अग्रलेख : छापा अन्‌ ‘काटा’

येत्या अडीच-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशाबरोबरच पंजाब आणि अन्य तीन राज्यातही विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSakal
Updated on
Summary

येत्या अडीच-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशाबरोबरच पंजाब आणि अन्य तीन राज्यातही विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.

विविध सरकारी तपास यंत्रणांना ऐन निवडणुकांच्या तोंडावरच कशी काय जाग येते आणि त्या त्या राज्यांतील भाजपविरोधकांशी संबंधित प्रकरणे उकरून काढण्याची बुद्धी का होते, हे प्रश्‍न निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. सोईचे आणि सूडाचे राजकारण यामागे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच वाराणसी मतदारसंघातील ऐतिहासिक काशी विश्वनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग समस्त देशवासीयांना प्रशस्त करून दिल्याबद्दल सरकारी पातळीवर सुरू असलेला जल्लोष अखेर हळुहळू ओसरला. मात्र, त्यानंतरच्या चारच दिवसांत उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ पाहणाऱ्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या चार निकटवर्तीयांवर प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यांमुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्या राज्यात नवेच वादळ उठले आहे! प्राप्तिकर विभाग असो, की अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’) वा सीबीआय या केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणांचा वापर राजकारणासाठी करण्याचा रिवाज गेल्या सहा-सात वर्षांत पडून गेला असला तरी निवडणुका दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना पडलेल्या या छाप्यांमुळे दोन नवेच मुद्दे चर्चेत आले आहेत.

एकतर काशी विश्वनाथ मंदिराचा मार्ग प्रशस्त झाल्यामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशभरात आनंदाची लाट आल्याचे वातावरण उत्तर प्रदेश सरकार देशभरातील माध्यमांमधून सरकारी खर्चाने रोजच्या रोज जाहीर करत आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ सरकारचा आगामी निवडणुकातील विजयाचा मार्गही सुकर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मग नेमके अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांना हाच मुहूर्त साधून लक्ष्य करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण तर केंद्रातील मोदी सरकार करू पाहत नाही ना, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल. अर्थात, प्राप्तिकर खाते वा ‘ईडी’ यांनी छापे टाकावेत, असा संशय निर्माण होण्याजोगे वर्तन या संबंधितांनी केले असल्याशिवाय वा तशा तक्रारी असल्याशिवाय अशा घटना सहसा घडत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. मात्र, आता या छाप्यांसाठी जे काही ‘टायमिंग’ प्राप्तिकर खात्याने साधले आहे, ते बघता या खात्यांचा त्यामागील नेमका उद्देश राजकीय बदनामीशिवाय अन्य कोणता असणार? त्यामुळेच ‘भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांत प्राप्तिकर विभागालाही उतरवले आहे काय’, असा प्रश्न समाजवादी पक्षाने विचारला आहे.

येत्या अडीच-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशाबरोबरच पंजाब आणि अन्य तीन राज्यातही विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या केंद्रीय यंत्रणा गेल्या काही दिवसांत नेमके कोणाला लक्ष्य करू पाहत आहेत ते बघितले की समाजवादी पक्षाच्या आरोपातील तथ्य लक्षात येते. पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुकारलेल्या बंडानंतर तेथे सत्ताप्राप्तीचे डोहाळे भाजपला लागले आहेत. मात्र, तेथे काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी यांच्या आव्हानाला भाजपला सामोरे जायचे आहे. या पार्श्वभूमीवर गेल्याच महिन्यात ‘ईडी’ने काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुखपाल सिंग खैरा यांना २०१५मधील एका अमली पदार्थाच्या तस्करीसंबंधात अटक केली. याच प्रकरणात ‘ईडी’ने ‘आप’चे सरचिटणीस पंकज गुप्ता यांनाही चौकशीसाठी पाचारण केले होते.

गेल्या एप्रिलमध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्राप्तिकर खात्याने द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांच्या कन्येच्या घरावर छापे घातले होते. तेव्हाही हे छापे निव्वळ राजकीय कारणास्तव घालण्यात आल्याचा आरोप झाला होताच आणि तामिळनाडूत त्यावरून मोठे वादंगही उठले होते. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या तोंडावरही गेल्या फेब्रुवारीत ‘सीबीआय’ने ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुचिरा यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. तर या निवडणुका सुरू असताना तृणमूल काँग्रेसचा प्रचार करणारे छत्रधर महातो यांच्या विरोधात ‘एनआयए’ने २००९ मधील एक प्रकरण उपस्थित करून, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. विविध सरकारी यंत्रणांना ऐन निवडणुकांच्या तोंडावरच जाग येते आणि त्या त्या राज्यांतील भाजपविरोधकांशी संबंधित प्रकरणे उकरून काढायला कसे उमजते, हेच या साऱ्या घटना स्पष्ट करून दाखवत आहेत. त्यामुळे भले अखिलेश यादव यांच्या या चार निकटवर्तीयांविरोधात काही आरोप असले तरी निवडणुका सामोऱ्या येईपावेतो मग या यंत्रणा हातावर हात ठेवून स्वस्थ का बसल्या होत्या, याचे उत्तर मिळायला हवे.

स्वत: अखिलेश यांनी मात्र यासंबंधात प्रतिक्रिया देताना भाजपबरोबरच काँग्रेसलाही लक्ष्य करून, काँग्रेसच्या मतपेढीला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भाजपच्या राजवटीतच नव्हे तर काँग्रेसच्या राजवटीतही सरकारी यंत्रणांचा अशाच प्रकारे दुरुपयोग करून विरोधकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात होता,’ ही त्यांची प्रतिक्रिया म्हणजे प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशात मिळू लागलेल्या प्रतिसादाचीच साक्ष आहे. अमेठीत झालेल्या प्रियांका तसेच राहूल यांच्या मेळाव्यास झालेली गर्दी ही भाजपविरोधी मतदानात वाटा उचलणार आणि त्याचा फटका समाजवादी पक्षालाच बसणार आहे. त्यामुळेच आता अखिलेश यांना काँग्रेसला लक्ष्य करणे भाग पडलेले आहे. एकंदरित पुढच्या दोन-अडीच महिन्यांत उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे आणि आरोप-प्रत्यारोपांचा महापूर गंगा-यमुनेच्या पुरापेक्षाही मोठा असणार, हेच या साऱ्या घटना सांगत आहेत. अर्थात, या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने अखिलेश यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केल्यामुळे भाजपच्याही पायाखालची वाळू घसरत चालली आहे काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र तेथील मतदारच देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com