
राजकीय संघर्षाचे स्वरूप राजकीय पक्षांमधील धोरणात्मक भूमिकांवरून, विचारसरणीवरून झाले, तर ते लोकशाहीत केवळ स्वाभाविकच असते असे नाही, त्यातून नियंत्रण आणि समतोल साधला जात असल्याने लोकशाहीत तसे आवश्यकही असते. परंतु हे वाद जेव्हा आपल्या एकूण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशीच येऊन भिडतात, तेव्हा तो निश्चितच चिंतेचा विषय ठरतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप विविध वृत्तपत्रांत लेख लिहून राहुल गांधी यांनी केला असून निवडणूक आयोगाने त्या आरोपांचे तत्काळ खंडन केले आहे. तर भाजपनेही या निमित्ताने काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधण्याची संधी साधून घेतली. या सगळ्या घटनाक्रमामागील राजकारण समजून घ्यायला हवेच. मात्र हे प्रकरण तडीस नेऊन, तसेच सर्व माहिती सार्वजनिक पटलावर ठेवून निवडणूक आयोग या यंत्रणेची विश्वासार्हता लयास जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.