अग्रलेख : ‘आप’ भी...?

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत, अशी आपल्याकडे म्हण आहे.
Swati Maliwal
Swati MaliwalEsakal

स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने ‘आप’च्या प्रतिमेला आणि पुरोगामीपणाच्या फुग्याला टाचणी लागली आहे.

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत, अशी आपल्याकडे म्हण आहे. सध्याचे केंद्रातील वा विविध राज्यांतील राज्यकर्ते आणि त्यांचे भाट, कार्यकर्ते, समर्थक आदी प्रभावळीला ही म्हण तंतोतंत लागू पडते. पक्ष कोणताही असो; भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, जनता दल (धर्मनिरपेक्ष) तृणमूल काँग्रेस... किंवा अगदी अपारंपरिक म्हणवणारा आम आदमी पक्ष.

महिलांच्या प्रश्‍नावर, त्यांच्याबाबत कुठे काही अनुचित घडले, स्त्रीत्वाचा उपमर्द झाला किंवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला की, हे सर्व जण संबंधित दोषींवर तुटून पडतात. खरे तर ही चांगली गोष्ट म्हटली पाहिजे. पण प्रश्न असा आहे की त्यांची ही प्रतिक्रिया निवडक असते. हीच बाब खटकणारी आहे. स्त्रीत्वाच्या मुद्द्याआडून हे पक्ष एकमेकांवर लक्ष्य साधत त्यावरून राजकारण करतात, हे घातक आहे.

याचे प्रत्यंतर नुकतेच बंगालमधील संदेशखाली प्रकरणात, कर्नाटकातील हासनमधील घटनेत आलेच. ताजी घटना घडली ती ‘आप’च्या संदर्भात. ‘आप’च्या खासदार, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना सोमवारी (ता.१३) दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वीय सहायक पदावर राहिलेले विभव कुमार यांनी मारहाण केल्याची घटना घडली.

त्याबाबत मालिवाल यांनी पोलिसांत दूरध्वनीवरून संपर्क साधला; पोलिस ठाण्यात जाऊनही आल्या. त्या दिवशी त्यांनी तक्रार न दिल्याने प्रकरण दडपले जाते की काय, अशी शंका निर्माण झाली. परंतु गुरुवारी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचे भारतीय जनता पक्षाने त्याचे भांडवल न केले तरच नवल! भाजपने आक्रमक भूमिका घेतली.

मालिवालप्रकरणी कारवाई का होत नाही, तक्रार का दाखल करत नाही, विभव कुमार मोकाट कसे? एवढेच नव्हे तर केजरीवालांबरोबर दौरे कसे काय करतात, अशा प्रश्‍नांच्या सरबत्तीने भंडावून सोडले. त्यामुळेच अखेरीस, गाजणाऱ्या मद्यधोरण प्रकरणात केजरीवाल यांच्याप्रमाणे जामिनावर असलेले ‘आप’ नेते संजयसिंह यांनी झाल्या घटनेची कबुली दिली; मालिवाल यांच्याशी चर्चाही केली. मात्र विलंबाचे हे ‘डॅमेज कंट्रोल’ होण्याआधीच ‘आप’च्या प्रतिमेला आणि पुरोगामीपणाच्या फुग्याला टाचणी लागली.

देशाच्या महिला आयोगाने स्वतःहून मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची दखल घेत विभवकुमार यांना येत्या १७ मे रोजी स्वतः आयोगासमोर येऊन बाजू मांडावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे ‘आप’ने कितीही या घटनेबाबत सारवासारवीचा प्रयत्न केला तरी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होणारच, असे दिसते.

अर्थात, इतर पक्षांपेक्षा वेगळेपणा दाखवणाऱ्या, चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने पुढे आलेल्या या पक्षातही सुंदोपसुंदी आमि अंतर्गत कलह आहेतच. त्यांच्या वेगळे असल्याच्या प्रतिमेचे एकेक पापुद्रे निघू लागले आहेत. केजरीवाल यांनी सुरवातीला चालवलेली ‘इंडिया अगेन्स्ट करेप्शन’ मोहीम असो किंवा त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या ‘आप’मध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन मुद्दांवरून होणारे संघर्ष सर्वश्रुत आहेत.

त्यातूनच खरे तर केजरीवाल दिल्लीचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह अनेक त्यांचे बडे सहकारी त्यांच्यापासून दुरावले. स्वाती मालिवाल आणि विभवकुमार हे दोघेही केजरीवाल यांचा सामाजिक, राजकीय पटावर नेता म्हणून उदय होत असतानाच्या काळापासून त्यांच्याबरोबर वावरले आहेत.

तथापि, विभवकुमार यांचा केजरीवाल आणि त्यांच्या एकूणच कार्यप्रणाली आणि कारकिर्दीवर सातत्याने सावलीसारखा प्रभाव राहिला आहे. स्वीय सहायक म्हणून केजरीवालांच्या व्यक्तिगत देखभालीपासून ते त्यांच्या दिनक्रम निश्‍चितीपर्यंत प्रत्येक गोष्ट विभवकुमार ठरवतात. काही दिवसांपूर्वीच दक्षता आयोगाने त्यांची ‘स्वीय सहायक’ म्हणून सेवा संपुष्टात आणली. त्याविरोधात ते ‘कॅट’मध्ये गेले; पण निर्णयाला स्थगिती काही मिळाली नाही.

मद्यधोरण, दिल्ली जल बोर्ड अशा प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले, चौकशीही झाली. छापेही पडले आहेत. त्यांच्या वादग्रस्ततेत आता मालिवाल यांनी केलेल्या आरोपाने भर पडली आहे.मालिवाल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख व राज्यसभासदस्य आहेत. महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, तेव्हा मालिवाल पीडित महिलांच्या मदतीला धावून गेल्या होत्या.

आता त्यांना स्वतःलाच झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात त्या न्याय मिळवतात का, हे पाहायचे. नेमके सत्य त्या बाहेर आणणार की नाही, हाही कळीचा प्रश्‍न आहे. राजकारणात महिलांची संख्या आपल्याकडे तुलनेने खूपच कमी आहे. राजकारणातल्या महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, हेही वास्तव आहे.

एकीकडे सबलीकरण, सक्षमीकरणाची भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांना दुय्यम लेखायचे, ही वृत्ती निषेधार्ह आहे. राजकारणातल्या महिलांनीही अशा प्रयत्नांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साथ देता कामा नये. प्रसंगी पक्षातीत भूमिकेतून आपल्या प्रश्नांवर एकत्र यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com