
धार्मिक विद्वेषाचा विखार पेरण्याचे उद्योग कोणी करीत असेल तर वेळीच त्यांना वेगळे पाडायला हवे.
सामाजिक सौहार्दाला तडा गेला, विचारांची जागा विखाराने घेतली आणि राजकीय नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचे काम केले तर परिस्थिती किती विकोपाला जाते, याची प्रचिती सोमवारी नागपुरात आली.
उपराजधानी असलेल्या या शहराच्या प्रतिमेला तडा गेला. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली, पण ते करताना ३४ पोलिस, तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले. दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतरही प्रगल्भ भूमिका घेत शांततेचे आवाहन करण्याऐवजी काही राजकारणी आरोप-प्रत्यारोपाच्या नेहेमीच्या खेळात दंग होते.
हे सगळे घटनाचक्र राज्याविषयी काळजी वाटायला लावणारे आहे, यात शंका नाही. नागपुरात जी दगडफेक आणि हिंसाचार झाला, त्याच्या कारणांबाबत दोन विचारप्रवाह पुढे येत आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यामुळे आधीच संतप्त झालेल्या मुस्लिम समुदायातील काहींनी राग काढण्यासाठी निमित्तच शोधले, धार्मिक ग्रंथातील पवित्र वचने जाळल्याचे कारण त्यांनी पुढे केले, हा एक मतप्रवाह..
तर सर्वधर्मीय लोक अपार शांततेत ज्या शहरात नांदतात तिथे या तणावाला एवढेच कारण पुरेसे नव्हते, असे मानणारा दुसरा विचार. सोमवारी दुपारच्या वेळी महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिमा जाळताना ‘पवित्र उपदेश’ लिहिलेली चादर जाळून त्याचा व्हिडिओ एका चिथावणीखोर गाण्यासह सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या.
यातील सत्य काय ते पोलिसांच्या चौकशीतून बाहेर येईलच; परंतु या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. समुदायाने जाळपोळ केल्यानंतर त्याविरोधात तक्रार दाखल करायला दोन वेळा गेलेल्या दुसऱ्या समुदायाच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.
त्यांची तक्रार वेळीच दाखल करून बंदोबस्त लावण्यात आला असता तर हा तणाव निर्माण झाला नसता. औरंगजेबाची कबर उखडण्याची भाषा करणे हे कायदा हातात घेण्यासारखे आहे. सत्ताधाऱ्यांनी अशांना वेळीच आवर घालायला हवा. ‘मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम्, क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव’ या प्रसिद्ध श्लोकाचे मर्म लक्षात घ्यायला हवे.
‘रावणाच्या मृत्यूनंतर, त्याचा अंत्यसंस्कार योग्य विधीसंस्काराने करून घ्या’, असा आग्रह प्रभू श्रीरामांनी रावणाचा भाऊ बिभीषणाला केला होता. असे वर्णन या श्लोकात आहे. हीच आपली संस्कृती आहे. परंतु, राजकीय ध्रुवीकरणासाठी कुणी औरंगजेबाचा विषय उकरून काढत असेल, तर त्यातील धोके ओळखले पाहिजेत. हे त्या संस्कृतीला हरताळ फासण्यासारखे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘बटेंगे तो कटेंगे ’ या घोषणेने तणाव निर्माण केला होता. तो दूर होत असतानाच पुन्हा औरंगजेबाचे भूत जाणूनबुजून तर उभे करण्यात आले नाही ना, अशी शंका नागपूरच्या या घटनेमुळे यायला लागली आहे.
उपासमार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्न राज्यात आ-वासून उभे असताना त्यांवरून लक्ष उडविणारे कोणतेही प्रयत्न खपवून घेता कामा नयेत. एकमेकांविषयीच्या विखारातून खदखद कायम राहते आणि एखाद्या अफवेची ठिणगी दंगलीचा भडका उडवून देते.
मग परिस्थिती कोणाच्याच हातात राहात नाही. म्हणून हा विखारच मुळात निर्माण होऊ नये, याची खबरदारी सर्वांनीच घेण्याची गरज आहे. या बाबतीत सत्ताधाऱ्यांची जबाबदारी अर्थातच जास्त आहे. पण त्यांच्यातीलच काही जण मर्यादा सोडून बोलतात. आदर्श शेतकरी पुरस्कारप्राप्त बुलडाणा जिल्ह्यातील कैलास नागरे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो.
शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातील पाणी मिळवून देण्यासाठी त्याच्या लढाईला आलेल्या अपयशामुळे तो हे टोकाचे पाऊल उचलतो. दारिद्र्याच्या अजस्त्र मिठीत गावेच्या गावे गेली आहेत. शेतीप्रश्नाचे भीषण वास्तव सर्वत्र दिसत आहे. याशिवायही प्रश्नांच्या पलित्याची मोठी रांग उभी असताना ‘औरंगजेबा’सारखे मुद्दे पुढे येतात.
त्यामुळे होणाऱ्या टोकाच्या ध्रुवीकरणाचा लाभ घेण्याची इच्छा निर्माण होते. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता, यातून नवे कुभांडही रचले जाऊ शकते, अशी चर्चा एव्हाना सुरू झाली आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य असताना येथे धार्मिक विद्वेषाचा विखार पेरण्याचे उद्योग कोणी करीत असेल तर वेळीच त्यांना वेगळे पाडायला हवे.
राजकीय पक्ष जर फक्त फायदा-तोट्याचाच विचार करणार असतील, तर त्यातून काही चांगले उगविण्याची शक्यता नाही. स्वार्थांध हेतूंनी बरबटलेल्या काही समाजकंटकांना इथले सौहार्द आणि शांतता बघवत नाही. काही वर्षांपूर्वी अमरावती शहरात दंगल पेटवण्याचे कारस्थान रचण्यात आले होते. तेव्हाही सर्वसामान्य माणसाने ते हाणून पाडले.
नागपूर शहराच्या एका छोट्या भागात दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतरही सलोखा कायम राखला जातो. हे ‘स्पिरीट’ टिकेल, हे पाहायला हवे. मानवतेची बूज राखणारे नागरिक हे करू शकतात. राज्याची ही संस्कृती आहे. परंतु, बेताल वक्तव्ये आणि बेकायदा कारवाया करणाऱ्यांनी या संस्कृतीला तडा देण्याचे उद्योग आरंभले आहेत, असे दिसते. त्यांचा कठोर बंदोबस्त सरकारने वेळीच करावा. राज्यात विखाराला थारा नको.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.