

वरतून बरसणारे ते आषाढांचे घन, आणि खाली भक्तांच्या मेळ्यात रमलेला तो घननीळ...खरोखर आषाढी एकादशी हा मराठी मुलुखातला भक्तिसंगमाचा मुहूर्तच.
बऱ्याचदा आषाढी एकादशीला ‘ये रे घना, ये रे घना’ अशी विरहव्याकुळ साद घालावी लागते. गेल्या दोन दिवसांत त्याची सर्वदूर उपस्थिती दिलासा देणारी असली तरी आजच्या दिवशी प्रत्येकाच्या मनातील प्रार्थना असेल ती यंदाच्या मोसमी पावसाने आपली ‘खेळी’ पूर्ण करावी याची.
बऱ्याच मिनत्या-आर्जवांनंतर सासुरवाडी आलेल्या जावयासारखा पाऊस थोड्या विलंबाने आला, त्याची आता खातिर करायला हवी. त्याचे हवे-नको पाहायला हवे. ‘पर्जेनराव वस्तीला आलाच आहे तर, आल्यासरसा चार महिने टिकला पाहिजे. शेतशिवारे हिरवीगार करुन मगच गेला पाहिजे’,हीच सार्वत्रिक भावना आहे.
पावसाचे हे असेच असते. येण्याची वेळ अदमासे नक्की असली तरी नेमका कधी पडेल, सांगता येत नाही. ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ असली चिरीमिरीची आमिषे त्याला दाखवावी लागतात. मोठा बेभरवशी पाहुणा आहे. नूर ठीकठाक असला तर चार- सहा महिने राहील. राहिला, तर कनवट ढिली सोडून साऱ्या घरादाराची अडनड भागवील.
कधी ‘नको नको रे पावसा, घालू धिंगाणा अवेळी’ असे त्याला खडसून सांगावे लागेल. कधी पटकन उठून निघून जाईल, आणि नशिबी दुर्भिक्ष्य आणील. म्हणूनच त्याच्या येण्याची काळजी लागून राहिलेली असते. पण जातो, तेव्हा कसा आणि कधी जातो, ते पाहायला कुणीही थांबत नाही.
या आवडीच्या पाहुण्याच्या स्वागताला माणसे पार ठेसनापर्यंत जातील, पण जाताना? निरोपाचा साधा नारळही कुणी देत नाही! अर्थात ही अपमानास्पद बोळवण मनाला लावून न घेता तो पुढल्या वर्षी नेमाने येतो, हा त्याच्या मनाचा मोठेपणा!
यंदा संपूर्ण मृग नक्षत्र वाया घालवल्यानंतर आरामशीर उगवलेल्या पर्जन्याने मग मात्र वेळ न दवडता भराभरा कामे उरकली. राजस्थानचे वाळवंट आणि कच्छच्या रणाचा काही इलाखा सोडला तर दिल्लीसकट जवळपास सगळा देश मेघांनी व्यापून टाकला.
महाराष्ट्रात तर पावसाने कोनाकोपऱ्यात झडझडून हजेरी लावली. कास्तकारांनी शिवारात पेरणीची लगबग सुरु केली. नपेक्षा महाराष्ट्रात काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले होते. ते टळले, हे सुदैवच. विहिरींनी तळ गाठले होते, आणि धरणातले पाणीसाठेही कमालीचे रोडावले होते.
हा आभाळातला बाबा तोंडचे पाणी पळवतो की काय, असे भय वाटू लागले असतानाच, आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या दिंड्यांना रस्त्यात गाठण्याचा नेम मात्र पावसाने चुकवला नाही. आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून अखिल महाराष्ट्रातील भुई भिजवून टाकणाऱ्या पावसाने काही बांधवांना शेतशिवारात जुंपले, पण काहींनी मात्र सर्व भार पंढरीराण्यावर टाकून वारीत पाऊल घातले. एकवेळ पावसाचा नेम चुकेल, पण वैष्णवांचा नाही.
आषाढी एकादशी हा आपल्या मराठी मुलुखातला भक्तिसंगमाचा मुहूर्त. या दिवशी विविध ठिकाणच्या दिंड्या पंढरपुरात पोचलेल्या असतात. चंद्रभागेमध्ये स्नान ते करुनी, विठ्ठलदर्शनाच्या ओढीने वैष्णवांचे थवे सोळखांबीकडे झेपावू लागतात. त्या समचरणांना दिठीची मिठी पडली की कुडी धन्य झाल्याची भावना वैष्णवजनांना होते.
सारा अट्टहास याजसाठी तर असतो. विठुच्या गजराने चंद्रभागेचे वाळवंट दुमदुमून जाते. आळंदीहून ज्ञानोबामाऊलींची, देहूहून तुकोबामाऊलीची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथ महाराजांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, मुक्ताईनगरहून मुक्ताबाईची आणि शेगावाहून संत गजानन महाराजांच्या पालख्या एक समयावच्छेदे करोन पंढरीनगरीत पोचतात.
एक पालखी उत्तरेतूनही आलेली असते. -ती असते संत कबिरांची! ‘कबिरा खडा बाजार में लिए लुकाठी हाथ, जो फूंके घर सो अपना, चलो हमारे साथ’ अशी साद घालणाऱ्या संत कबिरांच्या पालखीचा जत्था पंढरीरायाच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. आपल्या संतसज्जनांनीही हीच असोशी अभंग-ओव्यांमधून मांडली.
‘ऐसा नामघोष ।ऐसे पताकांचे भार । ऐसा वैष्णवांचा डिंगर । दावा कोठे?॥’’ अशी मुळी पैजच संत सेना महाराजांनी लावली होती, ती काही उगीच नाही. सर्वांनाच वेडू लावणारा हा कानडाऊ विठ्ठलु आहे. ही सणासुदी नाही तर काय? वरतून बरसणारे ते आषाढांचे घन, आणि खाली भक्तांच्या मेळ्यात रमलेला तो घननीळ! डोळ्यांची धणी फिटावी, असे हे दृश्य.
श्रीविठ्ठल-रखुमाई हे अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची साग्रसंगीत पूजा पार पडते. दर वर्षी आपले मुख्यमंत्री विठ्ठलाकडे ‘महाराष्ट्राचे भले होऊ दे’, म्हणून साकडे घालतात. यंदा तर तेलंगणाचे मुख्यमंत्रीही लवाजम्यासह येऊन महाराष्ट्राच्या भलाईचे मागणे मागून गेले! निवडणुकीचा काळ उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, आणि विठुराया सारे काही पाहातोच आहे!
आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. या दिवशी देवाधिदेव क्षीरसागरात शेषाच्या शयनी झोपी जातात, अशी एक प्रचलित समजूत. इथून पुढे चार महिने व्रतवैकल्याचे, आणि शेतशिवारात राबण्याचे. वरुणराजाने सृष्टीचा ताबा घेतलेला असतो. पीकपाणी व्यवस्थित झालेले पाहून, शिवारे डोलू लागली की तो काढता पाय घेतो.
अर्थात याचा अर्थ सारे काही पंढरीरायावर सोपवून निर्धास्त व्हावे, असे नव्हे. प्रपंच कोणाला चुकला आहे? तो जनसामान्यांना जसा चुकला नाही, तसाच मायबाप सरकारलाही. वारीचे पुण्य गाठीला बांधून सर्वांनाच शेवटी कामाधामाकडे वळावे लागते. एकट्या पावसानेच का म्हणून राबावे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.