esakal | अग्रलेख : महाराष्ट्राची कलंकशोभा!
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

अग्रलेख : महाराष्ट्राची कलंकशोभा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस कसा घसरत चालला आहे, हे राजकीय नेते दाखवून देत आहेत. केंद्रातील मंत्रिपद भूषविणाऱ्या व्यक्तीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात अनुचित वक्तव्य करणे निषेधार्ह आहेच; पण हा प्रश्न संयमाने आणि मुत्सद्देगिरीने हाताळण्याऐवजी पोलिसी खाक्या वापरण्याचे पाऊलही समर्थनीय नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २४ तासांत जे काही घडले, ते राज्याच्या आजवरच्या सभ्य, संयमित आणि सुसंस्कृत राजकारणाला कलंकित करणारे तर होतेच; शिवाय ते राजकारण्यांची शोभाही करणारे होते. त्याची सुरुवात ही अर्थातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका वक्तव्याने झाली असली तरी त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाविकास आघाडी’च्या सरकारने जी काही पावले उचलली, तीही सर्वार्थाने अनुचितच होती. राज्यात विरोधक असलेल्या आणि केंद्रात मंत्रिपद भूषविणाऱ्या नेत्याने सडकछाप भाषा मुख्यमंत्र्यांच्याच संदर्भात वापरणे चुकीचे आणि औचित्याचा भंग करणारे होते. आक्रमकता म्हणूनही ते योग्य नव्हते. त्यावर खरेतर सत्ताधारी पक्षाला राजकीय उत्तर देता आले असते, मात्र सरकारने आपल्या हातातील कायद्याचा वापर करून, त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्याने काय साधले, असाच प्रश्न आहे. दोन्ही गोष्टी आजच्या काळात माथी किती चटकन भडकतात, याचीच साक्ष देणाऱ्या आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हा ‘हीरक महोत्सवी’ स्वातंत्र्यदिन आहे, असे उद्‍गार काढले आणि शेजारील व्यक्तीने ‘अमृतमहोत्सवी’ असे लक्षात आणून देताच त्यांनी लगेच दुरुस्तीही केली. पण आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याबाबत रोजच्या रोज बेताल वक्तव्य करणारे राणे यांच्या हाती हे आयतेच कोलित आले! त्यानंतर महाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांची जीभ नको तेवढी घसरली.

‘देशाच्या स्वातंत्र्याविषयी असे अज्ञान बाळगणाऱ्याच्या कानाखाली लगावली असती’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. मुख्यमंत्रिपदाचा मान सर्वांनीच ठेवायला हवा. पण ते भान राणे यांना राहिले नाही. दुसरीकडे शिवसैनिकही खवळले.एरवी संयमी शैलीबद्दल ओळखल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाही संयम सुटला. शिवसैनिकांनी मग पोलिसांत जाऊन तक्रार गुदरली आणि नाशिक पोलिसांनीही लगोलग राजकीय वास्तवाचे भान विसरून राणे यांच्या अटकेचे फर्मान जारी केले. खरे तर शिवसेनेच्या अन्य कोण्या जबाबदार नेत्याने त्यापुढचे सारेच काही टाळता कसे येईल, या दृष्टीने पावले उचलायला हवी होती. तसे केले असते तर सत्ताधारी या भूमिकेला ते साजेसे ठरले असते आणि उद्धव ठाकरे यांचीही प्रतिमा उंचावली असती. प्रत्यक्षात महाविकास आघाडीने पुढे राणे यांना अटक करण्यापर्यंत मजल मारली. राजकीय रणधुमाळीत एकदा डोकी तापली की सारासार विवेक कसा बाजूला पडतो, त्याचेच दर्शन पुढे जे काही घडले त्यावरून दिसून आले.

राणे यांची गेल्या चार दिवसांतील वक्तव्ये बघितली तर ती निव्वळ शिवसैनिकांना उचकायला लावण्यासाठीच केली जात होती, असे सहज म्हणता येते. खरे तर राणे यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हेच शिवसेनेसाठी योग्य ठरले असते. मात्र, चार दिवसांनी त्यांचा संयम सुटला, हेच खरे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कमालीच्या अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी राणे यांना पुढे करून ‘सापळा’ लावण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. मात्र राणे यांच्या वक्तव्याने भाजपची कोंडी करुन ठेवली आणि त्यावरच्या महाविकास आघाडीच्या प्रतिसादाने हे प्रकरण अनावश्यक चिघळले. राणे यांचे वक्तव्य हे केवळ आणि केवळ राजकीयच होते आणि त्याला उत्तर हे राजकीय स्तरावरच द्यायला हवे होते. प्रत्यक्षात सरकारने आपल्या हातातील कायद्याचा वापर करून थेट एका केंद्रीय मंत्र्यावर पोलिसी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळेच आणखी एक मुद्दा उपस्थित झाला आहे. केंद्र सरकार आपल्या अखत्यारीतील यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने करून विरोधीपक्षीय नेत्यांना जाळ्यात पकडत असल्याचा आरोप सर्वच बिगरभाजप नेते सातत्याने करत आहेत आणि त्यात तथ्यही असल्याचे दिसत आहे. आता राणे यांच्यावरील कारवाईनंतर असाच आरोप भाजपही करू शकतो. अर्थात भाजपनेही हे समजून घेतले पाहिजे की रा़डेबाजीचा कार्यक्रम शिवसेनेला देण्यातून हाती काही लागेल, ही शक्यता नाही.

आता उरला प्रश्न राणे यांच्या या अत्यंत अनौचित्यपूर्ण वक्तव्यासंदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हा. भाजपच्या कोणत्याही जबाबदार नेत्याने याबाबत काही भूमिका घेण्यापूर्वी कोकणातील भाजप नेते आणि त्या भागातील राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनी ‘ही तर राणे यांची ‘ठाकरी’ भाषाच आहे!’ असे अभिमानाने सांगितले होते! सुदैवाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘राणे यांचे हे वक्तव्य भाजपला मान्य नाही,’ असे सांगितले खरे; पण त्याचवेळी ‘भाजप राणे यांच्या पाठीशीच उभा आहे’, असेही सांगून टाकले. या दोन्हीचा ताळमेळ कसा काय जमवायचा? खरे तर या अनुचित वक्तव्याबाबत फडणवीस यांनी राणे यांचा निषेधच करायला हवा होता. पण तो न करता राणे यांच्याविनाच त्यांची जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरूच राहील, असेही त्यांनी सांगून टाकले. याचा स्पष्ट अर्थ असा, की यापुढेही ही भाषिक बाचाबाची सुरू राहणार आणि त्यात जनहिताचे सारेच प्रश्न मागे पडणार. जनतेच्या हाती मात्र काहीच लागणार नाही. फार फार तर काहींना ही निव्वळ करमणूक वाटेल. आजच्या राजकारणाची हीच खरी शोकांतिका आहे.

loading image
go to top