Grassroots Workers Side-lined in Ticket Distribution
sakal
editorial-articles
अग्रलेख - खुर्च्या आणि सतरंज्या!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत घराणेशाहीचा कळस दिसून आला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मागे ढकलण्यात आले आहे. नेतृत्वाच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देणे हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरत आहे.
राजकीय नेत्यांचे आपसांतील टोकाचे आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन निर्णयाची टांगती तलवार आणि नोटांच्या बंडलांचे व्हायरल व्हिडिओ या सगळ्या रणधुमाळीनंतर दोन आठवडे चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराची आज सांगता होईल. २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या, दोन डिसेंबरला मतदान होईल. खरे तर स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. मात्र लोकसभा आणि विधानसभेनंतर होणाऱ्या ही निवडणूक एकीकडे सत्ताधाऱ्यांसाठी जनमानसातील लोकप्रियतेबाबतची ‘लिटमस टेस्ट’ तर विरोधकांसाठी बळ आजमावण्याची कसोटी ठरणार आहे.
