प्रत्येकाच्या आयुष्यात ‘श्रावण’ हवा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan

जून महिन्यात एकदा पाऊस सुरू झाला की साऱ्या सृष्टीचं चित्रच पालटतं. हळूच कोणीतरी मग ‘समुद्रबिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना लागतो’, असं म्हणतं आणि श्रावणाची चाहूल लागते.

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘श्रावण’ हवा...

माणसाला ‘साजरं करणं’ आवडतं, सामूहिक कार्यक्रम आवडतात, आनंदी असणं आवडतं. कितीही आधुनिक विचार वगैरे असले तरी आजूबाजूच्या उत्सवी वातावरणात आपण ओढले जातो आणि आपल्यालाही आश्चर्य वाटेल, अशा चार गोष्टी करतो. श्रावण म्हणजे तरी काय, ‘साजरं’ करण्याचं निमित्त. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात हा आनंदाची पेरणी करणारा ‘श्रावण’ हवाच!

जून महिन्यात एकदा पाऊस सुरू झाला की साऱ्या सृष्टीचं चित्रच पालटतं. हळूच कोणीतरी मग ‘समुद्रबिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना लागतो’, असं म्हणतं आणि श्रावणाची चाहूल लागते. आषाढी एकादशी झाली की श्रावणाचे वेध लागायला लागतातच. प्रचंड कार्यक्रमांनी भरगच्च असा हा महिना. त्यामुळे एरवी कपाटात ठेवून दिलेली ‘संपूर्ण चातुर्मास’, ‘श्रावणातल्या पूजा’, ‘आपले सण आणि संस्कृती’ सारखी पुस्तकं बाहेर दिसायला लागतात. ‘रुचिरा’, उपवासाचे पन्नास पदार्थ’, मराठमोळ्या शंभर पाककृती’ वगैरे पुस्तकांच्या पानांचे त्रिकोण दुमडलेले दिसायला लागतात.

मग हळूहळू ठेवणीतल्या साड्या निघतात. उगाचच गोड पदार्थ करून बघितले जाऊ लागतात. ‘मला नाही असलं काही आवडत’ म्हणणाऱ्याही मंगळागौरी करतात, ‘काय तो धांगडधिंगा’ असं म्हणणारेही दहीहंडीमध्ये भाग घेतात, ‘एकदा मला करून बघायचाच आहे’, असं म्हणून कुणी श्रावण ‘पाळतं’. तर, ‘यानिमित्ताने तरी होईल’ म्हणून काही जणी ठरलेल्या वारांना उपाससुद्धा करतात. भेटीगाठी ठरतात. ‘यंदा आमच्याकडे’ असे वार्षिक कार्यक्रम ठरतात. दोन दिवसांच्या सहली निघतात. एकूण काय तर, सगळीकडे आनंदी आनंद आणि वातावरण प्रसन्न. त्यामुळे श्रावणाचा ज्वर हमखास चढतोच.

हल्ली डिप्रेशनसारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे, याचं एक कारण, ‘पुढे बघण्यासारखं काही नाही’, हेही आहेच. मेडिटेशन करताना कितीही ‘आत्ताच्या क्षणात’ जगायला शिकवत असले, तरी आयुष्य जगताना आपण सतत पुढच्या क्षणाचा विचार करत असतो. मग तो क्षण जगण्यासाठी उत्साह वाटेल यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. मन लावून करावं, जीव तोडून तयारी करावी, आनंदानं सहभागी व्हावं, असं वातावरण आपणच तयार करायला हवं. हे वातावरण देण्यासाठी, प्रत्येकाला पुढे बघण्यासाठी आपापला ‘श्रावण’ हवाच!

Web Title: Mugdha Godbole Writes Shravan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Articleshravan