आपल्याकडे उत्पादनक्षेत्राची अपेक्षित वाढ का होत नाही, या प्रश्नाचा मुळापासून विचार करून तातडीच्या आणि सर्वसमावेशक सुधारणा करण्याची गरज आहे.
जगाचे अर्थकारण हे जागतिक महासत्तांभोवती फिरते आणि त्याची रूपरेखा ठरते ती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कारभारातून. या कंपन्यांनी आपल्याकडे यावे, त्यांनी गुंतवणूक करावी म्हणून प्रत्येक देश धडपडताना दिसतो. पूर्वी केवळ अमेरिका आणि रशियाकेंद्री असलेली आर्थिक पटाची मांडणी ‘चिनी ड्रॅगन’च्या उदयामुळे काहीशी विकेंद्रित झाली असली तरी पूर्णतः विकेंद्रित झालेली नाही.