अग्रलेख : अमेरिकी ‘छापा’-काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden

अमेरिकेतही २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि आजी-माजी अध्यक्षांच्या घरांत सापडलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या विषयाची फोडणी मिळाल्याने वातावरण आत्तापासून तापू लागले आहे.

अग्रलेख : अमेरिकी ‘छापा’-काटा

अध्यक्षांच्या घराची झडती घेण्यात आली, त्यामुळे अध्यक्ष बायडेन अडचणीत आले. पण महत्त्वाचे हे की, व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी कायदा यंत्रणेपेक्षा ती मोठी नाही, हेही या कारवाईतून दिसते.

अमेरिकेतही २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि आजी-माजी अध्यक्षांच्या घरांत सापडलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या विषयाची फोडणी मिळाल्याने वातावरण आत्तापासून तापू लागले आहे. या सगळ्या तपासातून नेमके काय निष्पन्न होईल, उच्चपदस्थांवर कारवाई होईल का, प्रकरणे शेवटपर्यंत तडीस जातील का, वगैरे प्रश्न आहेतच. अशा बहुतेक प्रकरणांचा जास्त करून निवडणुका होईपर्यंत धुरळा उडतो आणि नंतर त्यांचे काय झाले, हे अनेकदा कळतही नाही. ‘सार्वजनिक स्मृती क्षीण असते’, असे म्हणतात आणि सर्वच देशातले राजकारणी त्याचा फायदा उठवत असतात. तरीदेखील अमेरिकी अध्यक्षांच्या घरातील तपास-झडतीचा विषय दखलपात्र आहे, याचे कारण यानिमित्ताने तेथील यंत्रणा बऱ्याचअंशी स्वतंत्रपणे काम करतात, याचा प्रत्यय येत आहे.

प्रत्येक अध्यक्षीय कार्यकाळात तयार झालेली, हाताळली गेलेली संवेदनशील माहितीची, गोपनीय स्वरुपाची कागदपत्रे कार्यकाळ संपल्यानंतर ‘व्हाइट हाउस’मधून राष्ट्रीय अर्काईव्हजमध्ये ठेवली जावीत, अशी अमेरिकेत पद्धत घालून दिलेली आहे. तसा कायदा करण्यात आला असून त्यामागे राष्ट्रीय सुरक्षेचाही संदर्भ आहे. पण अशी कागदपत्रे जर दीर्घकाळ घरातच ठेवली गेली असतील, तर तो औचित्यभंग तर आहेच; पण कायद्याचेही उल्लंघन आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीशान निवासस्थानी अशी बरीच कागदपत्रे सापडली आणि त्यासाठी जो छापा घातला गेला, त्याबद्दल ट्रम्प यांनी थयथयाट केला होता. `आपल्याला २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणातून हुसकावून लावण्यासाठीच डेमोक्रॅटिक पक्षाने हे कारस्थान केले ’ असा आरोप त्यांनी केला होता.

तर डेमोक्रॅटिक पक्षाने विशेषतः अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या विषयावरून ट्रम्प यांच्या बेजबाबदारपणाचे सातत्याने वाभाडे काढले होते. आपले प्रशासन कायद्याच्या चौकटीत प्रामाणिकपणे, कार्यक्षम रीतीने काम करणारे आहे, असा दावा ते करीत आले आहेत. पण आता त्यांच्याच उपाध्यक्षपदाच्या काळातील काही महत्त्वाची व गोपनीय कागदपत्रे त्यांच्या घरात आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पक्ष आणि त्यातही डोनाल्ड ट्रम्प यांच्या दांडगाईच्या शैलीविषयी नव्याने काही सांगण्यासारखे नाही. अध्यक्षीय प्रासादावर ट्रम्प यांचे कार्यकर्ते अक्षरशः चालून गेले होते, ही घटना तर अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक अभूतपर्व घटना. त्यामुळे ट्रम्प यांच्या घराची झडती होणे आणि त्यावर ट्रम्प यांनी कांगावा करणे, यात आश्चर्य नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीतही हा प्रकार घडला, हे धक्कादायक म्हणावे लागेल.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ट्रम्प यांच्या घरात तपासाधिकारी छापा टाकून कागदपत्रे शोधत होते, तेव्हा ते पदावर नव्हते. याउलट बायडेन यांच्या घरात तपास सुरू आहे आणि काही गोपनीय कागदपत्रे ताब्यात घेण्यात येत असताना ते अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. डेलावेर प्रांतातील त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सलग तेरा तास तपास सुरू होता. नोव्हेंबरमध्येही बायडेन यांच्या निवासस्थानी काही कागदपत्रे सापडली होती, परंतु ही बाब त्यांनी चव्हाट्यावर येऊ दिली नव्हती. अखेर माध्यमांनीच नऊ जानेवारीला ही घटना उघडकीस आली. आणि आता सुरू असलेल्या तपासाविषयी तर सर्वांनाच माहिती देण्यात येत आहे.

आजी-माजी अध्यक्षांच्या बाबतीतील या प्रकरणात न्यायखात्याने दोन विशेष वकिलांची नियुक्ती केली आहे आणि चौकशी निःपक्षपातीपणे होईल, असा निर्वाळा दिला आहे. त्याचे पुढे काय होईल ते होईल; परंतु तूर्त ट्रम्प यांच्या हातात आयतेच कोलित मिळाले आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील प्रचाराच्या बाबतीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हातातील एक हत्यार बायडेन यांच्या निष्काळजीपणाने बोथट झाल्यासारखे आहे, हे नक्की. याच्या राजकीय आणि कायदेशीर परिणामांचे काय होते, हे यथावकाश समजेल. पण तूर्त जे घडते आहे, त्याचेही वेगळेपण लक्षात घ्यायला हवे. ‘कायद्यासमोर सर्व समान’ हे तत्त्व फक्त कागदावर लिहिण्याचे, सभा-समारंभातील भाषणे सजविण्याचे असून चालत नाही. ते जर एखाद्या समाजात, देशात खरेच रुजले असेल तर ते प्रत्यक्ष कार्यपद्धतीत दिसावे लागते.

जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या घरावर छापा टाकून अमेरिकी तपासाधिकारी सहजपणे चौकशी करीत आहेत आणि ते करताना त्यांना कोणीही अडवत नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे अध्यक्षांना प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागत आहे आणि कितीही अवघडलेपण आले तरी ते आपली बाजू त्यांच्यापुढे मांडत आहेत. हे खरे की, लोकशाही एक शासनप्रणाली आणि जीवनप्रणाली म्हणून कोणत्याच देशाला परिपूर्ण अवस्थेत नेता आलेली नाही. तरी पण तिने प्रगल्भतेचा विशिष्ट टप्पा गाठला आहे किंवा नाही, हे तरी नक्कीच तपासता येते. कायद्याची बूज राखताना समोरची व्यक्ती किती उच्चपदस्थ आहे, ती कोणत्या पक्षाची आहे, याचा विचार न करता यंत्रणा आपले काम करू शकतात, ही बाबदेखील कमी महत्त्वाची नाही.