

Oscars 2026 Best Actor Michael B Jordan
esakal
कलेचे प्रतिबिंब समाजात पडायला हवे की, समाजातील घडामोडींची नोंद कलाविश्वात व्हायला हवी, हा वादाचा जुना मुद्दा आहे. कलेसाठी कला हे सूत्र कदाचित काही कलाप्रयोगांमध्ये जमून जाते, चित्रपटकलेला मात्र समाजापासून घटस्फोट घेता येणे शक्य नसते. कारण मुळात ही कलाच प्रचंड महागडी, अफाट सामूहिक सर्जनशक्ती आणि अंगतोड मेहनतीची मागणी करणारी आहे. तिला समाजशरणतेवाचून पर्याय नाही. जगात जे जे घडते, त्याला तत्काळ प्रतिसाद देणारा हा रुपेरी पडदा म्हणूनच जादूईदेखील आहे. सुंदर ती दुसरी दुनिया असलेले हे चंदेरी जग जगभरातल्या जनसामान्यांना ‘आपले’ वाटते. त्या दुनियेतले रहिवासी मानले जाणारे तारेसितारे, महान दिग्दर्शक, निर्माते हे आप्त वाटतात. त्यांची चमकदमक, त्यांचा दिमाख हा बहुतांच्या कौतुकाचा किंवा क्वचित असूयेचाही भाग असतो. अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या भव्य सभागारात रविवारी ९८वा ऑस्कर सोहळा पार पडला, तेव्हा ही सुंदर नवभूमी वास्तवातल्या ‘या नगराला लागुनिया’ असल्याचा भास झाला. काही अनपेक्षित कडूगोड धक्के, बरेचसे टोमणे आणि जहरी टीका, टाळ्यांची दिलखुलास दाद आणि सिताऱ्यांच्या लाखमोली पोशाखांचे झगमगते फलकारे यांनी ती संध्याकाळ साजरी करुन नेली.