अग्रलेख : वैचारिक लेखणीचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra chapalgaonkar

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड करून साहित्य महामंडळाने वैचारिक लेखनाच्या क्षेत्राची योग्य दखल घेतली आहे.

अग्रलेख : वैचारिक लेखणीचा सन्मान

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड करून साहित्य महामंडळाने वैचारिक लेखनाच्या क्षेत्राची योग्य दखल घेतली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रामुख्याने कथा-कादंबऱ्या, कविता, समीक्षा लिहिणाऱ्या साहित्यिक मंडळींकडे सोपविण्याचा पायंडा हळुहळू बदलत असून ही निवड म्हणजे त्या प्रवाहातील एक लक्षणीय घटना म्हटली पाहिजे. संमेलनाध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे करण्याची प्रथा संपुष्टात आल्यानंतर महामंडळाने अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांना पाचारण केले. दोन वर्षांपूर्वी विख्यात खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करुन महामंडळाने साहित्य वर्तुळाला धक्का दिला होता. आता चपळगावकरांची निवड करून महामंडळाने कायदा, न्याय या क्षेत्राबरोबरच वैचारिक क्षेत्राला एक प्रकारचा सलामच केला आहे, असे म्हणता येईल.

आपल्याकडील ललित साहित्यिकांवर अनेकदा अनुभवविश्व तोकडे असल्याची टीका होते; त्याबरोबरच समकालिन सामाजिक-राजकीय-आर्थिक वास्तवाकडे साहित्यिकांचे दुर्लक्ष होते, असाही आक्षेप घेतला जातो. चपळगावकरांची लेखणी मात्र पूर्णपणे वर्तमानाला अभिमुख आहे. समाजवास्तव हेच तर तिचे मूलद्रव्य आहे. कल्पनाविश्वात रमणाऱ्या आणि रंजकताप्रधान साहित्य लिहिणाऱ्यांना लोकप्रियतेचे वलयही लाभते. पण खरे तर अशा चौकटीबाहेरही प्रत्ययकारी लेखन करणारे असतात, एवढेच नव्हे तर त्या लेखनाचा काहीएक चांगला प्रभाव समाजावर पडतो असतो. चपळगावकर हे अशा विरळ होत चाललेल्या पंक्तीतील लेखक आहेत. समकालीन इतिहासावर त्यांची पकड आहे.

भारताचा स्वातंत्र्यलढा, महात्मा गांधी, पं. नेहरू यांचे योगदान यांविषयी मर्मग्राही लेखन त्यांनी केलेच, पण त्यांची नाळ आपल्याकडील प्रबोधन परंपरेशी घट्टपणे जुळलेली आहे, ही बाब त्यांचे लेखन वाचताना प्रकर्षाने जाणवते. स्वतः न्यायाधीश म्हणून काम केलेल्या चपळगावकरांना एकोणीसाव्या शतकातील ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ आठवावासा वाटतो, हे त्यामुळेच अर्थपूर्ण आहे. न्या.महादेव गोविंद रानडे, न्या. काशिनाथ तेलंग आणि न्या. ना.ग. चंदावरकर यांच्याविषयी लिहिताना प्रबोधनातून साकारलेल्या मूल्यचौकटीविषयीची त्यांची गाढ आस्था प्रकट होते. सध्याच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील उथळ प्रवाह आणि त्यांचे गढूळपण लक्षात घेतले तर याचे महत्त्व कितीतरी पटींनी वाढते.

चपळगावकर यांनी प्रामुख्याने हैदराबाद मुक्तिलढा, भारतीय स्वातंत्र्यलढा, त्या काळातील राजकीय, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती, तिचे आकलन, त्याकाळातील समाजाची वीण, राजकीय व सामाजिक नेतृत्व, त्यांच्या वैचारिक भूमिका, त्या त्या चळवळींचे सबंध प्रदेशाच्या एकात्मतेवर होणारे बरेवाईट परिणाम, यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांनी निरपेक्ष भावनेतून आपले सर्व लेखन नवीन पिढीसमोर, मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची समतोल वृत्ती न्यायदानाप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रातही व्यक्त झाली आहे. एखाद्या सामाजिक प्रश्‍नावर लिहिताना त्यांनी सातत्याने समतेच्या, न्यायाच्या भूमिकेची पाठराखण केली. चपळगावकर यांचे वडील हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी होते. त्यामुळे न्या.चपळगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वातंत्र्यलढ्याच्या जाणीवेची मोठी पार्श्वभूमी आहे. या लढ्यातील रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेरावांपर्यंत अनेक स्वातंत्र्यसेनानींचा संघर्ष चपळगावकर यांनी जवळून पाहिला आहे. त्यांनी तो निरपेक्ष वृत्तीने अभ्यासला. त्यातून अनेक दुर्लक्षित अशी व्यक्तींची चित्रणे त्यांनी साकारली. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ते वैचारिक व ललितलेखन क्षेत्रात कार्यरत आहेत.

चपळगावकर यांनी पत्रकारिता व शिक्षकी पेशातही मुशाफिरी केलीय, हे अनेकांना ठाऊक नसेल. पण त्यांनी ६७ वर्षांपूर्वी ‘फ्री प्रेस जर्नल’ व ‘केसरी’ या वृत्तपत्रात बातमीदारी केली आहे. लातूरमध्ये मराठी विषय शिकविला आहे. मग पुढे त्यांनी विधी व न्याय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकाविला. त्यांनी तब्बल २७ पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत अलीकडे लिहिलेल्या पंडित जवाहरलाल नेहररुंवरील चरित्रात्मक पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. स्वामी रामानंद तीर्थ व ज्येष्ठ संपादक अनंतराव भालेराव यांच्या व्यक्तिचित्रणातून मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ नवीन पिढीला समजावून देण्याचे मोठे कामही त्यांनी केले. हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक महत्त्वाचे अभ्यासक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. चपळगावकर यांनी आपल्या साहित्यातून नवीन पिढीला वैचारिक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यापासून अनेक प्रश्न प्रलंबित अवस्थेत आहेत. ते सोडविण्याकडेही त्यांना पुढाकार घ्यावा लागेल. न्यायदानाच्याही क्षेत्रात काम केले असल्याने चपळगावकर अनेक प्रश्न मार्गी लावू शकतात, अशी एक आशाही समस्त मराठी जणांना लागली आहे. ती फलद्रूप होवो, ही अपेक्षा.