अग्रलेख : मुंबईचे महाभारत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील सभेत ठाकरेंच्या शिवसेनेला जमीन दाखवण्याचे आवाहन केले होते.

अग्रलेख : मुंबईचे महाभारत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन गटांतील संघर्ष गेले अनेक दिवस धुमसत असला तरी त्याला खरे टोक येणार आहे, ते मुंबई महापालिकेच्या निमित्ताने होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने. नेहेमीच्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात आक्रमक फटकेबाजी तर केलीच;पण त्यांच्या भाषणाचा सारा रोख होता, तो मुंबईची खरी काळजी कोण घेतो, या मुद्यावर. शिवसेना आणि शिवसैनिकांनी मुंबईसाठी केलेल्या कामांचा, त्यागाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही अटीतटी आगामी काळात अधिक उग्र रूप धारण करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘वर्षा’ बंगला सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही अपवाद वगळता मौनात होते. त्यांच्याऐवजी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आदी मंडळी किल्ला लढवत असल्याचे चित्र होते. गोरेगावातील ‘नेस्को’ येथे बुधवारी घेतलेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या बैठकीत बोलताना हे मौन सोडून उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी अर्थातच भाजप आणि शिंदे गटाला टीकेचे लक्ष्य केले. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि ठाकरेंच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांवर त्यांनी घणघाती हल्ला चढवला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील सभेत ठाकरेंच्या शिवसेनेला जमीन दाखवण्याचे आवाहन केले होते. ‘त्याच जमिनीतून पाती नव्हे; तर तलवारीही उगवतात,’ असे सडेतोड उत्तर त्याला ठाकरेंनी दिले. भाजपने शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग लावल्याचा संताप ठाकरेंच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत आहे. शेलकी विधाने, विरोधकांना कोपरखळ्या, शिवसैनिकांच्या भावनेला हात घालणे आणि पक्षातील बंडखोरांवर आगपाखड असे ठाकरे यांच्या भाषणाचे स्वरूप होते. भाजपच्या कोणत्याही स्वरुपाच्या आव्हानाला परतून लावण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र या आक्रमकतेला नव्याने संघटनात्मक बांधणीची जोड द्यावी लागेल. आपण खचलेलो नाही, हे त्यांनी भाषणातून दाखवून दिले हे खरे; पण आता गरज आहे ती मुंबईतील आणि राज्यातीलही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे. नुसत्या भावनिक आवाहनातून तात्कालिक परिणाम साधला जातो, पण त्याचे टिकाऊ जनाधारात रूपांतर करण्यासाठी कायमस्वरुपी कार्यक्रमांची, संघटनात्मक बांधणीची गरज असते. निदान आता तरी या गोष्टींकडे उद्धव ठाकरे लक्ष देतील, असे वाटते. ठाकरेंची गर्जना हवेत विरते न विरते तोच त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा रोवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिंधे नाही, बाळासाहेबांचे खंदे’, ‘गद्दार नाही, खुद्दार’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा फड गेल्या वेळेपेक्षाही अधिक संघर्षमय ठरेल,अशीच लक्षणे दिसताहेत. प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप लावत विरोधकांना नामोहरम करण्याचे सूत्र भाजप राबवत आहे. त्यासाठी त्यांची व्यूहरचना तयार आहे. शिवाय, लोकसभेच्या १४४ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यात महाराष्ट्रातील १५ जागा आहेत.

एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत हे खासदार असलेल्या कल्याणसह राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतसुद्धा भाजपने शिबंदी वाढवत, तटबंदी मजबुती करणे चालवले आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर कधी नव्हे तो पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक इतकी अटीतटीची झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालून हैदराबाद महापालिकेप्रमाणे मुंबईतही सर्व ताकदीनिशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे इरादे स्पष्ट केले आहेतच. शिवाय ठाकरेंच्या बुरुजाला पुन्हा सुरूंग लावण्याचा निर्धारही. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत गेल्याबद्दल आणि ईडीच्या गैरवापराबद्दल भाजपवर तोफ डागली. सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो शिंदे आणि समर्थकांच्या बंडखोरीचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसदार होण्याचा. त्यावर शिवसैनिकांच्या भावनिकतेला हात घालत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर तडाखेबंद टीका केली.

दुसरीकडे सत्तांतरानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांनी राज्य पिंजून काढले. दहीहंडीचा इव्हेंट कॅश केला. त्यापाठोपाठ गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदेंनी शिवसेनेतील बुजुर्गांसह गणेश मंडळांना दिलेल्या भेटीतून गटाची मजबुती आणि स्वप्रतिमा संवर्धन साधले. आदित्य ठाकरेंनीही राज्याचा व्यापक दौरा केला. ‘राज्यात बाप पळवणारी टोळी फिरते,’ या ठाकरेंच्या विधानाला शिंदेंनी ‘तुम्हांला बापाचा पक्ष विकणारी टोळी का म्हणू नये’ हा केलेला प्रतिप्रश्‍न, ‘शिंदे, मिंधे’ या आरोपावर शिंदेंनी दिलेले ‘मिंधे नाही, बाळासाहेबांचे खंदे’ हे उत्तर असा बराच खणखणाट झाला. यामुळे मतभेदाची दरी रुंदावल्याचे दिसत आहे. राज्याच्या राजकारणाला मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालाने दिशा मिळू शकते. राजकीय धोरणाची, आघाडी-बिघाडीची गणिते त्यातून मांडली जातील. त्याच्याइतकाच ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाचा कस मुंबई महापालिका निवडणुकीत लागणार आहे. महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेच्या राजकारणाच्याच नव्हे तर अर्थकारणाच्या दृष्टीनेही किती महत्त्वाची आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यावरून होणाऱ्या राजकीय लढाईचा नूर पाहता, मुंबईचे नागरी प्रश्न फक्त तोंडी लावण्यापुरते राहणार की काय, अशी भीती मात्र नक्कीच निर्माण झाली आहे.

Web Title: Editorial Article Writes Mumbai Politics Shivsena Uddhav Thackeray Bjp Eknath Shinde Group Mumbai Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..