esakal | अग्रलेख : आवर रे, सावर रे
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi

अग्रलेख : आवर रे, सावर रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ज्या आघाडीमुळे आपल्याला राज्यात काही पत मिळाली आहे, त्या आघाडीच्या एकसंधतेला तडा जाणार नाही, एवढे तरी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी लक्षात घ्यायला हवे. आक्रमकता दाखविण्याच्या नादात हे भान सुटू नये.

अवघे आयुष्य विदर्भाच्या काहिलीत काढलेल्या आणि अधून-मधून मुंबईच्या उष्म्याचा अनुभव घेणाऱ्या नाना पटोले यांना मग लोणावळ्याच्या आल्हाददायक वातावरणात स्फूर्ती आली, तर त्यात नवल नव्हते. खरे तर विधानसभा अध्यक्षपदावरून त्यांची नियुक्ती थेट प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाली, तेव्हापासूनच स्फूर्तिदेवता त्यांच्यावर प्रसन्न झाल्याचा अनुभव अवघा महाराष्ट्र घेतच आहे! लोणावळ्यातही त्याचेच प्रत्यंतर आले. त्यांच्या वक्तृत्वाला बहर आला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर ‘पाळत’ ठेवत आहेत!’ असा घणाघाती आरोपही करीत सर्वांचेच लक्ष त्यांनी वेधून घेतले. अर्थात, आपल्या या उद्‍गारांच्या प्रसारमाध्यमांत हेडलाइन होतील आणि त्यानंतर अंतर्गत धुसफुसीमुळे पोखरलेल्या महाविकास आघाडीत रण माजेल, एवढे समजण्याइतके शहाणपण या नानांकडे उपजतच आहे!

तरीही लोणावळ्यात शनिवारी झालेल्या काँग्रेस शिबिरात नाना पटोले हे बोलले आणि मग व्हायचे तेच झाले. शरद पवार यांनी ‘मी लहान माणसांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसतो. सोनिया गांधी काही बोलल्या असतील तर गोष्ट वेगळी!’ असे सांगत पटोले यांना त्यांची जागा दाखवून दिली. शिवाय, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनीही त्यांची या विधानाबाबत त्यांची शेलक्या शब्दांत संभावना केली. गेले काही दिवस हेच नाना ‘स्वबळा’चा नारा देत अवघ्या महाराष्ट्रात हाकारे देत फिरत आहेत. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सौम्य व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राखणे परवडणारे नाही हे लक्षात आल्यामुळेच आक्रमक बाणा अंगी असलेल्या नानांच्या हातात ती सूत्रे काँग्रेस श्रेष्ठींनी दिली आहेत. त्यामुळे आपला तो बाणा रोजच्या रोज दाखवून देणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे, असा नानांचा समज झालेला दिसतो. परंतु आक्रमकता आणि वादग्रस्तता यात फरक असतो. ज्या आघाडीमुळे आपल्याला राज्यात काही पत मिळाली आहे, त्या आघाडीच्या एकसंधतेला तडा जाणार नाही, एवढे तरी लक्षात घ्यायला नको का? वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर नंतरच्या दोनच दिवसांत त्यांना आपले शब्द गिळून आपला रोख केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर होता, असे सांगणे भाग पडले.

पाळत आणि सुरक्षा

मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार या दोहोंना ज्येष्ठ पोलिस अधिकारी राज्यात नेमके काय चालले आहे, याचे ‘ब्रिफिंग’ रोजच्या रोज करत असतात. त्यात अर्थातच राजकीय हालचालींचाही समावेश असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्य़मंत्री ही अशी शक्तिमान पदे आहेत, की मग याच यंत्रणेचा वापर करून ते केवळ विरोधकांच्याच नव्हे तर स्वपक्षीयांच्या हालचालींवर नजर ठेवत असतात. यात काहीच नवे नाही. १९७० या दशकात काँग्रेसच्या राजवटीत वसंतराव नाईक आपल्याच पक्षातील नेत्यांवर गुप्त पोलिस यंत्रणेचा वापर करून कशी नजर ठेवत असत, याच्या अनेक सुरस कहाण्या सर्वश्रुत आहेत. अशाच एका नेत्याने एका पत्रकाराला भेटायला एका पंचतारांकित हॉटेलात बोलावले आणि तेथे बसताच समोरच्या वेटरला बघून तो नेता बाहेरच पडला. त्याचे रहस्य म्हणजे वेटरचा वेश परिधान केलेला तो एक सीआयडी अधिकारी होता!

त्यामुळे नाना म्हणतात त्याप्रमाणे ‘आपण रोजच्या रोज काय करतो, याचीही बित्तम््बातमी उद्धव ठाकरे तसेच अजित पवार यांना कळते यात नवल ते काहीच नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीतील मंत्री; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नानांना कारभारची प्रक्रिया समजून घेण्यचा सल्ला दिला आहे. शिवाय, ‘पाळत’ आणि ‘सुरक्षा’ यांतील फरक त्यांना ठाऊक असणारच, असा टोलाही मलिक यांनी मारला आहे. अनेक नेत्यांना अधिकृतपणे सुरक्षा दिलेली असते, तेव्हा ते पोलिस हे त्या त्या नेत्यांवर ‘पाळत’ ठेवण्यासाठी ठेवले गेले आहेत का, असा प्रश्न नानांना आता विचारला जात आहे. मात्र, आपल्या विधानापासून माघार घेतल्यानंतरही नानांची वाक्सरिता थांबलेली नाही. दुसऱ्याच दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘प्रसारमाध्यमे केंद्र सरकारच्या दबावास बळी पडतात’, असा आरोप केला. एका वृत्तवाहिनीचे नाव न घेता नानांनी हा आरोप केल्यामुळे आता ते आणखी एक वाद तर उपस्थित करू पाहत नाहीत ना, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

‘पाळत’ हा विषय काँग्रेसजनांसाठी नवा नाही. विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. मात्र, काही महिन्यांतच राजीव गांधींनी ‘आपल्यावर केंद्र सरकार पाळत ठेवत आहे,’ असा आरोप करून त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता आणि देशाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागले. आता आपल्यावर ‘पाळत’ ठेवली जात आहे, असे सांगणारे नाना पटोले या महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेणार काय? मुळात त्यांना तसा निर्णय घेण्याचा अधिकार आहे काय? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. आपल्या पक्षाची वाढ आणि विस्तार करणे हा नानांचा अधिकार आहे. मात्र, आपले प्रमुख काम सरकार टिकवणे हे आहे, तेथील कारभाराशीही पक्षविस्ताराचा संबंध आहे, हेच हे नाना विसरून गेले आहेत की काय? सरकारमध्ये एकत्र; पण पक्ष म्हणून वेगळे चालवताना काही ताण येणार हे उघड आहे. पण म्हणून कायम मित्रांनाच अंगावर घेण्याच पवित्रा कशातच उपयोगाचा नाही. सतत अस्वस्थ कॉंग्रेसवाल्यांचे प्रतीक बनलेल्या नानांनी हा धडा घ्यावा आणि या उत्साहाला आवरावं सावरावं.

loading image