
व्यासंगी संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याचा अभ्यास करताना आधुनिकता आणि पारंपरिकता याला सारखेच महत्त्व दिले.
लोकसाहित्यात रमलेला ज्ञानोपासक
व्यासंगी संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याचा अभ्यास करताना आधुनिकता आणि पारंपरिकता याला सारखेच महत्त्व दिले. ते म्हणतात, आधुनिकता ही कुठून बाहेरून आलेली नसते, तर ती पारंपरिक जीवनातून आलेली असते, परंपरेला नवा अर्थ देऊन त्याला प्रासंगिक बनविण्याचा प्रयत्न करते.
- ऋता मनोज ठाकूर, नगर
‘लोकल लोककला ग्लोबल झाल्या’, असे पूर्वी उपहासाने म्हटले जायचे, ते आता गौरवाने म्हटले जाईल. त्याला कारण ताजी घटना, डॉ. प्रभाकर मांडे यांना जाहीर झालेला ‘पद्मश्री’ सन्मान. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन,लोककला या विषयांचा अभ्यास करणारे व या गोष्टी जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकांपर्यंत कशा नेता येतील,
यासाठी प्रयत्न करणारे डॉ. मांडे यांनी औरंगाबाद विद्यापीठात सर्वप्रथम लोकसाहित्य हा विषय स्वतंत्र अभ्यासविषय म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यावर त्या विषयासाठी आपले संपूर्ण जीवन कारणी लावणारे प्रभाकर मांडे एवढ्यावरच स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित करून या परिषदांमधून अभ्यासकांची एक मोठी फळी उभी केली.
डॉ.दुर्गा भागवत, डॉ.रा.चिं ढेरे, डॉ.अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे,डॉ.तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ.अरुणा ढेरे ,डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ.माहेश्वरी गावित आदी मान्यवरांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून देण्यात डॉ. मांडे यांचे मोलाचे योगदान आहे.
मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतःचे असे सिद्धांत डॉ. प्रभाकर मांडे यांनी मांडले. समाजात अस्वस्थता आणि असुरक्षितता वाढली आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी असल्याने जीवन सुरक्षित आणि सुस्वास्थ्य स्थितीत जगण्यासाठी नवनव्या वाटा शोधू लागतो आणि या नव्या वाटा माणसाला आश्वासक पद्धतीने खुणावतील आणि जगण्याचे नवे बळ देतील हे निश्चित हा विश्वास डॉ.मांडे आग्रहाने मांडतात.
ते म्हणतात, जेव्हा जेव्हा मानवाला अस्वस्थता, असुरक्षितता अशा गोष्टींना सामोरे जावे लागते, अशावेळी म्हणजे सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेत बदलत्या स्वरूपातील लोकसंस्कृती आणि तिचे चैतन्यशील सत्त्व असलेल्या लोककलांचे योगदान फार मोठे असते. प्रयोगात्मकरीत्या लोककलांचा वापर करून समाजाला नवी दिशा देता येते आणि समाजस्वास्थ्य,सुरक्षितता आपल्याला टिकवता येते.
आधुनिकतेचा प्रवास हिताचा
लोकसंस्कृतीचे नाते एकाच वेळी वर्तमान आणि इतिहासाशी असते. एकाच वेळी दोन काळांचा संगम होतो, म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानकाळ. इतिहास हा केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नसतो, तो भूतकाळ आणि वर्तमानकाळ याला जोडणारा दुवा असतो. म्हणजेच अर्थपूर्ण संवाद असतो. विशिष्ट इतिहास दृष्टी स्वीकारून केलेले घटना क्रमाचे आकलन असते.
सामान्य माणूस अशा गोष्टींकडे एक घटना म्हणून बघतो. परंतु याचवेळी लोकसाहित्याचे अभ्यासक त्या घटनेला लोककला, लोकजीवन, लोकसंस्कृती या अंगाने लोकसाहित्य म्हणून अभ्यासतात आणि हे साहित्य लोकांच्या, समाजाच्या हिताचे व कल्याणाचे होते. अर्थात यासाठी तसा दृष्टिकोन असावा लागतो.
त्या कलेकडे, घटनेकडे सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडणारे समाज हिताचे लोकसाहित्य आहे असे म्हणून पाहिले तर लोकल लोककला ग्लोबल होत चालल्या आहेत. जुने ते सोने आणि नवे तेही सोने, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नव्या जुन्याचा संगम होतो आणि गोष्टी स्वीकारणे सर्वांना सहज, सोप्या होतात.
आधुनिकतेचा शोध परंपरेपासून तुटून बाहेर जाऊन होत नाही.जसे झाडाची जुनी पाने गळून नवीन पालवी फुटते आणि असे प्रत्येक वर्षी घडते यासाठी झाडाचे अस्तित्व राखणे, त्याच्या आत मुळातून जीवन स्रोत कायम ठेवणे आवश्यक असते. झाड मुळापासून तोडले तर त्याला पुन्हा पालवी फुटणार नाही म्हणजे मुळाला विसरून चालणार नाही. परंपरेतून आधुनिकतेकडे प्रवास करणे हे समाजाच्या दृष्टीने हिताचे असते.
साठपेक्षा अधिक ग्रंथ निर्मिती
१९६० मध्ये पीएच.डीसाठी नोंदणी करणारा महाराष्ट्रातला पहिला संशोधक (लोक साहित्य) विद्यार्थी म्हणून प्रभाकर मांडे यांचे नाव घ्यावे लागेल. म्हणजे या विषयात यापूर्वी कोणीही पीएच.डी झाले नव्हते. १९७१ नंतर भटक्या विमुक्तांच्या विश्वाकडे ते वळाले आणि मग अखंड काम सुरू झाले. लोककला, लोकजीवन या विषयामध्ये सात संशोधन केली.
त्यांना डी.लिट.ही पदवी प्राप्त झाली. देश-विदेशात २० पेक्षा जास्त चर्चासत्रात त्यांनी सहभाग नोंदविला. आपले जीवन जगता जगता भटक्या विमुक्तांचे जीवन शोधत राहिले. विशेषतः मातंग समाजासाठी सतत कार्यरत राहिले.
नगरला आल्यापासून वाल्मिकी समाजासाठी काम सुरू झाले आणि त्यावर पुस्तकही आले.आतापर्यंत जवळपास ६० च्या वर ग्रंथ निर्मिती त्यांनी केली. या नव्वदीच्या तरुणाच्या मनातील उत्साह ओसंडून वाहताना आम्ही पाहिला आहे. पद्मश्री सन्मान मिळाल्यावर अभिनंदनाच्या फोनवर बोलताना ते विचारतात तुमचे लेखन चालू आहे
ना! कारण ....
‘लिहित्या हाताने लिहित रहावं
गात्या गळ्याने गात राहावं..’
आपण कितीही मोठं झालो तरी, इतरांच्या कामाचा आदर करणे, हा मोठा गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे. पुरस्कारानंतरची प्रतिक्रिया म्हणजे ‘मला आनंद झाला कारण आपल्या हातून घडलेले काम समाजाला भावले, समाजापर्यंत पोहोचले आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हा पुरस्कार’! त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होता.