
दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध न करता भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केल्यानंतर घडलेल्या घडामोडी आजच्या आंतरराष्ट्रीय वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या आहेत. त्या वास्तवाचे सर्वांत पहिले आणि ठळक लक्षण म्हणजे आपले राष्ट्रीय हितसंबंध, सार्वभौमत्व आणि सुरक्षा यांची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी कितीही वल्गना करीत असले तरी ‘गर्जेल तो पडेल काय’ हाच अनुभव अखेर येणार. जगाच्या पुढारपणाचा गेली सात-आठ दशके मक्ता घेतलेली अमेरिका प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा स्वहितापलीकडे काहीही पाहात नाही. मग अध्यक्षस्थानी बायडेन असोत अथवा ट्रम्प. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचा कर्जाचा हप्ता देण्याची तत्परता दाखविली, ती भारतीयांच्या संतापाला कारणीभूत ठरली, हे स्वाभाविक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर अमेरिकेचे वर्चस्व आहे आणि आपल्या प्रभावाचा पाकिस्तानसाठी यापूर्वीही महासत्तेने वापर केला आहे.