
कोणत्याही मुक्त आणि खुल्या व्यवस्थेत देशाच्या संरक्षणविषयक बाबींची गोपनीयता आणि पारदर्शित्व यांचा सुयोग्य मेळ घालावा लागतो. तो जर घातला नाही तर होतात ते फक्त हेत्वारोप. पक्षीय स्पर्धेत मग त्या चर्चेची मजल भूतकाळ उकरण्यापर्यंत जाते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील दोन दिवसांची संसदेतील चर्चा नेमकी याच वळणावर गेली. त्यात सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचा प्रयत्न होता तो एकमेकांवर कुरघोडी करण्याचा. प्रत्यक्ष लष्करी कारवाई, तिचे कारण याइतकाच शस्त्रसंधीसाठी पुढाकार कोणी घेतला आणि ती कोणत्या परिस्थितीत प्रत्यक्षात आली, यावर बराच खल झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळचा संघर्षविराम आपणच मध्यस्थी करुन घडवून आणल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केला आहे.