esakal | अग्रलेख : उद्‌ध्वस्तातील पिंपळपान!
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Award

अग्रलेख : उद्‌ध्वस्तातील पिंपळपान!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निवड झालेले चित्रपट आणि कलाकार यांचा विचार करता गेल्या तीन वर्षांपासून ऑस्कर खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होत आहे, हे स्पष्ट होते. जीवन प्रवाही असते, त्याला रोखता येत नाही, हाच यंदाच्या ऑस्कर सोहळ्यातून मिळालेला संदेश आहे.

लॉस एंजलिसचे ‘युनियन रेल्वे स्थानक’ ही एक विलक्षण आणि ऐतिहासिक वास्तू आहे. १९३९मध्ये बांधून काढलेले हे शैलीदार स्थानक, ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी उंबरठ्यावर पूर्णत्वाला गेले होते. महायुद्धाचे ढग तर जमू लागलेच होते. ज्या काळात नाझी अधिकारी नरसंहारासाठी यातनातळ उभारणीचे नकाशे काढत होते, त्याच काळात हे कलात्मक स्थानक येथे उभे राहिले. विध्वंसाच्या काठावरची ही वास्तू माणसातली दुर्दम्य कलात्मकता आणि जीवनासक्तीचे प्रतीक मानायला हवे. याच स्थानकाच्या प्रशस्त आवारात यंदाचा ऑस्कर सोहळा रंगला होता... हेदेखील प्रतीकात्मकच. गेले दीड वर्ष कोरोना विषाणूने सारे जग मेटाकुटीस आणले. मृतांची मोजदाद अशक्य व्हावी, इतका संहार या अदृश्य विषाणूने घडवला. आजही त्याचे मरणसत्र चालूच आहे. असे असतानाही, जीवघेण्या महासाथीचे भय झुगारून देत चंदेरी दुनियेने आपला बुलंद आवाज त्या प्रांगणात दिमाखात घुमवला. त्यामुळे यंदाचा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला, याचेच खरेतर कौतुक अधिक करायला हवे.

एरवी सर्वसामान्य दिवस असते तर गेल्या २८ फेब्रुवारीलाच हा सोहळा नेहमीच्या डॉल्बी सभागृहात, नेहमीच्या दिमाखात साजरा झाला असता. माध्यमे गजबजून गेली असती, वृत्तपत्रांचे रकाने कमी पडले असते. पण यंदा कोरोनाच्या साथीमुळे सारीच परिस्थिती उफराटी झाली. सोहळा साजरा करतानाही अनेक निर्बंध लादून घ्यावे लागले. मुख्य सोहळा युनियन स्थानकाच्या प्राकारात, आणि संगीत-नृत्यादी कार्यक्रम डॉल्बी सभागृहात अशा दोन ठिकाणी हा ‘इव्हेंट’ पार पडला. त्यासाठी ‘युनियन स्टेशन’चे प्रांगणही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजवण्यात आले होते. अभ्यागतांना शारीरिक अंतरही राखता यावे आणि सोहळ्याचा आनंदही लुटता यावा, अशी ही रचना साकारली होती विख्यात वास्तुरचनाकार डेव्हिड रॉकवेल यांनी. त्याचेही कौतुक सध्या समाजमाध्यमांवर होत आहे.

यंदाही सोहळ्याला सूत्रसंचालक नव्हता. लाल गालिचाचा बडिवार नव्हता, आणि सोहळ्यानंतर अनेक दिवस रंगणारी सुप्रसिद्ध ऑस्कर मेजवानीदेखील नव्हती. तरीही तो रंगतदार ठरला हे विशेष. भारतासाठी विशेष बाब म्हणजे गतसाली निवर्तलेल्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या आणि विख्यात अभिनेता इरफान खान यांना या वेळी अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या दोघांचेही इंग्रजी चित्रपटांमधले योगदान अनन्यसाधारण आहे. यंदाच्या सोहळ्यात ‘नोमॅडलँड’ या नितांतसुंदर चित्रपटाने बाजी मारली, असेच म्हणावे लागेल. पतीच्या निधनानंतर सारे किडुकमिडुक विकून एक व्हॅन विकत घेऊन देशपर्यटनाला निघालेली एक स्त्री जीवनातले कुठले गुह्य उकलू पाहाते? तिच्या हाती काय लागते? याचे चित्रण करणारा ‘नॉमॅडलँड’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. यात प्रमुख भूमिका साकारणारी फ्रान्सेस मॅक्डॉरमंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली, तर चिनी वंशाची क्लोइ चाव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरली. उत्कृष्ट पटकथाही ‘नोमॅडलँड’चीच ठरली. आघाडीचे तिन्ही पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाचे चाहत्यांनी गेले वर्षभर प्रचंड कौतुक केले आहे. या चित्रपटाला भरीव यश मिळणार हे तसे अपेक्षितच होते. मॅक्डॉरमंडचा हा कारकिर्दीतला चौथा ऑस्कर पुरस्कार आहे. तीनेक वर्षांपूर्वी ‘थ्री बिलबोर्डस, आउटसाइड एबिंग’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटातली तिची भन्नाट भूमिका हॉलिवूडपटांच्या चाहत्यांना आठवत असेल. क्लोइ चावचे यश मात्र हॉलिवूडमधली गटबाजी, प्रांतीय हट्ट, वर्ण आणि वर्गविग्रहाचे छुपे प्रवाह यांच्या पलीकडे जाणारे मानायला हवे. गेल्या तीन वर्षांपासून ऑस्कर खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होत चालल्याची ही लक्षणे आहेत.

‘मारेनीज ब्लॅक बॉटम’मधल्या भूमिकेसाठी चॅडविक बोसमन हमखास सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घेऊन जाणार, अशी अटकळ होती. ‘ब्लॅक पँथर’ या मार्वल स्टुडिओजच्या सुपरहिरो चित्रपटाचा नायक म्हणून तो बाळगोपाळांना आधीपासूनच थोडाफार ठाऊक आहे. पण गतसाली ऑगस्ट महिन्यात चॅडविकचे वयाच्या ४३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्याला मरणोत्तर पुरस्कार दिला जावा, म्हणून नेट नागरिकांनी बराच नेट लावला होता. खुद्द चॅडविकचे कुटुंबीयदेखील मोठ्या अपेक्षेने युनियन स्थानकाच्या समारंभस्थानी आवर्जून आले होते. पण अखेरीस बाजी मारली ती बुजुर्ग, जुन्याजाणत्या सर अँथनी हॉपकिन्स यांनीच. ‘द फादर’ या अप्रतिम चित्रपटातील त्यांची स्मृतिभ्रंशाच्या गर्तेत गटांगळ्या खाणाऱ्या वृद्ध बापाची भूमिका खरोखर अभूतपूर्व म्हणावी लागेल. ऐंशीच्या घरातल्या या अभिनेत्याने नामांकन असूनही त्यांनी समारंभाला येणे टाळले, कारण नामांकनाच्या स्पर्धेत चॅडविक बोसमन, ‘मंक’वाला गॅरी ओल्डमन, ‘साऊंड ऑफ मेटल’वाला रिझ अहमद अशी मातब्बर मंडळी होती. अजूनही सर हॉपकिन्स यांचा दबदबा कायम आहे, हेच यातून दिसून आले. अमेरिकेत लसीकरणामुळे व दक्ष आरोग्य व्यवस्थेमुळे साथ आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या महासाथीत अमेरिकेने जबर किंमत मोजली आहे. त्या उद्‌ध्वस्ताच्या पार्श्वभूमीवरच यंदाचा ऑस्कर सोहळा पार पडला. एखाद्या पडकाळात हिरवा अंकुर फुटून पिंपळपान डोलू लागते, तसेच काहीसे झाले. जीवन प्रवाही असते, त्याला रोखता येत नाही, हेच या सोहळ्याने साग्रसंगीत सांगितले.

loading image