हौस ऑफ बांबू : गाइड : इनसाइड स्टोरी...!

पीएचडी करणं सोपं नाही. त्यासाठी विषय आणि त्याचा आवाका ठरवावा लागतो.
hous of bamboo
hous of bamboosakal

नअस्कार! प्रति, कमिश्नरसाहेब, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांसी, पीएचडीसाठी स्नातकास मार्गदर्शक करणाऱ्या गाईड प्राध्यापिकेला आपण रंगेहाथ पकडल्याची बातमी वृत्तपत्रात तीन-चारदा आणि समाजमाध्यमांवर

तीनचारशेवेळा वाचली. प्रबंध लेखनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकवर्गातही भ्रष्टाचाराची कीड लागल्याची टीका सर्वत्र होत आहे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी हा घृणास्पद दुर्व्यवहार व्हावा, हे अगदीच लाजिरवाणं आहे. या वृत्तामुळे माझी जुन्या जखमेवरची खपली निघून पुन्हा भळभळा वाहू लागली, म्हणून हा पत्रप्रपंच.

कमिश्नरसाहेब, आज संपूर्ण साहित्यजगत (पक्षी : पुणे, कोथरुड समाविष्ट) मला ‘कु. सरोज’ याच नावाने ओळखतं. कु. सरोज म्हटलं की, अनेकांच्या प्रतिभेला एकाचवेळी अनेक कोंब फुटतात, हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे.

साहित्यसमीक्षेच्या प्रांतात तर माझं नाव घेतल्याशिवाय कुणालाही पुढे जाता येणार नाही. किमान मागे वळून एकदा पाहून मगच पुढे जाता येईल. (संदर्भ : पलऽऽट!) सारं काही ठरल्याप्रमाणे झालं असतं तर उभा महाराष्ट्र मला ‘कु, सरोज’ नव्हे, तर ‘डॉ. सरोज’ या नावानं ओळखत असता. किंवा ‘डॉ. कु. सरोज’ अशी माझी ओळख असती. पण विद्यादानातील भ्रष्टाचारामुळे मला डॉ. होता आलं नाही. अहंहं!

पीएचडी करणं सोपं नाही. त्यासाठी विषय आणि त्याचा आवाका ठरवावा लागतो. परिप्रेक्ष्य निश्चित करावं लागतं. मग त्यानुसार गाईड महाशयांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करावं लागतं. हे संशोधन गाईडनं सांगितल्याबरहुकूम मूलभूत असावं लागतं. त्यासाठी गाईड जे जे सांगेल ते ते करावं लागतं. माझ्या परिचयाचे एक स्नातक पाचेक वर्ष पीएचडी करत होते.

एकदीड वर्षात ते आपल्या गाईडच्या घरी राहायलाच गेले. दूध-अंडी आणण्यापासून सायंकाळी सोडा-बर्फ आणून देण्यापर्यंत सारीच कामं ते करायचे. त्यांची ही विद्यार्जनाची भूक बघून गाईड महाशयांनी घरातली झाडू-पोते करणाऱ्या मोलकरणीस कमी केलंन. पण तपश्चर्येला फळ आलं. त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. आता तोच स्नातक एका विद्यापीठात विभाग प्रमुख असून स्वत:च गाईड झाला आहे. पहा!!

गाईड हे प्राध्यापकच असतात आणि आपल्या आधीच ‘डॉ.’ होऊन बसलेले असतात. ‘डॉ.’ होण्यासाठी त्यांनीही अशीच शागीर्दी केलेली असते. पूर्वीच्या काळी शास्त्रीय गायनाच्या घराण्यांमध्ये अशीच प्रथा नव्हती का? आपल्या उस्तादांसाठी मटणकरी पकवल्याशिवाय आसावरी कसा घोटता येईल, हा खरा सवाल असे. तसंच हे!!

एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेस तुम्ही २० हजार चलनी नोटांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडलंत म्हणे. आपल्या विद्यार्थ्यास ‘कररचनेतील क्लिष्टता आणि विनिमयातील रोखतेच्या मर्यादा’ या विषयावर नवा सिद्धांत मांडण्याच्या दृष्टीने सदरील प्राध्यापिका काही मार्गदर्शन करत असेल, असे तुम्हाला का वाटलं नाही? अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेनं नुसतेच सिद्धांत आणि अर्थशून्य आकडेमोड करत बसावी असं का तुम्हाला वाटतं?

कोणे एके काळी मीदेखील ‘आधुनिक मराठी काव्य आणि दारिद्र्यरेषेखालील कवींच्या प्रतिभेचा नवनवोन्मेष : ज्येष्ठ कवी बायरन आणि इलियट यांच्या अनुभवविश्वाच्या परिप्रेक्ष्यातून’ असा प्रबंध लिहून पीएचडी करायचं ठरवलं होतं. पहिल्याच दिवशी मी गाईड महाशयांच्या घरी पत्त्यांचा कॅट, एक वारुणीचा बुधला आणि चकलीचं पाकिट एवढा प्रसाद घेऊन गेले होत्ये.

‘देवानंदचा ‘गाईड’ सिनेमा पाहायला जाऊ या का?’ असंही म्हणून पाहिलं, पण त्यांनी भेटवस्तू स्वीकारली नि सिनेमाला आले नाहीत. परिणामी माझा प्रबंध कधीच पुरा होऊ शकला नाही. विद्यार्थ्यांना असहकार्य करणारे प्राध्यापकही महाराष्ट्रात आहेत, याकडे लक्ष वेधत्ये. असो. तरीही अभिनंदन! आपली,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com