
सर्वच काळातील युद्धे ही जेवढी शस्त्रास्त्रांनी लढली जातात, तेवढीच ती ‘कथना’च्या आधारेही लढली जातात. आजच्या ‘माहितीयुगा’त तर हे जास्तच प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच `ऑपरेशन सिंदूर’ची पहिली थेट कारवाई झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा धोका जगाच्या नजरेस आणून देण्यासाठी केंद्र सरकारने काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करून योग्य पाऊल उचलले आहे. भारताची भूमिका पटवून देण्याबरोबरच मानवतेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आवश्यक आहे. शिवाय ‘आम्ही एक आहोत’, हा संदेशही यानिमित्ताने जगाला दिला जाणार आहे.