तरुणांच्या मनात चांगले संकल्प कधी येतील? ते उत्तुंग स्वप्ने कधी पाहतील? जर आपण तसे वातावरण निर्माण केले तर. दुर्दैवाने ते प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळेच ‘लोकसंख्या लाभांशा’चा फायदा देशाला मिळणार का, याविषयी साशंकता निर्माण होते.
‘तुम्ही देशातील तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा, म्हणजे मी त्या देशाचे भवितव्य सांगतो’, हे एका नेत्याचे सुवचन आत्तापर्यंत शेकडोवेळा उद्धृत झाले आहे. त्या विधानाचे मर्म लक्षात घेऊन ज्या ज्या देशांतील धुरीण खरोखर तरुणांच्या जडणघडणीकडे, विकासाकडे लक्ष देतात, त्या देशांच्या भविष्यकाळाला आकार आल्याशिवाय राहात नाही.