
सध्या जगणे महाग असले तरी मरण कमालीचे स्वस्त होत आहे, याचा धक्कादायक प्रत्यय अलीकडे पुन्हापुन्हा येऊ लागला आहे. मुंबईसारख्या अवाढव्य वाढलेल्या महानगरात तर कधी बस माणसांना चिरडते, कधी लोकल स्थानकावरच्या उसळलेल्या गर्दीतल्या चेंगराचेंगरीत महिला मरतात तर कधी परदेशातून अतिरेकी येऊन अंदाधुंद गोळीबार करतात. हे मरणसत्र काही थांबत नाही. वर्षानुवर्षे कोणत्या ना कोणत्या प्रकारात चालूच आहे. या मरणमालिकेतली बुधवारची घटना घडली ती ‘एलिफंटा’ घारापुरीलगतच्या समुद्रात.