्यधुंद देवदासच्या तोंडीचा संवाद, त्याकाळी अखिल भारतातल्या गमगीन ‘ह्रदयभंगीं’च्या ओठांवरचा ‘तकिया कलाम’ झाला होता. दिलीपकुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जायचे. खरे तर त्यांच्या चतुरस्त्र अभिनयावर अन्याय करणारा हा छाप आहे. हळव्या भूमिका तर त्यांनी साकारल्याच; पण खळखळून हसवणाऱ्या व्यक्तिरेखाही त्यांनी तितक्याच ताकदीने उभ्या केल्या. ‘राम और शाम’ मध्ये त्यांच्या तोंडी एक संवाद आहे : क्या करुं मुझे ॲक्टिंग बहुत पसंद है, लेकिन कोई मौकाही नहीं देता!’ हा संवाद म्हणताना मात्र ते डोळ्यांतून किंचित हसताहेत, असा भास होतो. ‘नया दौर’ मधले ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ किंवा ‘गंगा-जमना’ मधले ‘नैन लड गईबे, मनवां मां कसक हुईबे करी’ ही मतवाली गाणी पेश करताना त्यांनी झकास पदन्यासही करुन दाखवले. ‘गंगा-जमना’ हा तर पूर्णत: त्यांचाच चित्रपट. देव आनंद, राज कपूर आणि दिलीपकुमार ही त्रयी त्या काळात सिनेरसिकांवर अक्षरश: अधिराज्य गाजवत होती. पुढे सत्तरीच्या अखेरीस दिलीपकुमार यांनी पाचेक वर्षे स्वल्पविराम घेतला. नंतर ‘सौदागर’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’सारखे चित्रपट केले.

हॉलिवुडमधला विख्यात अभिनेता मार्लन ब्रँडो किंवा इटलीचा मार्चेलो मास्त्रोयानी या दिग्गजांच्या पंक्तीला दिलीपकुमार यांचे नाव घेतले जाऊ लागले होते. काळाच्या ओघात हे दिग्गज तारे मावळले, तसेच नवे सहस्त्रक सुरु होण्याच्या आधी दिलीपकुमार यांनीही चित्रपटात काम करणे थांबवले होते. याचा अर्थ, गेली जवळपास दोन तपे भारतीय सिनेरसिकांनी निव्वळ दिलीपकुमार यांच्या ‘असण्या’च्या आधारावर घालवली आहेत. विख्यात शास्त्रीय गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी एका शंकेखोराला सणकून उत्तर देताना ‘घराणं? आमच्यापासूनच सुरु होतं आमचं घराणं’ असे सुनावले होते. दिलीपकुमार हेदेखील चित्रसृष्टीतले एक अभिजात घराणेच आहे. ते सुरुच राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com