
मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटले जाते; पण हीच स्वप्ननगरी दररोज आठ कुटुंबांच्या स्वप्नांची अग्रलेख राखरांगोळी करते आणि त्याला जबाबदार असते ती मुंबईची उपनगरी रेल्वेवाहतूक (लोकल). गेल्या दहा वर्षांत मुंबईतील लोकलमध्ये प्रवास करताना सरासरी आठ-नऊ जणांचा मृत्यू होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्याच अहवालांतून स्पष्ट होते. गेल्या वर्षभरात २५९० जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगते. लोकलमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूची सोमवारी घडलेली दुर्घटना ही याच दुर्दैवी मालिकेतील एक. जगभरातल्या नागरी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहतुकीवर नजर टाकली तर मुंबई लोकल ही सर्वांत जास्त जीव घेणारी नागरी प्रवासीसेवा आहे, हे कळते. मुंबईची ही दयनीय परिस्थिती ढळढळीतपणे दिसत आली आहे. पराकोटीच्या सहनशक्तीने आणि आला दिवस घालवण्याच्या मानसिकतेने ‘चाकरमानी’ मुंबईकरांनी किड्या-मुंग्यांसारखे जगणे स्वीकारलेय, असे दिसते.