
राजकारणात कधीच पोकळी राहात नाही. ती कोणी ना कोणी भरून काढते. ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाबाबत सध्याच्या घडामोडी या तत्त्वाची आठवण करून देतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा दारुण पराभव ‘इंडिया’ आघाडीच्या मुळावर येऊन त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटताहेत. ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद हळूहळू ऐरणीवर येऊ लागले आहेत. विविध मित्रपक्षांनी ममता बॅनर्जी यांचे विरोधकांच्या नेत्या म्हणून नाव पुढे आणले आहे. राष्ट्रीय जनता दलासारखा कॉँग्रेसचा दीर्घकाळ मित्रपक्ष राहिलेला पक्षही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास उत्सुक असल्याचे दिसते.