esakal | या जगण्यावर... मनात घर करणारं घर!
sakal

बोलून बातमी शोधा

HOME

मे महिना म्हटलं की, हमखास आजोळचं घर डोळ्यांसमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे

या जगण्यावर... मनात घर करणारं घर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मे महिना म्हटलं की, हमखास आजोळचं घर डोळ्यांसमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू थकते, खचते, संपते. पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करून कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने, तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्षे जातात. अखेर ते हाती येतं, पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात असेच कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणाऱ्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करतो. संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरंच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान-मोठं, टुमदार-अालिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं कुणी तरी असतं. स्वप्नातलं घर मात्र बऱ्याचदा वेगळंच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार, पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्टमेंटचं अप्रूप असतं; तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारू साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात रोमँटिसिझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे, असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.

केरळमधल्या प्रवासात असंच स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.

हेही वाचा: भारतातील या रहस्यमयी जंगला बद्दल माहिती आहे का ?

‘येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥’... तुकडोजी महाराज यांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील. हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणाऱ्या नारळी, पोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात, हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.

तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वास्तू. पण त्यात राहणाऱ्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्त्व तयार होतं. चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची, तर काही दिखाऊ. काही उबदार तर काही रुक्ष वाटतात. काही हवीहवीशी, तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे, कसं असायला हवं... हे हळूवारपणे सांगणारी ‘घराचं मनोगत’ नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लिश कविता मनाला स्पर्शून गेली. या कवितेतलं घर म्हणतं -

मला ‘असं’ घर व्हायला आवडेल

जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल घरच्यासारखं

जिथे ते निवांत पाय पसरून बसू शकतील

आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून

पाणी घेऊन पिऊ शकतील...

मला ‘असं’ घर व्हायला आवडेल...

(मोहिनी मोडक)

loading image