अग्रलेख : ...अशीही पळवापळवी!

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच्या चारच दिवसांत राजकीय हालचालींना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात तर ‘आयाराम-गयारामां’चे पेव फुटले आहे.
Politics
PoliticsSakal
Summary

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच्या चारच दिवसांत राजकीय हालचालींना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात तर ‘आयाराम-गयारामां’चे पेव फुटले आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच्या चारच दिवसांत राजकीय हालचालींना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात तर ‘आयाराम-गयारामां’चे पेव फुटले आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे उदंड पीक येणे हा आपल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. त्यावर पक्षनिष्ठा, मूल्यांशी बांधिलकी याची चर्चा होते, पण राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नसते. देशातील या सर्वात मोठ्या राज्यांत २०१७ प्रमाणेच तिनशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारातील दोन मंत्री आणि चार आमदार भाजप बाहेर पडले आहेत. ते अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या छावणीत दाखल होऊ पाहत आहेत. जाती-पातींचा सुळसुळाट असलेल्या या राज्यांत आजवर निवडणुकांची गणिते ही त्याच निकषांवर मांडली जात असून, हे दोघेही मंत्री बिगर-यादव ओबीसी समाजातील असल्याने हा भाजपला मोठाच धक्का आहे.

अर्थात, भाजपनेही लगोलग अन्य पक्षातील किमान चार आमदार आपल्या जाळ्यात ओढून हम भी कुछ कम नहीं, असे दाखवून दिले आहे. मात्र, या राजकीय फोडाफोडीच्या खेळात तूर्तास तरी अखिलेश यांचे पारडे जड दिसते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आजवर समाजवादी पक्षाचे राजकारण हे ‘मुस्लिम-यादव’ याच दोन समुहांच्या पाठिंब्यावर अवलंबून होते आणि यादव वगळता अन्य ओबीसी समाज हा भाजपच्या गोटात राहणे पसंत करत असे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी योगींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले स्वामीप्रसाद मौर्य हे बिगर-यादव ओबीसी समाजातील आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच्या २४ तासांतच दारासिंग चौहान यांनीही त्याच मार्गावरून जात, समाजवादी पक्षाची वाट धरली. गेल्याच आठवड्यात पश्चिम उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा असलेले आणि मुख्य म्हणजे गांधी कुटुंबियांचे निकटवर्ती अशी ख्याती असलेले इम्रान मसूद यांनीही समाजवादी पक्षाची वाट धरली. या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे, गंगा-यमुनेच्या या खोऱ्यात भाजप आणि समाजवादी पक्ष सोडून मायावतींचा बहुजन समाज पक्ष तसेच काँग्रेस हेही रिंगणात असले, तरी मुख्य लढत ही भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच होणार आहे. त्यामुळे ही उलटी गंगा वाहू लागली आहे. इम्रान मसूद यांनी तर तसे स्पष्टच केले आहे. भाजपशी लढत फक्त समाजवादी पक्षच देत असल्याने त्या पक्षाला बळ द्यायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपच्या छावणीतील हे काही प्रमुख शिलेदार बाहेर पडण्याचे मुख्य कारण योगी आदित्यनाथ यांची कार्यशैली. योगींच्या हातात भाजपने राज्याची सूत्रेही नाईलाजाने दिली होती. गेल्या विधानसभेतील फार मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाच्या निवडीवेळी दंडेलशाहीचे प्रदर्शन त्यांच्या समर्थकांनी घडवले होते. त्यानंतर हे सरकार केवळ उच्चवर्णीयांचे सरकार आहे, अशी टीका होऊ लागली; मात्र प्रत्यक्षात हे सरकार फक्त ठाकूरांचे हितसंबंध जोपासण्यात दंग होते. त्यामुळेच मौर्य तसेच चौहान हे दोन ओबीसी नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडले. अर्थात, मौर्य आणि चौहान हे दोघेही मूळ भाजपचे नव्हतेच; ते समाजवादी पक्षातून गेल्या काही वर्षांत भाजपवासीय झाले होते, असा प्रतिवाद आता भाजपतर्फे केला जात आहे. मात्र, ते दोघेही या समाजातील वजनदार नेते आहेत. त्यामुळेच मध्यंतरी चौहान यांना भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुखपदही देण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने भाजप ‘प्रोजेक्ट’ करत आहेत, ते पाहता या दोन नेत्यांमागे त्यांचा समाज जाईल, असे समजता कामा नये. त्यामुळेच ही निवडणूक न लढवता, अन्य राज्यांकडे आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या मायावती यांची ‘व्होट बँक’ त्यांच्या अनुपस्थितीत काय भूमिका घेते, यावरच या अटीतटीच्या निवडणुकांचे निकाल अवलंबून राहणार हे उघड आहे. २०१७ मध्ये मायावतींचा पक्ष अवघ्या १९ जागा जिंकू शकला असला, तरी त्या पक्षाला २२.२३ टक्के मते मिळाली होती. भाजपचे अवघे राजकारण यादव सोडून ओबीसी आणि जाटव सोडून दलित या भोवतालात आहे. त्यामुळे मायावती मैदानात नसताना, हा जाटव समाज नेमका कोणाकडे जातो, यावर बरेच अवलंबून असेल.

उत्तर प्रदेशातील राजकारण अशा रीतीने जाती-पातींमध्ये विस्कट असताना, गोव्यासारख्या छोट्या राज्यातही भाजपच्या गोटात सारेच आलबेल म्हणावे, अशी परिस्थिती नाही. तेथील भाजप नेते मायकेल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर गोव्यातील भाजपचे एकेकाळचे तारणहार दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या चिरंजीवांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये वादंग माजले आहेत. ‘केवळ आपल्या वडिलांच्या पुण्याईवर त्यांना उमेदवारी मिळणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने या वादात तेलच ओतले गेले आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकार काही जुनी प्रकरणे उकरून, इम्राद मसूद तसेच स्वामीप्रसाद मौर्य यांच्या मागे पोलिसी ससेमिरा लावू पाहत आहेत. एकंदरीत या निवडणुका आयाराम-गयाराम गाजवणार आणि लढती अटीतटीच्या होणार हे निश्‍चित.

चमत्कारी राजकारणी सत्याचे असत्यात, नितीचे अनितीत, अहंतेचे अस्मितेत, दौर्बल्याचे विवेकात किंवा क्रौर्याचे न्यायनिष्ठुरतेत सहजी रुपांतर करू शकतो. त्यासाठी डोके असावे लागत नाही. फक्त चारित्र्य नसावे लागते.

- जोसेफ हेलर, विख्यात विनोदकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com